३ ऑगस्ट २०२० या दिवशी ‘संस्कृत दिवस’ आहे. यानिमित्ताने…
‘संस्कृत भाषा ही जगातील सर्वांत प्राचीन भाषा असून ती सर्व भाषांची जननी समजली जाते. जगातील सर्व भाषांवर संस्कृत भाषेचा प्रभाव दिसून येतो. काही भाषांमध्ये संस्कृतमधील शब्द जसेच्या तसे घेतलेले आढळून येतात, तर काही भाषा शब्द उच्चारणामध्ये संस्कृतशी जवळीक साधतात. संगणकाला सर्वांत जवळची भाषा ही संस्कृत असू शकते, हेही आता संशोधनाने सिद्ध झाले आहे.
‘भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाणभारती ।’
अर्थ : सर्व भाषांमध्ये देववाणी संस्कृत ही प्रमुख भाषा असून ती मधुर आणि दिव्य आहे.
१. व्याकरणदृष्ट्या सर्वांत योग्य आणि शुद्ध असणारी भाषा म्हणजे संस्कृत !
संस्कृत ही मृत भाषा, विशिष्ट समाजाची भाषा, उपयोगी नसलेली भाषा असे हिणवण्यापेक्षा प्रत्येकाने ही भाषा शिकण्याचा, आत्मसात करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला निश्चित शांती लाभेल. व्याकरणदृष्ट्या सर्वांत योग्य आणि शुद्ध असणारी भाषा म्हणजे संस्कृत भाषा ! व्याकरणदृष्ट्या योग्य शब्दांची रचना करून वाक्य सिद्ध केल्यास, त्यातील शब्दांचा क्रम कसाही पालटला, तरी त्याच्या अर्थात पालट होऊ शकणार नाही.
२. पूर्वजांनी दिलेले ज्ञान शुद्ध, सात्त्विक, निर्मळ आणि सर्र्वांनाच उपयोगी पडणारे असणे
आपल्या पूर्वजांनी, भारतात रहाणार्या आपल्या ज्येष्ठ व्यक्तींनी जे शास्त्रीय ज्ञान अनुभवाच्या कसोटीवर घासून आपल्यापुढे अनुभव रूपाने मांडले, त्यातल्या अनुभवांना तो केवळ आपल्या जातीचा नाही; म्हणून नाकारणार आहोत का ? याचा विचार करण्याची वेळ आली आहे. ज्ञान हे ज्ञानच असते. ते शुद्ध, सात्त्विक, निर्मळ आणि सर्र्वांनाच उपयोगी पडणारे असते. ते बहुसंख्य, अल्पसंख्य, सर्वांनाच मानवणारे, सांभाळणारे, जपणारे असते. त्याच्या ठिकाणी कुठलाही भेदभाव नसतो. ज्ञान दिल्याने वाढते, तर आपल्याजवळ ठेवल्याने नाश होण्याची शक्यता असते.
३. संस्कृत भाषेतील विविध स्तोत्रे, रामरक्षा, सूर्यकवच, गणपति अथर्वशीर्ष, प्रज्ञाविवर्घन इत्यादि स्तोत्रे मानवाच्या मनात शांती आणि नवनवीन करण्याची जिद्द निर्माण करतात.’
– डॉ. श्रीधर म. देशमुख
(संदर्भ : ‘स्वयंभू’, दिवाळी अंक २००९)
(अशा भाषेला पंडित नेहरू यांनी ‘मृतभाषा’ म्हटले होते. संस्कृत भाषेमुळे मानवाला शांती मिळून संगणकाला सर्वांत जवळची भाषा म्हटले आहे. तिला ‘मृतभाषा’ म्हणणार्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ? केंद्र सरकारने संस्कृत भाषेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, अशी संस्कृतप्रेमी आणि हिंदु धर्मनिष्ठ यांची अपेक्षा ! – संपादक)