विशाळगडावरील अतिक्रमणाच्या विरोधातील लढ्याच्या प्रसंगी कोल्हापूर येथील श्री. बाबासाहेब भोपळे यांना शिकायला मिळालेली सूत्रे !

१० जुलै या दिवशी ‘हिंदु विधीज्ञ परिषदे’चा १४ वा वर्धापनदिन झाला. त्या निमित्ताने....

‘मार्च २०२१ मध्ये विशाळगडावरील अतिक्रमणाच्या विषयाला सर्वप्रथम ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’ने वाचा फोडली. पत्रकारांसमोर विशाळगडावर झालेली अतिक्रमणे, मंदिरे-समाधी यांची दुरवस्था यांकडे पुरातत्व खात्याचे अक्षम्य दुर्लक्ष पुराव्यांनिशी मांडले. जिल्हाधिकारी, पुरातत्व विभाग आणि संबंधित शासकीय विभाग यांच्या समवेत अनेक बैठका घेऊन अतिक्रमण हटवण्याची, तसेच गडाचे पावित्र्य आणि ऐतिहासिक वारसा जपण्याची मागणी करण्यात आली. या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे विशाळगडावर बकरी कापण्यास आणि मद्यपान करण्यास बंदी घालण्यात आली. याशिवाय हिंदु विधीज्ञ परिषदेच्या मागणीनुसार विशाळगडाच्या पायथ्याशी पोलीस चौकी उभारण्यात आली.

१४ जुलै २०२४ या दिवशी विशाळगडाच्या रक्षणासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा तीव्र उद्रेक झाल्यानंतर शासनाला अतिक्रमणांविरुद्ध कारवाई करावी लागली. या कारवाईत एकूण १५८ अतिक्रमणांपैकी ११३ अतिक्रमणे हटवण्यात आली. उर्वरित ४५ अतिक्रमणांना उच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळाल्याने ती हटवता आलेली नाहीत. ही अतिक्रमणेही निष्कासित (हद्दपार) करण्यासाठी सध्या कायदेशीर लढा चालू असून गड अतिक्रमणमुक्त होईपर्यंत हा पाठपुरावा चालूच रहाणार आहे. या मोहिमेच्या वेळी मला अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि अन्य साधक यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.   

१. शिकायला मिळालेली सूत्रे

बाबासाहेब भोपळे

१ अ. सेवा करतांना अधिवक्ता वीरेंद्र यांनी स्वावलंबी बनवल्याने सेवेतील आनंद अनुभवता येणे : ‘विशाळगड अतिक्रमणाच्या संदर्भात मी जरी माहिती एकत्रित केली असली, तरी ही मोहीम आज ज्या टप्प्यावर येऊन पोचली, तिचे १०० टक्के योगदान अधिवक्ता वीरेंद्रदादांचे आहे. त्यांच्याविना ही मोहीम या टप्प्याला पोचणे शक्य नव्हते. या मोहिमेसाठी प्रत्येक टप्प्यावर ते माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. या मोहिमेचा प्रारंभ करतांना त्यांनी मला स्पष्टपणे सांगितले होते, ‘‘या प्रकरणात मी कोणताही अभ्यास करणार नाही, तसेच कोणताही कागद वाचणार नाही. तुलाच त्याचा अभ्यास करावा लागेल. तुला ‘जी माहिती मागवावी’, असे वाटते, त्याचे अर्ज तूच सिद्ध कर. केवळ काही अडचणी असतील, तर मी त्या सोडवेन आणि धोरणात्मक निर्णय देईन. या संपूर्ण विषयाचा अभ्यास तूच करायचा आहे.’’ त्यानंतर सलग ३ वर्षे दादा प्रत्येक निर्णय आणि प्रसंग यांत माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. त्यामुळेच आज ही मोहीम पुढच्या टप्प्याला पोचली आहे. बर्‍याच वेळा प्रत्यक्ष परिस्थिती आणि कायदा, तसेच आपले धोरण यांच्यामुळे आमच्या दोघांचे विचार वेगळे असत. त्या वेळी मी त्यांना सतत भ्रमणभाष करत होतो. त्या सूत्रांविषयी ‘मला काय वाटते ?’, हे मी न कंटाळता त्यांना सांगत होतो. माझे म्हणणे ऐकून घेऊन ‘काय करणे अपेक्षित आहे ?’, हे ते मला सांगत असत. माझे काही चुकत असल्यास ते मला शांतपणे समजावून सांगत असत. कधी त्या चर्चेतून माझी काही सूत्रे योग्य वाटली, तर मोकळेपणाने सांगायचे, ‘‘तू म्हणतोस त्याप्रमाणे करून पाहूया.’’ त्यामुळे त्यांच्याशी एखाद्या विषयावर बोलतांना कधीच ताण आला नाही. त्यांनी ही सेवा करतांना मला स्वावलंबी बनवले आणि मला त्या सेवेतील आनंदही अनुभवता आला.

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

१ आ. ‘प्रत्येक मोहीम हे युद्ध आहे’, असे समजून आणि ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना आवडेल’, अशी सेवा करणे : सेवेच्या संदर्भात अधिवक्ता वीरेंद्रदादांचे दृष्टीकोन माझ्यासाठी पुष्कळ महत्त्वाचे आहेत. ते कधीच कोणत्याही सेवेकडे उपक्रम म्हणून पहात नाहीत, तर युद्ध म्हणूनच पहातात. ‘विशाळगड मोहीम हेही एक युद्धच आहे’, याची त्यांनी मला सतत जाणीव करून दिली आणि त्याच पद्धतीने या सेवेकडे पहायला शिकवले. दादांचा ‘प्रत्येक सेवा करतांना कशी कृती केली ? यापेक्षा ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना आवडेल, अशी कृती करायची’, हा विचार प्राधान्याने असतो. ते कृतीच्या स्तरावरही तसेच प्रयत्न करतात. त्यामुळे ही सेवा करतांना माझ्या मनात सतत ‘गुरुदेवांना काय आवडेल ?’, असा विचार येत असे. मीही तसाच भाव ठेवून ही सेवा करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे ‘देवच सगळे सुचवतो आणि कार्यही करून घेतो’, हे मला अनुभवता आले. सतत तोच विचार राहिल्याने ही संपूर्ण मोहीम मला आध्यात्मिक स्तरावर करता आली. ‘प.पू. गुरुदेवांनी मला वीरेंद्रदादासारखा मित्र देणे, हीच त्यांची माझ्यावर कृपा आहे’, हे मी सतत अनुभवत आहे.

२. हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अंतर्गत सेवा करणार्‍या अन्य साधकांकडून शिकायला मिळालेली सूत्रे !

२ अ. अधिवक्त्या प्रीती पाटील : सांगली येथील अधिवक्त्या प्रीती पाटील यांचा छोट्या छोट्या कृतीतही मला व्यवस्थितपणा जाणवतो. त्यांचा परिपूर्ण सेवा करण्याचा प्रयत्न असतो.

२ आ. श्री. नीलेश जोशी : पुणे येथील श्री. नीलेश जोशी हे अधिवक्ता नसूनही त्यांनी ती सेवा शिकून घेतली आणि प्रत्येक कृती परिपूर्ण करण्याचा ते प्रयत्न करतात. ते साधकांना तत्परतेने साहाय्य करतात.

२ इ. अधिवक्त्या (सौ.) किशोरी कुलकर्णी : अंबरनाथ (जिल्हा ठाणे) येथील अधिवक्त्या (सौ.) किशोरी कुलकर्णी कोणत्याही कठीण प्रसंगात किंवा समोरची व्यक्ती कशीही वागली, तरी सकारात्मक रहातात. त्या म्हणतात, ‘‘सकारात्मक राहिल्याने देव आपले प्रारब्ध फेडतो आणि आपल्याला शिकायला मिळते.’’ त्यामुळे इतरांनाही सकारात्मक रहाण्यास साहाय्य होते.

हे ही वाचा → देवस्थानांचे संरक्षण, शासकीय भूमी मुक्तीसाठी प्रयत्न, धर्मांतरविरोधी लढा आणि व्यापक जनजागृती !

३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती कृतज्ञता !

विशाळगडासंदर्भातील सर्व माहिती घेतल्यानंतर ‘विशाळगड अतिक्रमण’ या विषयाची पत्रकार परिषद घेण्याचे ठरले. पत्रकार परिषदेच्या आदल्या दिवसापासून ते सकाळपर्यंत माझा कंठ भरून यायला लागला होता; कारण इतक्या मोठ्या विषयाला हात घालण्याची ना माझी बौद्धिक क्षमता आहे, ना त्या ठिकाणी घडणार्‍या प्रत्येक प्रसंगाला सामोरे जाण्याची मानसिक क्षमता आहे. तिथे घडणार्‍या प्रत्येक प्रसंगाला मी सामोरा जाऊ शकलो, ते केवळ प.पू. गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेने ! या संदर्भात जी माहिती मिळाली, तीही त्यांच्याच कृपेने ! ज्या वेळी मी या सेवेला प्रारंभ केला, त्या वेळी माझ्या आजूबाजूची परिस्थिती आणि मनाची स्थिती चांगली नव्हती. त्या वेळी प.पू. गुरुदेवांच्या कृपेने मला हा विषय मिळाला आणि कुणीही आपल्या समवेत नसले, तरी ‘प.पू. गुरुदेवांचे प्रत्येक साधकाकडे लक्ष असते’, हे पुन्हा एकदा अनुभवता आले. या मोहिमेच्या प्रत्येक टप्प्यावर ‘प.पू. गुरुदेव आमच्या समवेत आहेत’, हे मला अनुभवता आले. ३ वर्षांतील तो सगळा प्रवास आठवून माझ्या डोळ्यांतून सतत पाणी येत होते आणि एकच विचार मनात होता की, विशाळगड विषयावर होणारी पत्रकार परिषद ही आपल्यासाठी केवळ पत्रकार परिषद नाही, तर ती ‘कृतज्ञता परिषद’ आहे. या सेवेच्या ३ वर्षांच्या काळात मला साधकांनी केलेले साहाय्य आठवून त्या प्रत्येकाविषयी कृतज्ञता वाटायला लागली.

‘प.पू. गुरुदेवांनी माझी साधना होण्यासाठी ही समष्टी सेवा उपलब्ध करून दिली आहे’, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. बाबासाहेब भोपळे, कोल्हापूर (३.७.२०२६)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक