करंजाळे, पणजी येथे २७ कोटी रुपयांचा भूमी घोटाळा

पणजी, ११ जुलै (वार्ता.) – अंमलबजावणी संचालनालयाने करंजाळे येथील २७ कोटी १० लाख रुपये किमतीच्या भूमी घोटाळ्याच्या प्रकरणी उत्तर गोव्यातील विशेष न्यायालयात फादर अर्लिनो डी मेलो, फादर व्हिक्टर कॉन्सेसाओ रॉड्रीग्स, माजी सरकारी भू-सर्वेक्षक प्रभाकर राम हवालदार आणि एक खासगी ‘रिअल इस्टेट’ (बांधकाम व्यावसायिक) आस्थापन यांच्या विरोधात खटला प्रविष्ट (दाखल) केला आहे.
अंमलबजावणी संचालनालयाच्या म्हणण्यानुसार आरोपींनी फसवणूक करून एका स्थानिक कुटुंबाचे कायदेशीर कूळहक्क (टेनन्सी राइट्स) हिरावून घेतले. या प्रकरणी प्रारंभी पणजी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता आणि त्यानंतर या प्रकरणाचे अन्वेषण अंमलबजावणी संचालनालय करू लागले आहे. १८ नोव्हेंबर २००४ ते ५ डिसेंबर २००६ या कालावधीत आरोपींनी संगनमत करून सरकारी भूमी अभिलेखांमध्ये फेरफार केला. बनावट कागदपत्रांच्या आधारे पणजी शहर सर्व्हेच्या ‘पी.टी. शीट’ क्रमांक १६२ मधील ‘चलता’ क्रमांक ४४ या २ सहस्र ४७९ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूमीच्या फॉर्म ‘बी’मधील ‘होल्डर’ या सदरात अनधिकृतपणे ‘आर्चडायोसिस ऑफ गोवा अँड दमण’चे नाव नोंदवण्यात आले. यामुळे मूळ कूळधारक कुटुंबाचे कायदेशीर हक्क संपुष्टात आले. भूमीचा मालकी हक्क ‘आर्चडायोसिस’च्या नावावर झाल्यानंतर ९ एप्रिल २००७ या दिवशी ती एका खासगी रिअल इस्टेट विकासकाला विक्रीखताद्वारे अवघ्या ६१ लक्ष ९७ सहस्र रुपयांच्या मोबदल्यात विकण्यात आली. ही किंमत भूमीच्या वास्तविक बाजारमूल्याच्या तुलनेत अत्यंत अल्प होती. (यात दोन्ही फादरना विकासकाकडून आर्थिक लाभ झाल्याविना ही भूमी अल्प बाजारमूल्याने विकली गेली नसणार ! – संपादक)
त्यानंतर संबंधित विकासकाने त्या जागेवर निवासी आणि व्यावसायिक संकुल उभारले अन् त्यातील सदनिका आणि व्यावसायिक गाळे अनेक ग्राहकांना विकले. (या विकासकाचीही चौकशी झाली पाहिजे; कारण त्यालाही भूमीचे बाजारमूल्य ठाऊक असूनही त्याने अल्प किमतीत भूमी खरेदी केली असून त्याने लाच दिली असण्याची दाट शक्यता आहे ! – संपादक) या संपूर्ण व्यवहारातून अनुमाने २७ कोटी १० लाख रुपये गुन्हेगारी उत्पन्न (प्रोसीड्स ऑफ क्राइम) निर्माण झाले. १६ डिसेंबर २०२५ या दिवशी ‘ईडी’ने आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणी गोव्यातील विविध ठिकाणी धाडी घातल्या. या कारवाईच्या वेळी महत्त्वाची कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे कह्यात घेण्यात आली. या वेळी या प्रकरणी आरोपींच्या सहभागाचे पुरावे सापडल्याचा अंमलबजावणी संचालनालयाचा दावा आहे. यापूर्वी अंमलबजावणी संचालनालयाने २७ कोटी १० लाख रुपये किमतीची स्थावर मालमत्ता तात्पुरती कह्यात (प्रोव्हिजनल अटॅचमेंट) घेतली होती. यामध्ये करंजाळे येथील एक प्रसिद्ध हॉटेल-कम-रेस्टॉरंट, तसेच कथित गुन्हेगारी उत्पन्नाच्या समतुल्य मूल्याच्या आणखी २ स्थावर मालमत्ता यांचा समावेश आहे.
वैभववाडी येथे ६ गोवंशियांची अवैध वाहतूक रोखली
भात लावणीच्या शेवटच्या टप्प्यात पाऊस नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त
समाजहितासाठी योग्य निर्णय घेण्यासाठी अध्यात्म महत्त्वाचे ! – मुख्यमंत्री प्रमोद सावंत
कोकणातील हापूस आंब्याच्या संकटावर महाराष्ट्र शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी !
उष्णतेच्या लाटेमुळे वीज देयकांत वाढ ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
राज्यात बियाणांचे ३०० नमुने निकृष्ट