‘लव्ह जिहाद’ आणि हिंदु तरुणीला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्याच्या प्रकरणी ग्रामस्थांचा कागल (जिल्हा कोल्हापूर) पोलीस ठाण्यावर मोर्चा !

ग्रामस्थांनी कागल पोलीस ठाण्यावर काढलेला मोर्चा आणि ठिय्या आंदोलन

कागल (जिल्हा कोल्हापूर) – ‘लव्ह जिहाद’प्रकरणी आणि हिंदु तरुणीला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यासाठी म्हाकवे गावातील ग्रामस्थांनी कागल पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला आणि ठिय्या आंदोलन केले. यात महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. जोपर्यंत संबंधित हिंदु तरुणीला तिच्या पालकांच्या स्वाधीन करत नाही, तोपर्यंत कागल पोलीस ठाण्याच्या परिसरातून जाणार नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. ग्रामस्थांनी कागल पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या केल्या. ‘या प्रकरणी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कायदेशीर कारवाई करू’, असे आश्वासन पोलीस निरीक्षकांनी दिले.

पत्रकारांना माहिती देतांना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख श्री. विजय देवणे म्हणाले, ‘‘गेल्या २ दिवसांपासून संबंधित हिंदु तरुणी तिच्या पालकांना सापडत नसल्याने आम्ही पोलिसांना विनंती करत आहोत; मात्र पोलीस याची नोंद घेत नाहीत, तसेच आम्हाला दाद देत नाहीत. शिरोली येथे २ मासांपूर्वीच अशी घटना घडूनही पोलीस प्रशासनाने सहकार्य केले नाही. ‘लव्ह जिहाद’ करणार्‍यांची मोठी टोळी असून ती हिंदु युवतींना फूस लावून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करीत आहे. तरी या प्रकरणी दोषी असलेल्या संबंधितांवर कठोर कारवाई करून त्यांना कागल तालुक्यातून तडीपार करावे, अशी आमची मागणी आहे.’’

हिंदु युवतीचे आयुष्य उद्ध्वस्त करणार्‍या नराधमाला फाशी द्या ! – ग्रामस्थांची मागणी

या संदर्भात गावकरी महिला म्हणाल्या, ‘‘आमच्या गावची युवती परत मिळावी; म्हणून आम्ही आंदोलन करत असून संबंधित नराधमाचे हे तिसरे प्रकरण आहे. या प्रकरणी पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई केली पाहिजे. हिंदु युवतीचे आयुष्य उद्ध्वस्त करणार्‍या नराधमाला फाशी देण्यात यावी, अशी आमची मागणी आहे.’’

काय आहे नेमके प्रकरण ?

कागल येथील एका धर्मांध मुसलमान तरुणाने हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. यानंतर काही काळ त्याने हिंदु युवतीला स्वत:समवेत रहाण्यास भाग पाडले. या धर्मांध युवकाने यापूर्वी ३ हिंदु युवतींना जाळ्यात ओढून त्यांच्या चारित्र्याशी खेळ केला आहे. हा सगळा प्रकार ग्रामस्थ आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या लक्षात येताच सर्वांनी तात्काळ या प्रकरणाविरोधात आवाज उठवला. या प्रकरणी ग्रामस्थांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावरही मोर्चा काढून संबंधितांवर कारवाईची मागणी केली होती.

संपादकीय भूमिका

‘लव्ह जिहाद’ प्रकरणी कठोर कारवाई होत नसल्याने धर्मांध मुसलमानांचे फावते आणि अशा घटनांची वारंवारता वाढते. आता तरी शासनाने ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा तातडीनेलागू करणे अपेक्षित आहे !