उष्णतेच्या लाटेमुळे वीज देयकांत वाढ ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

मुंबई – राज्यात स्मार्ट मीटरमुळे नव्हे, तर हवामानातील पालट, उष्णतेची लाट आणि लांबलेला पाऊस यांमुळे वीज देयकांत वाढ झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

राज्यात अनेक ठिकाणी भारनियमन होत असून ‘स्मार्ट मीटर’मुळे भरमसाठ वीजदेयके येत असल्याचा आरोप विधानसभेत सदस्यांनी केला होता. त्यावर ‘राज्यात कुठेही भारनिमन नाही; पण ग्रामीण भागात काही ठिकाणी वीज मिळत नाही. जे ग्राहक कृषी फिडरवर (कृषीपंपांना वीजपुरवठा करणार्‍या विद्युतवाहिनीवर) आहेत, त्यांना रात्री वीज मिळत नाही; कारण ज्या ७६ टक्के कृषी फिडरना दिवसा वीज दिली जाते, त्यांची रात्री वीज बंद केली जाते. त्यामुळे त्यांना भारनियमन वाटते, असे फडणवीस यांनी सांगितले.

राज्यात १ कोटी २३ लाख स्मार्ट मीटर लावण्यात आले आहेत. त्यांपैकी ३ लाख ९२ सहस्र ग्राहकांकडून तक्रारी आल्या. त्यांपैकी केवळ २१० तकारीमध्ये तथ्य आहे. स्मार्ट मीटर वापरणार्‍यांना दिवसा वीज सवलत दिली जाते. तरीही वीज देयक अधिक आल्याच्या लोकांच्या तक्रारी येत आहेत, भरमसाठ देयके येण्यास स्मार्ट मीटर नव्हे, तर हवामानातील पालट आणि उष्णतेची लाट कारणीभूत आहे, असे ते म्हणाले.