पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीच्या रासायनिक लेपनास न्यायालयाची स्थगिती !

वारकरी संघटना आणि मंदिर महासंघ यांनी प्रविष्ट केलेल्या याचिकेवर पंढरपूर येथील न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

पंढरपूर – येथील कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत असलेल्या ‘स्वयंभू’ श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर पुरातत्व विभागाद्वारे २३ आणि २४ जून या दिवशी रासायनिक वज्रलेपन करण्यात येणार होते. या संदर्भात वारकरी संघटना, मंदिर महासंघ, तसेच महाराष्ट्र मंदिर महासंघाचे श्री. पुरुषोत्तम (गणेश) लंके आणि बाळकृष्ण डिंगरे यांनी पंढरपूर येथील दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) श्रीमती सोनाली राऊळ यांच्या न्यायालयात रासायनिक वज्रलेपनाच्या विरोधात दावा प्रविष्ट केला होता. या प्रकरणी दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने पुढील आदेश मिळेपर्यंत कोणत्याही प्रकारचे लेपन करण्यास स्थगिती दिली आहे.

या संदर्भात पत्रकारांना अधिक माहिती देतांना या प्रकरणात बाजू मांडणारे अधिवक्ता सुधीर रानडे यांनी पुढील माहिती दिली.

१. आतापर्यंत मंदिर समितीने ४ वेळा रासायनिक लेपन केले आणि त्यातील फोलपणा लक्षात येऊनही परत मंदिरे समिती आणि पुरातत्व विभाग रासायनिक लेपनावर ठाम होता. हिंदु धर्म शास्त्राप्रमाणे मूर्तीमध्ये प्राण असतात आणि ‘प्रत्यक्ष देव तिथे आहे, मूर्तीमध्ये देवत्व आहे’, असे समजूनच भाविकांकडून सर्व कृती केल्या जातात. यात काकड आरती, शेजारतीपासून ते नैवेद्यापर्यंतच कृतींचा समावेश असतो. त्यामुळे मंदिरे समिती रासायनिक लेपन करतांना केवळ दगडाची मूर्ती समजून रासायनिक लेपनाची कृती करत आहे ती चुकीची आहे. मूर्तीला जर अपवित्र वस्तूंचा स्पर्श झाल्यास मूर्तीचे देवत्व नष्ट होते.

२. या प्रसंगी न्यायालयात बाजू मांडतांना महाकालेश्वर मंदिर प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचाही आधार देण्यात आला. यात भक्तांच्या धार्मिक भावना दुखावणारे निर्णय घेता येणार नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायालयात करवीर पीठाच्या शंकराचार्यांचे पत्र सादर करण्यात आले. ज्यात त्यांनी रासायनिक लेपनास स्पष्ट विरोध केल्याचे नमूद केले आहे. याचीही नोंद न्यायालयाने घेतली.

३. केवळ एवढ्यावरच न थांबता मूर्ती संवर्धनासाठी आयुर्वेदिक वज्रलेप हा अधिक सुरक्षित आणि परंपरेस अनुरूप असल्याचे न्यायालयात सांगण्यात आले.

मूर्तीचे पावित्र्य जपण्यासाठी धर्मशास्त्रीय भूमिकेचा विजय ! – सुनील घनवट, राष्ट्रीय संघटक, महाराष्ट्र मंदिर महासंघ

पंढरपूर – न्यायालयाचा निर्णय हा मूर्तीचे पावित्र्य जपण्यासाठी धर्मशास्त्रीय भूमिकेचा विजय आहे. या निर्णयाविषयी आम्ही समाधानी आहोत, असे महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी सांगितले. याविषयी प्रसिद्धीपत्रकाद्वारे भूमिका मांडतांना श्री. सुनील घनवट पुढे म्हणाले की, तब्बल २८ युगे विटेवर सुखरूप उभा असणार्‍या पांडुरंगाच्या मूर्तीच्या पायाला कोरोना महामारीच्या काळात खड्डा कसा पडला ? आणि श्री रुक्मिणीमातेचे पाय का खराब झाले ? याचे कोणतेही शास्त्रीय उत्तर अद्याप मंदिरे समिती किंवा पुरातत्व विभाग यांना देता आलेले नाही.

रासायनिक लेपनाच्या संदर्भात जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत केवळ मते नोंदवली गेली; मात्र कोणती रसायने वापरणार ? आणि संवर्धन कसे करणार ? याची कोणतीही स्पष्ट माहिती प्रशासनाने दिली नाही. अचानक पत्रक काढून मंदिर बंद ठेवत वज्रलेपाचा निर्णय घोषित केल्याने भाविकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला. मूर्ती संवर्धनासाठी ‘आयुर्वेदिक वज्रलेप’ हा अधिक सुरक्षित आणि परंपरेस अनुरूप असल्याचे आम्ही न्यायालयात सप्रमाण मांडले आहे. यापुढील काळात तरी मंदिर समिती वारकरी, धर्माचार्य, संत-महंत आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या भावनांचा आदर करील, अशी आम्हाला आशा आहे.

प्रसिद्धीपत्रकात श्री. घनवट यांनी पुढे नमूद केले की,

१. हिंदु धर्मशास्त्रानुसार मूर्ती ही केवळ दगडी किंवा पाषाण शिल्प नसून त्यात साक्षात देवत्व (प्राण) असते. मंदिर समिती केवळ ‘दगडाची मूर्ती’ समजून कृत्रिम आणि अपवित्र रासायनिक पदार्थांचा (उदा. इपॉक्सी) वापर करत आहे, ज्यामुळे मूर्तीचे देवत्व नष्ट होऊ शकते.

२. आतापर्यंत ४ वेळा रासायनिक लेपन करूनही त्याचा फोलपणा सिद्ध झाला आहे. कृत्रिम रसायनांमुळे पाषाणाचे नैसर्गिक श्वसन रोखले जाऊन मूर्ती आतून अधिक ठिसूळ होण्याचा मोठा धोका आहे. करवीर पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य यांनी या रासायनिक लेपनास स्पष्ट विरोध करणारे पत्र दिले असून न्यायालयाने त्याचीही नोंद घेतली आहे.