श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी ९ ऑगस्टला होणार कारसेवा !

  • ‘आता नाही, तर कधीच नाही ! ’ - हरिद्वार येथे ६०० ते ७०० संतांच्या बैठकीत घोषणा

  • प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे सांगत विहिंपने कारसेवेपासून अंतर राखले  

  • उत्तरप्रदेश सरकारने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही

(‘कारसेवा’ म्हणजे श्रीकृष्णजन्मभूमी प्राप्त करण्यासाठीचा लढा)

मथुरा (उत्तरप्रदेश) – येथील श्रीकृष्णजन्मभूमी आणि शाही ईदगाह मशीद वादावरून संतांनी आगामी ९ ऑगस्ट या दिवशी येथे कारसेवा करण्याची घोषणा केली आहे. येथे श्रीकृष्णाचा जन्म ज्या ठिकाणी झाला, त्या ठिकाणी ईदगाह मशीद बांधण्यात आली आहे. संतांच्या या आवाहनापासून विश्व हिंदु परिषदेने अधिकृतपणे अंतर राखले आहे. विहिंपचे ब्रज प्रांत अध्यक्ष कन्हैयालाल अग्रवाल यांनी स्पष्ट केले की, हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय येथे न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे संतांनी कायदेशीर प्रक्रियेचा सन्मान केला पाहिजे. (श्रीरामजन्मभूमीचे प्रकरणी न्यायप्रविष्ट असतांनाही विहिंपने तेथे कारसेवा करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे श्रीकृष्णजन्मभूमीविषयीची भूमिका कुणाला वेगळी वाटली, तर आश्चर्य वाटू नये ! – संपादक) भाजपकडून या आवाहनावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही. तसेच उत्तरप्रदेश सरकारकडूनही यावर भूमिका मांडण्यात आलेली नाही.  चित्रगुप्त पीठाधीश्वर स्वामी सच्चिदानंद महाराज यांनी या कारसेवेत सहभागी होण्यासाठी विविध राजकीय पक्षांनाही एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत रवींद्र पुरी यांनीही या कारसेवेला पाठिंबा दिला असून सर्व भक्तांना ‘चला मथुरेला जाऊ’ असे आवाहन केले आहे. काली सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी आनंद स्वरूप यांनी ९ ऑगस्टच्या कारसेवेच्या समर्थनार्थ देशभरातील संतांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. हरिद्वार येथे आयोजित एका महत्त्वाच्या बैठकीनंतर संतांनी ‘आता नाही, तर कधीच नाही’ अशी घोषणा केली. या बैठकीत महंत रवींद्र पुरी, आनंद आखाड्याचे महामंडलेश्वर जगद्गुरु स्वामी सच्चिदानंद आणि स्वामी बालकानंद प्रामुख्याने उपस्थित होते.

स्वामी सच्चिदानंद महाराज यांनी मथुरेच्या निर्मोही आखाड्यात संतांसमवेत बैठक घेऊन कारसेवेची रणनीती सिद्ध केली आहे. निर्मोही आखाड्याच्या संतांनीही श्रीकृष्णजन्मभूमी मुक्ती अभियानाला पाठिंबा दिला आहे. या बैठकीनंतर कारसेवेच्या संदर्भातील भित्तीपत्रकेही प्रसारित करण्यात आली आहेत. स्वामी सच्चिदानंद महाराज म्हणाले की, ऑगस्ट हा क्रांतीचा महिना आहे. आम्ही वर्ष १९९० मध्ये भगवान श्री रामलल्लासाठी झालेल्या कारसेवेच्या धर्तीवर श्रीकृष्णाच्या मुक्तीसाठी आंदोलनाची सिद्धता केली आहे. प्रारंभी ‘बृजवासी कारसेवा’ होईल. ब्रजमधील लोक बांके बिहारींसाठी एकत्र येतील आणि त्यानंतर इतर ठिकाणचे लोक येऊन श्रीकृष्णजन्मभूमी मुक्त करतील.

अखिलेश यादव यांनीही आंदोलनाचा भाग व्हावे ! –  सीताराम दास महाराज

निर्मोही आखाड्याचे राष्ट्रीय प्रवक्ते संत सीताराम दास महाराज

निर्मोही आखाड्याचे राष्ट्रीय प्रवक्ते संत सीताराम दास महाराज यांनी सांगितले की, श्रीकृष्णजन्मभूमीच्या मुक्तीसाठी सर्व सनातनी हिंदूंना एकत्र यावे लागेल. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव हे श्रीकृष्णाचे वंशज आहेत. त्यामुळे त्यांनीही या आंदोलनाचा भाग बनले पाहिजे.

मथुरेतील कारसेवेच्या घोषणेला अयोध्येतील संत समाजाचा पाठिंबा

अयोध्येतील संत समाजाने कारसेवेच्या घोषणेचे स्वागत केले आहे. ज्याप्रमाणे अयोध्येत श्रीराममंदिराची निर्मिती झाली, त्याच धर्तीवर श्रीकृष्णजन्मभूमीतही भव्य मंदिर उभारले जाईल, असा विश्वास साधू-संतांनी व्यक्त केला आहे. अयोध्येच्या साकेत भवनचे महंत सीताराम दास यांनी सांगितले की, ज्याप्रमाणे कारसेवक आणि संत यांनी अयोध्येत कारसेवा करून वादग्रस्त वास्तू पाडली होती, तशाच प्रकारच्या आंदोलनाची वेळ आता आली आहे. हा सनातन्यांच्या श्रद्धेचा विषय आहे.

श्रीरामजन्मभूमीचे मुख्य पुजारी महंत सत्येंद्र दासजी महाराज म्हणाले की, ज्याप्रमाणे संतांनी श्रीरामजन्मभूमी आंदोलन चालू केले होते आणि आज ५०० वर्षांचा कलंक मिटवून अयोध्येत भव्य मंदिर साकारले आहे, त्याच भावनेने अयोध्येच्या संतांनी देशभरातील संतांसह मथुरेसाठीही निर्णय घेतला आहे.

प्रसिद्ध कथावाचक चंद्रांशु महाराज म्हणाले की, आम्ही नेहमीच ‘अयोध्या तो केवल झांकी है, काशी-मथुरा बाकी है’ अशा घोषणा देत आलो आहोत. अयोध्येत भव्य मंदिर बनले आहे आणि आता पुढील कूच पुरुषोत्तम श्रीकृष्णाच्या जन्मभूमीसाठी आहे.

सरकारने मंदिर बांधकामाची घोषणा झाल्यास कारसेवेची आवश्यकता नसेल !

स्वामी आनंद स्वरूप यांनी स्पष्ट केले की, ९ ऑगस्ट हा दिवस देशात ‘क्रांती दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. जर सरकारने यापूर्वीच मंदिर बांधकामाची अधिकृत घोषणा केली, तर कारसेवेची आवश्यकता भासणार नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आधीच सांगितले आहे की, श्रीकृष्णमंदिर नक्कीच बांधले जाईल. जर ९ ऑगस्टपूर्वी याची दिनांक घोषित झाली नाही, तर संत समाज कारसेवेच्या माध्यमातून शांततापूर्ण मार्गाने भावना व्यक्त करील. या कारसेवेसाठी एकट्या हरिद्वारमधून ६०० ते ७०० संत मथुरेला जाणार आहेत.

सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांत प्रकरण न्यायप्रविष्ट

श्रीकृष्णजन्मभूमी विवाद सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. तसेच संबंधित १८ खटल्यांची सुनावणी अलाहाबाद उच्च न्यायालयातही चालू आहे, ज्यामध्ये शाही ईदगाह मशीद हटवण्याची आणि मंदिराची पुनर्स्थापना करण्याची मागणी करण्यात आली आहे.