मुंबईत विधी प्रशिक्षणाचा विद्यार्थ्यांनी घेतला लाभ !

मुंबई – ‘दर्द से हमदर्द तक’ ट्रस्ट, ‘जिल्हा सेवा विधी प्राधिकरण’ (डिस्ट्रीक्ट लीगल सर्व्हिसेस ऑथोरिटी) आणि ‘सुप्रा लीगल फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने १६ मे ते १३ जून या कालावधीत विधी प्रशिक्षण (लीगल इंटर्नशिप) आयोजित करण्यात आले होते. राज्यातील विविध विधी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी कायदेविषयक प्रशिक्षणाचा लाभ घेतला.

समारोपाच्या कार्यक्रमात व्यासपिठावर उपस्थित डावीकडून अधिवक्ता सतीश गोरडे, अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर, निवृत्त न्यायमूर्ती श्रीराम मोडक, पवनकुमार तपाडिया, अधिवक्ता सुनीता खंडाळे-साळसिंगीकर

‘जिल्हा विधी सेवा प्राधिकरणा’चे सचिव पवनकुमार तपाडिया यांच्या हस्ते या प्रशिक्षणाचे उद्घाटन झाले. न्यायव्यवस्थेविषयीची माहिती, कायदेशीर प्रक्रिया, सामाजिक न्याय आणि विधी सेवा यांविषयीचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, या उद्देशाने या प्रशिक्षणामध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. प्रथम माहिती अहवाल ऑनलाईन कसा शोधावा ? कायदेशीर नोटीस कशी सिद्ध करावी ? वकालतनामा सिद्ध करणे, न्यायालयीन कार्यपद्धती, तसेच विधी साहाय्य यांविषयीचे प्रशिक्षण देण्यात आले.

प्रशिक्षक अधिवक्त्यांसह प्रशिक्षणात सहभागी विद्यार्थी

विविध संस्थांना भेटी !

या प्रशिक्षणाच्या अंतर्गत पोलीस ठाणे, मुंबई उच्च न्यायालय, सत्र न्यायालय, लघुवाद न्यायालय, आर्थर रोड कारागृह, बालसुधारगृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर येथील निवासस्थान (राजगृह) आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्मारक, तसेच सामाजिक कार्य करणार्‍या संस्था यांना भेटी देण्यात आल्या. या भेटींमुळे विद्यार्थ्यांना न्यायव्यवस्था, सामाजिक कार्य, मानवाधिकार आणि समाजसेवा अशा विविध पैलूंचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला. मुंबई उच्च न्यायालयातील वरिष्ठ विधीज्ञ, न्यायाधीश आणि विविध क्षेत्रांतील तज्ञ यांचे मार्गदर्शनही विद्यार्थ्यांना लाभले. प्रशिक्षणाच्या समारोपाला निवृत्त न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या हस्ते प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली.

समारोपाच्या कार्यक्रमाच्या वेळी अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर ‘दर्द से हमदर्द तक’ संस्थेच्या कार्याची माहिती सांगितली. या वेळी न्यायाधीश प्रशांत कुलकर्णी, अधिवक्ता सुहास पडवळ, अधिवक्ता गणेश नागरगोजे, अधिवक्ता मंगेश खराबे, अधिवक्ता भूषण पाटील, अधिवक्ता ओंकार पाटील, अधिवक्ता विघ्नेश्वर सुब्रह्मण्यम्, अधिवक्ता नितीन हजारे उपस्थित होते. या वेळी अधिवक्ता सायली वाणी यांनी सूत्रसंचालन केले, तर अधिवक्ता सतीश गोरडे यांनी आभार मानले.

अधिवक्ता होण्यासाठी कायद्याच्या शिक्षणासह अनुभवजन्य ज्ञानही महत्त्वाचे ! – श्रीराम मोडक, निवृत्त न्यायमूर्ती

श्री. श्रीराम मोडक, निवृत्त न्यायमूर्ती

काही वेळा जामीनपात्र गुन्हा असूनही कुणीही पाठीशी नसल्यामुळे बंदीवानांना कारागृहात खितपत रहावे लागते. अशा बंदीवानांसाठी मानवतेच्या दृष्टीकोनातून ‘दर्द से हमदर्द तक’ या संस्थेचे कार्य खरोखरच स्तुत्य आहे. अधिवक्ता होण्यासाठी महाविद्यालयातून कायद्याचे शिक्षण दिले जाते; मात्र प्रत्यक्षात काम करतांना ते पुरेसे नाही. आरोपीची दुसरी बाजू, बंदीवानांप्रती संवेदनशीलता हेही महत्त्वाचे आहे. जोपर्यंत दोषसिद्धी होत नाही, तोपर्यंत कुणालाही गुन्हेगार मानता येत नाही.

हे ही वाचा → अधिवक्त्यांचे संघटन करून त्यांना समाज आणि राष्ट्र कार्यात सहभागी करून घेणारे मुंबई येथील अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर !