१८.६.२०२६ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात ‘अवतारांचे भक्त आणि मनुष्य यांच्या संदर्भातील कार्य’ यांविषयी पाहिले. आज पुढील भाग पाहू. (भाग ६)
याच्या आधीचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/1052148.html

९ इ. चातुर्वर्ण्य आणि चार आश्रम यांची घडी बसवणे : ‘सनातन धर्म चातुर्वर्ण्ययुक्त आहे. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेत म्हटले आहे,
चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः ।
तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम् ।।
– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ४, श्लोक १३
अर्थ : मी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या चार वर्णांचा समूह गुण अन् कर्म यांच्या विभागाने निर्माण केला आहे. अशा रितीने त्या सृष्टीरचना इत्यादी कर्मांचा मी कर्ता असूनही मला (अविनाशी परमात्म्याला) तू वास्तविक अकर्ताच समज.
जगद्गुरु श्री शंकराचार्यांनी शांकरभाष्यात सांगितले आहे की, ब्राह्मणांवर क्षत्रियांचा, क्षत्रियांवर वैश्यांचा आणि वैश्यांवर शूद्रांचा धर्म अवलंबून आहे; म्हणून ब्राह्मणांनी आपला धर्म सोडला नाही, तर क्षत्रियांची धर्मनीती चांगली रहाते. ती चांगली राहिली की, त्यावर वैश्यांची स्थिती चांगली रहाते. वैश्यांची स्थिती चांगली राहिल्यास शूद्रांचीही स्थिती चांगली रहाते. जगात ब्राह्म आणि क्षात्र ही दोन तेजे आहेत. या तेजांचे जीवन परस्परपूरक आहे. ही दोन्ही एकवटून राहिली, तरच विश्वशांती नांदेल. ‘धर्मग्लानी’चा अर्थ ‘चातुर्वर्ण्याची घडी विस्कटणे’, असा आहे. त्यामुळे जेव्हा मानवजात नीतीभ्रष्ट होण्याची भीती वाटू लागते, तेव्हा अवतारांना मनुष्याची बुद्धी शुद्ध करण्यासाठी पृथ्वीवर यावे लागते.
९ इ १. भगवान परशुराम : ‘भगवान परशुरामाने उन्मत्त झालेल्या कार्तवीर्य सहस्रार्जुनासारख्या असंख्य क्षत्रियांचा नाश करून चातुर्वर्ण्य (टीप १) आणि चार आश्रम (टीप २) यांची विस्कटलेली घडी बसवून धर्माची पुनर्स्थापना केली.’ (साभार : https://www.vedaboys.com/who-was-kartavirya-arjuna-why-he-was-killed-by-parashurama/)

टीप १ – चातुर्वर्ण्य : ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे चार वर्ण आहेत. वर्ण म्हणजे जाती नव्हेत.
टीप २ – चार आश्रम : ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास
९ इ २. भगवान श्रीकृष्ण : ‘भगवान श्रीकृष्णाने पुढीलप्रमाणे चारही वर्णांनुसार साधना करून आदर्श निर्माण केला.
अ. ब्राह्मण वर्ण : अर्जुनाला श्रीमद्भगवद्गीता सांगणे
आ. क्षत्रिय वर्ण : असुर आणि उन्मत्त राजे यांच्याशी युद्ध करून त्यांचा विनाश करणे
इ. वैश्य वर्ण : मय दानवाला पांडवांसाठी सधन आणि संपन्न असलेल्या इंद्रप्रस्थ राज्याची निर्मिती करण्याचा आदेश देणे अन् सुदाम्याला सुवर्णाची सुदामपुरी दान करणे
ई. शूद्र वर्ण : पांडवांच्या राजसूय यज्ञामध्ये ऋषिमुनींच्या भोजनाच्या उष्ट्या पत्रावळ्या उचलणे
श्रीकृष्णाने महाभारताच्या युद्धानंतर सम्राट युधिष्ठिराचा राज्याभिषेक करून त्याला चार वर्णांची आणि चार आश्रमांची विस्कटलेली घडी पुन्हा बसवून धर्मराज्य करण्याचा आदेश दिला. (सुश्री मधुरा भोसले यांना या धारिकेतील लिखाणाचे टंकलेखन करतांना सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान)
९ ई. वैयक्तिक आध्यात्मिक उन्नतीसह मनुष्याच्या सामूहिक आध्यात्मिक उन्नतीसाठी अवताराची आवश्यकता भासणे : साधनेला अनुकूल काळात केवळ वैयक्तिक आध्यात्मिक उन्नतीसाठीच नव्हे, तर मनुष्याची सामूहिक आध्यात्मिक उन्नती करून घेण्यासाठी अवताराची आवश्यकता भासते. जेव्हा वैयक्तिक उन्नती करू इच्छिणार्यांच्या साधनेत मोठा अडथळा उत्पन्न होतो, तेव्हा ईश्वराच्या अवताराची आवश्यकता असते.
९ ई १. शिवाने आद्य शंकराचार्यांचा अवतार धारण करून अनेकांची आध्यात्मिक उन्नती करून घेणे : ‘शिवाने आद्य शंकराचार्यांच्या रूपात अवतार धारण करून धर्मभ्रष्ट झालेल्या हिंदु समाजाला धर्माचरण आणि साधना यांची शिकवण दिली, तसेच त्यांच्याकडून नियमितपणे धर्माचरण अन् साधना होण्यासाठी भारतात चार दिशांना चार धर्मपिठांची स्थापना केली. आद्य शंकराचार्यांनी अनेक विद्वानांना धर्मविवादात पराभूत करून त्यांना शिष्य बनवले आणि त्यांचा उद्धार केला. त्यांनी भारतात विविध राज्यांमध्ये विखुरलेल्या हिंदु समाजाला भारतरूपी हिंदु राष्ट्र बनवून एका छत्राखाली आणले, तसेच नेपाळमध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना केली.’ (साभार : https://en.wikipedia.org/wiki/Adi_Shankara)
९ उ. स्वतःसह इतर अनेक सिद्ध साधकांना अवतार घ्यायला लावून लोकांमध्ये सत्प्रवृत्तीची जोपासना करणे : ‘काही अवतार इतरांना साधनेसाठी प्रवृत्त करण्यासाठी अनेक सिद्धांना पृथ्वीवर पुनःपुन्हा जन्म घेण्यास सांगून मानवजातीचा आध्यात्मिक उत्कर्ष करतात.
९ उ १. प्रभु श्रीराम आणि जनक राजा : प्रभु श्रीरामाच्या अवताराच्या आधी जनक राजाच्या रूपाने ऋषिलोकातील श्रेष्ठ ऋषींना पृथ्वीवर मानवी देह धारण करून आदर्श राजर्षींचे उदाहरण निर्माण करण्यासाठी मनुष्य रूपात अवतरित व्हावे लागले.’ (सुश्री मधुरा भोसले यांना या धारिकेतील लिखाणाचे टंकलेखन करतांना सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान)
९ उ २. वाल्मीकिऋषि आणि संत तुलसीदास : ‘प्रभु श्रीरामाच्या कृपेनेच महर्षि वाल्मीकि यांनी कलियुगात संत तुलसीदास यांचा मनुष्यजन्म धारण करून रामभक्तीचा आदर्श प्रस्थापित केला.’ (सुश्री मधुरा भोसले यांना या धारिकेतील लिखाणाचे टंकलेखन करतांना सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान)
९ उ ३. उद्धव आणि संत नामदेव : भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने उद्धवाने कलियुगात संत नामदेवांचा मनुष्यजन्म धारण करून विठ्ठलभक्तीचा आदर्श सर्वांसमोर निर्माण केला.
१०. अन्य योनींतील जिवांचा उद्धार करणे
भगवंत अत्यंत व्यापक असल्यामुळे केवळ मनुष्याचाच उद्धार करत नसून तो चराचरातील आणि ८४ लक्ष योनींत अडकलेल्या विविध जिवांचाही उद्धार करत असतो.
१० अ. पतित झालेल्या जिवांना मनुष्यत्व प्राप्त करून देणे

१० अ १. प्रभु श्रीरामाने शिळा म्हणून पडलेल्या शापग्रस्त अहिल्येचा उद्धार करणे : ‘गौतमऋषींची पत्नी अहिल्या ही परम पतीव्रता आणि रूपवती होती. तिच्या रूपावर मोहून इंद्राने गौतमऋषींचे रूप धारण करून अहिल्येचे शील भ्रष्ट केले. तेव्हा गौतमऋषींनी इंद्राला त्याच्या देहावर कोड येऊन त्याचे रूप आणि यौवन नष्ट होण्याचा शाप दिला. त्यांनी अहिल्येला शिळा होण्याचा शाप दिला आणि ‘त्रेतायुगात प्रभु श्रीरामच तुझा उद्धार करतील’, असा उःशापही दिला. त्याप्रमाणे जेव्हा त्रेतायुगात विश्वामित्रऋषि श्रीराम आणि लक्ष्मण यांना दंडकारण्यातून मिथिला नगरीकडे घेऊन जात होते, तेव्हा त्यांनी श्रीराम आणि लक्ष्मण यांना वाटेत असणार्या गौतमाश्रमात नेले. तेथे गुरु विश्वामित्रऋषींच्या आज्ञेने प्रभु श्रीरामाने शिळास्वरूप असणार्या अहिल्येचा चरणस्पर्श करताच अहिल्येचे शिळास्वरूप नष्ट होऊन तिला दिव्य देह प्राप्त झाला. अशा प्रकारे प्रभु श्रीरामाने शापित अहिल्येचा उद्धार केला.’(साभार : https://www.hinduwebsite.com/hinduism/concepts/ahalya.asp)
१० अ २. श्रीरामाने शापित दनु गंधर्वाला मुक्ती देणे : ‘प्रभु श्रीराम लक्ष्मणासह सीताशोधार्थ निघाला असतांना त्याला अरण्यात एका वृक्षाच्या फांद्यांनी विळखा घातला. या मांसाहारी वृक्षामध्ये कबंध नावाचा राक्षस वास करत होता. तो दनु नावाचा गंधर्व होता. त्याने एका ऋषींचा अपमान केल्यामुळे त्याला कबंधनामक राक्षसाची योनी प्राप्त झाली होती. हे सर्व जाणून प्रभु श्रीरामाने त्याला विळखा घातलेल्या मांसाहारी वृक्षाच्या फांद्या छाटून त्याचे खोड तोडून ते जाळले. त्यामुळे कबंध राक्षसाला मुक्ती मिळून तो पुन्हा दनु नावाचा गंधर्व झाला आणि स्वर्गलोकी परतला.’ (साभार : https://jipandit.com/shree-ram-and-kabandh-rakshas-story/)

१० अ ३. श्रीकृष्णाने यक्षराज कुबेराच्या वृक्ष बनलेल्या दोन्ही पुत्रांचा उद्धार करणे : ‘भगवान श्रीकृष्णाने यमलार्जुन नावाच्या वृक्ष बनलेल्या पतित झालेल्या यक्षराज कुबेराचे पुत्र नलकुबेर आणि मणिग्रीव यांना उखळाने पाडले अन् त्यांना वृक्षयोनीतून मुक्त केले.’ (साभार : https://iskcondesiretree.com/profiles/blogs/lord-krishna-s-damodar-leela-liberation-of-nalkuber-and-manigreev)
१० आ. तळागाळातील जिवांचा उद्धार करणे : काही वेळा पुण्यात्मेही चुकीचे कर्म करून पतित होतात. तेव्हा अशा तळागळातील जिवांचा उद्धार करण्यासाठी भगवंताचा अवतार कार्यरत होतो.
१० आ १. श्रीकृष्णाने बळीराजाची पुत्री रत्नमाला हिचा उद्धार करणे : ‘बळीराजाची पुत्री सत्ययुगात रत्नमाला होती. वामनाचे रूप पाहिल्यावर तिच्यातील वात्सल्य जागृत झाले आणि तिच्या मनात त्याला पुत्ररूपाने प्राप्त करण्याची कामना निर्माण झाली होती. त्याचप्रमाणे जेव्हा वामनाने बळीराजाचे दमन करून त्याला पाताळात नेले, तेव्हा रत्नमालेच्या मनात वामनाला विष देऊन मारण्याची इच्छा झाली. तिच्या दोन्ही इच्छांची पूर्ती करण्यासाठी ईश्वरेच्छेने तिला द्वापरयुगात पूतनेचा जन्म मिळाला. कंसाच्या सांगण्यावरून पूतना राक्षसी बाळकृष्णाला विषारी दूध पाजून मारण्यासाठी गोकुळात आली. तेव्हा बाळकृष्णाने तिचे स्तनपान करत असतांना तिचे प्राण दुधासहित खेचून घेतले. त्यामुळे तिचा अंत झाला आणि तिची राक्षसी योनीतून मुक्तता होऊन तिला रत्नमालारूपी दिव्य देह प्राप्त झाला. तिला देवमातेचा मान लाभला आणि तिने स्वर्गलोकात गमन केले.’ (साभार : https://www.timesnownews.com/spiritual/religion/article/the-story-of-putana-the-demoness-who-attempted-to-kill-baby-krishna-and-why-lord-vishnu-called-her-mata/592140)
१० आ २. श्रीकृष्णाचा कलियुगातील अंशावतार आणि ज्ञानावतार असलेल्या संत ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवून घेऊन त्याला सद्गती देणे : ‘जेव्हा संत ज्ञानेश्वर त्यांच्या भावंडांसह पैठणच्या धर्मसभेत शुद्धीपत्र मागण्यासाठी गेले, तेव्हा धर्ममार्तंडांनी त्यांच्या शुद्धीचे प्रमाण मागितले. त्या वेळी संत ज्ञानेश्वरांनी रस्त्यावरून जाणार्या एका रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला. तेव्हा संत ज्ञानेश्वरांच्या चैतन्यदायी कृपेमुळे रेड्याने चारही वेदांतील मंत्र सुस्पष्टपणे आणि खड्या आवाजात म्हणून दाखवले. त्यामुळे त्या रेड्याला सद्गती मिळाली आणि त्याच्या मृत्यूनंतर तो विष्णुलोकात गेला. या रेड्याची समाधी पुणे येथील ‘आळेफाटा’ या ठिकाणी आहे.’ (साभार : https://www.inmarathi.io/sant-dnyaneshwar-information-in-marathi/ आणि सुश्री मधुरा भोसले यांना या धारिकेचे टंकलेखन करतांना सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान)
१० आ ३. आद्य शंकराचार्यांचा शिष्य पद्मपाद याच्या माध्यमातून कापालिकांना सद्गती मिळणे : ‘आद्य शंकराचार्य यांचा शिष्य पद्मपाद याने नरसिंहावतार धारण करून एका कापालिकाचा (टीप ३) वध केला आणि आद्य शंकराचार्यांचे रक्षण केले. या घटनेनंतर अनेक कापालिक आद्य शंकराचार्यांना शरण आले. अशा प्रकारे पाशवी बनलेल्या कापालिकांचा उद्धार होऊन त्यांना सद्गती मिळाली.’ (साभार : https://biographyinmarathi.com/adi-shankaracharya-information-in-marathi / आणि सुश्री मधुरा भोसले यांना या धारिकेतील लिखाणाचे टंकलेखन करतांना सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान)
टीप ३ – कापालिक : शिवाच्या अघोर रूपाची आणि उग्र स्वरूपाची तांत्रिक साधना करणारा
११. अन्य अवतारी कार्ये

भगवंताच्या मुख्य अवतारी कार्यासह अन्य अवतारी कार्ये पुढीलप्रमाणे आहेत.
११ अ. ठिकठिकाणी भावी कार्यासाठी शक्ती साठवून ठेवणे : ‘भविष्यकाळात साधकांना साधना करण्यासाठी आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त व्हावी आणि पतित झालेल्या जिवांचा उद्धार व्हावा’, यासाठी अनेक अवतार ठिकठिकाणी राहून साधना, तप किंवा अवतारी कार्य करून विशिष्ट ठिकाणी दैवी आणि आध्यात्मिक शक्ती साठवून ठेवतात. त्यामुळे त्या स्थानांना तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त होते.
११ अ १. दत्तावतारांनी सिद्ध केलेली तीर्थक्षेत्रे : ‘श्री दत्तात्रेयांचे अवतार नृसिंह सरस्वती यांनी औदुंबर आणि श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे तप केले अन् गाणगापूर क्षेत्री कार्य केले. त्यामुळे ही ठिकाणे आता दत्तक्षेत्रे आणि तीर्थस्थाने म्हणून विख्यात झाली आहेत. त्याचप्रमाणे दत्तावतारी संत स्वामी समर्थ यांनी त्यांची शक्ती अक्कलकोट येथे ठेवल्याने तेही जागृत तीर्थस्थान बनले आहे.’ (साभार : https://www.sreedattavaibhavam.org/shree-kshetra-narasimha-wadi/ आणि सुश्री मधुरा भोसले यांना या धारिकेचे टंकलेखन करतांना सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान)
११ अ २. भगवान श्रीकृष्णाने सिद्ध केलेली तीर्थक्षेत्रे : ‘भगवान श्रीकृष्णाची जन्मभूमी मथुरा, बालपणीचे लीलास्थान असलेले वृंदावन क्षेत्र आणि अवतारी मुख्य कार्याचे क्षेत्र बेट द्वारका हीसुद्धा तीर्थस्थाने असून ती आध्यात्मिक ऊर्जेची शक्तीपिठे आहेत.’ (सुश्री मधुरा भोसले यांना या धारिकेचे टंकलेखन करतांना सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान)
११ अ ३. आद्य शंकराचार्यांनी भारतात चार दिशांना चार धर्मपीठरूपी शक्तीपिठांची निर्मिती करणे : ‘आद्य शंकराचार्य यांनी ‘कलियुगातील भावी काळात धर्मसंस्थापना करण्यासाठी धर्मनिष्ठ, साधक आणि संत यांना दैवी ऊर्जा प्राप्त व्हावी’, यासाठी भारतात चारही दिशांना चार धर्मपिठांची स्थापना केली. द्वारका येथे शारदापीठ, पुरी येथे गोवर्धनपीठ, बद्री येथे ज्योतिर्पीठ आणि रामेश्वरम् येथे शृंगेरीपीठ या चारही धर्मपिठांच्या माध्यमातून शक्तीपिठांची निर्मिती होऊन कलियुगात धर्मस्थापनेसाठी प्रयत्नरत असणार्या सात्त्विक जिवांना दैवी ऊर्जा मिळत आहे.’ (संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘धर्म’)
११ आ. तीर्थस्थानांतील शक्ती वाढवणे : तीर्थस्थाने ही मुळातच दैवी आणि सकारात्मक शक्तीची ऊर्जास्थाने असतात; परंतु काळाच्या ओघात आसुरी शक्तींच्या आक्रमणांमुळे त्यांची आध्यात्मिक ऊर्जा न्यून होऊ लागते. तेव्हा अवतार अशा तीर्थक्षेत्री वास्तव्य करून किंवा त्या स्थानांना भेट देऊन त्यांची आध्यात्मिक शक्ती वृद्धींगत करतात.
११ आ १. प्रभु श्रीराम आणि तीर्थराज प्रयाग : ‘प्रभु श्रीरामाने प्रयाग येथील त्रिवेणी संगमात स्नान करून प्रयागला ‘तीर्थराज प्रयाग’ हे महत्त्वपूर्ण स्थान बनवून त्याची दैवी शक्ती किंवा ऊर्जा वाढवली.’ (सुश्री मधुरा भोसले यांना या धारिकेचे टंकलेखन करतांना सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान)
११ आ २. प्रभु श्रीराम आणि त्र्यंबकेश्वर : ‘भगवान श्रीरामाने नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे काही काळ सीता आणि लक्ष्मण यांच्यासह वास्तव्य करून या तीर्थक्षेत्राची आध्यात्मिक ऊर्जा वाढवली.’ (सुश्री मधुरा भोसले यांना या धारिकेचे टंकलेखन करतांना सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) (क्रमशः)
– सुश्री मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा आणि टंकलेखनाचा दिनांक अन् वेळ : ३१.१.२०२५, दुपारी ३.३० ते ४)
‘नशामुक्त’ राज्य ?
हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी हिंदुत्वाचा पुन्हा एकदा जागर करण्यासाठी, हीच ती योग्य वेळ !
छत्रपती शिवराय आणि शुद्धीकरण मोहीम, म्हणजेच घरवापसी !
कर्नाटकातील गृहमंत्री तथा काँग्रेसचे प्रियंक खरगे यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका, म्हणजे बौद्धिक दिवाळखोरी !
गुर्वाज्ञापालनाचे महत्त्व सांगणारी एक बोधप्रद कथा !