हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांसाठी आदर्श जीवनपद्धतीचे महत्त्व !

‘हिंदु आणि राष्ट्र हितैषी’ सदर !

१. स्वसंरक्षण प्रशिक्षणाच्या माध्यमातून शारीरिक सामर्थ्याची प्राप्ती

‘हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी साधनेचा स्तर वाढवला पाहिजे. माझ्या गुरुदेवांनी मला म्हटले, ‘तुम्ही स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षण देता; परंतु एक काम आणखी केले पाहिजे. जर आपण केवळ एका हातात भाला घेऊन निघालो, तर आपले भले होणार नाही. आपल्याला दुसर्‍या हातात जपमाळ घेऊनही चालले पाहिजे.’ साधना, भजन आणि स्वतःची आध्यात्मिक शक्ती आणखी वाढवण्यासाठी प्रयत्न वाढवायला पाहिजेत. त्यासाठी सर्वांनी व्यक्तीगत साधना करणे आवश्यक आहे.

कार्यकर्त्यांमध्ये ब्राह्मतेजासह शौर्यवृत्तीही वाढली पाहिजे. त्यासाठी आम्ही स्वसंरक्षणासाठी भगिनींना तलवारी वितरित केल्या. मी मातृशक्तीला लाठी चालवायला शिकवत आहे. त्यामुळे मला अनेक वेळा वादविवादाला सामोरे जावे लागते. आता एक वर्षापूर्वी आश्रमात कायदा-सुव्यवस्थेच्या नावाखाली पोलिसांनी एक कलम आश्रमात लावले होते. कुणालाही बाहेर जाऊ दिले जात नव्हते; परंतु तशाही स्थितीत आम्ही आपले कार्य चालू ठेवले. आमच्या ‘संस्कार वाहिने’चे २० सहस्र लोक शांत न बसता सतत कार्यरत होते.


पू. श्री रामबालकदास महात्यागी महाराज यांचा परिचय

पू. श्री रामबालकदास महात्यागी महाराज

पू. श्री रामबालकदास महात्यागीजी महाराज श्री जांभळी पाटेश्‍वरदास रेवा महाराज संस्थान, छत्तीसगडचे संचालक आहेत. ते या संस्थानाच्या माध्यमातून धर्मांतर थांबवणे, धर्मांतरितांना स्वधर्मात परत घेणे, गोरक्षण आणि हिंदु धर्मरक्षण करणे यांसाठी संघटितपणे प्रयत्न करतात. ते हिंदु धर्मरक्षणासाठी राज्यभरात युवकांना संघटित करून त्यांना धर्मशिक्षण देण्याचे अभियान चालवत आहेत. ते ‘ऑनलाईन सत्संगा’च्या माध्यमातून लाखो हिंदूंना मार्गदर्शन करतात. हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी आणि  देशभरात गोवंश हत्याबंदी व्हावी, यांसाठी ते संतांचे संघटन करत आहेत.

२. हिंदु कार्यकर्त्यांसाठी भाषा, वेशभूषा आणि सात्त्विक आहार यांचे महत्त्व

सर्वप्रथम आपण कुठेही रहात असलो, तरी आपल्याला आपल्या भाषेवर नियंत्रण ठेवले पाहिजे. केवळ येथेच नाही, तर केव्हाही कुठेही बोलतांना स्वतःचे बोलणे नम्रतेचे असले पाहिजे. हिंदु कार्यकर्त्यांनी ‘हॅलो’, ‘हाय’ असे बोलण्यास प्रारंभ करणे अयोग्य आहेे. भ्रमणभाषवर बोलतांना नेहमी ‘जय श्रीराम’ किंवा ‘नमस्कार’ म्हणावे. कुठेही एकमेकांना संबोधन करतांना आदराने संबोधित केले पाहिजे. सर्वप्रथम समोरील व्यक्तीवर स्वतःच्या बोलण्याच्या पद्धतीचा प्रभाव पडतो. आपली भाषा हीच आपली ओळख आहे. त्यामुळे आपल्या व्यक्तीगत बोलण्याच्या शैलीमुळे ती व्यक्ती आपल्याविषयी मत बनवते. आपली भाषा अगदी संयमित, आध्यात्मिक आणि ब्रह्मनिष्ठ, तसेच राष्ट्रीय अन् धार्मिक शब्दांनी सुुसज्जित असली पाहिजे.

३. पारंपरिक आदर्श वेशभूषा

स्वतःची वेशभूषा अधिकाधिक भगवी किंवा सात्त्विक हिंदुत्वनिष्ठ असावी. आपण कोणत्याही कार्यालयात गेलो, तरी कपाळावर कुंकवाचा टिळा लावून गेले पाहिजे. या टिळ्यामुळे स्वतःचा सन्मान वाढतो. यासमवेतच आपल्या डोक्यावरील शिखाही (शेंडी) असावी. एक जिल्हाधिकारी एका जिल्ह्यात रुजू झाले होते. त्यांनी ऐकले की, जवळच्या जंगलात एक वस्ती असून तेथील लोक विवस्त्र रहातात. त्या जिल्हाधिकार्‍यांनी त्यांना भेटण्याचे नियोजन केले. ‘आपण जेथे जातो, तेथे त्यांच्यातीलच बनून जायला पाहिजे. त्यामुळे आज आपण कपडे परिधान करायचे नाही’, असे त्यांनी ठरवले. जिल्हाधिकार्‍यांच्या आगमनाची वार्ता त्या वस्तीतील लोकांना समजली. त्यांना वाटले की, जिल्हाधिकारी पुष्कळ शिकलेले आहेत, तेव्हा आजच्या दिवशी आपण सर्वजण कपडे परिधान करूया. अर्थातच जिल्हाधिकारी त्यांच्याकडे विवस्त्रावस्थेत गेल्यावर काय झाले असेल, याची आपल्याला कल्पना येईल. त्यामुळे विवाह समारंभाला जातांनाही आधुनिक कपडे परिधान करून न जाता पारंंपरिक वेशभूषा करून जाण्यातच स्वतःचे भले आहे. आपण जसे आहोत, तसे राहिलो, तर आपल्याला सन्मान मिळेल. त्यामुळे आपण आपल्या वेशभूषेवर ठाम रहाणे योग्य आहे.

धर्मकार्य यशस्वी होण्यासाठी शासनाशी वाद नव्हे, तर सुसंवाद असावा !


‘केवळ ‘हिंदुत्व’ आणि ‘अध्यात्म’ हे सर्वांत बळकट तंत्र आहे. त्यामुळे केंद्रात आणि राज्यातही हिंदुत्वाचा प्रभाव आहे. देशात होणारे परिवर्तन केवळ हिंदुत्वनिष्ठांमुळे होत आहे. शासनव्यवस्था हे फार मोठे साधन आहे. त्यावर धर्माचा धर्मदंड बरोबरीने असला पाहिजे. त्यासाठी प्रतिनिधी मंडळाने शासनासमवेत बसून चर्चा करावी. वादविवाद करण्यापेक्षा सुसंवाद केल्यानेच आपण यशस्वी होऊ शकतो. संपूर्ण भारतवर्षात ४ कुंभ होतात. या ४  कुंभमेळ्याखेरीज एक हिंदुत्वनिष्ठ शासन आणि संत यांच्या सहकार्याने आम्ही छत्तीसगडमध्ये ‘राजीम कुंभमेळा’ चालू केला. भव्यता आणि संतांची एकजूट यांमुळे राजीम कुंभमेळ्याचा छत्तीसगडच्या लोकांवर मोठा प्रभाव पडत आहे. अशाच प्रकारे शासनाच्या संपर्कात राहून धर्मांतर, गोतस्करी, हिंदुत्वनिष्ठांवरील आक्रमणे किंवा हिंदु धार्मिक चिन्हांचा अवमान थांबवता येईल. शासनाशी सुसंवाद साधण्यासाठी निवडक लोकांचा गट सिद्ध असावा. त्यामुळे शासनाशी समन्वय ठेवणे सोपे जाईल.’

– पू. श्री रामबालकदास महात्यागी महाराज

४. सात्त्विक भोजनपद्धत

‘जसे अन्न तसे मन’, असे म्हटले जाते. त्यामुळे आपल्यासाठी भोजन ही सर्वांत महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. कुटुंब, घर, समाज, वैवाहिक भोजन, अशा कोणत्याही ठिकाणी गेलो, तरी स्वतःची जेवणाची पद्धत सोडू नये. तसे न केल्याने स्वतःचे वैयक्तिक सहकार्य आक्रमणकर्त्यांना दिल्यासारखे होईल. आक्रमणकर्ते आपल्या याच दुर्बळ गोष्टींवर आघात करत असतात. त्यामुळे आपण अधिकाधिक आदर्श जीवनपद्धत अंगीकारणे आवश्यक आहे.

– पू. श्री रामबालकदास महात्यागी महाराज, संचालक, श्री जामडी पाटेश्‍वरधाम सेवा संस्थान, पाटेश्‍वर धाम, छत्तीसगड.