आफ्रिका खंडात सनातन धर्माच्या प्रसाराला प्रतिसाद !

'हिंदु आणि राष्ट्र हितैषी' सदर !

१. भगवद्गीतेचे हे ज्ञान गुरु-शिष्य परंपरेद्वारे अविरतपणे हस्तांतरित होत असणे

‘सनातन धर्म’ म्हणून ओळखली जाणारी हिंदु परंपरा ही केवळ भारतापुरती मर्यादित नसून वैश्विक आहे. भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, ‘मी हे योगशास्त्र कोट्यवधी वर्षांपूर्वी सूर्यदेवाला सांगितले होते.’ त्या संदर्भावरून असे अनुमान लावले जाते की, भगवद्गीता सूर्यदेव विवस्वान यांना १२ कोटी ४ लाख वर्षांपूर्वी सांगितली गेली होती. त्यानंतर विवस्वान यांनी हे ज्ञान मानवजातीचे जनक असलेल्या ‘मनु’ यांना सांगितले आणि मनु यांनी हे ज्ञान त्यांचा पुत्र ‘इक्ष्वाकू’ याला दिले.

अशा प्रकारे हे ज्ञान सूर्यापासून पृथ्वीपर्यंत पोचले. जेव्हा हे ज्ञान लुप्त झाले, तेव्हा ५ सहस्र वर्षांपूर्वी भगवान श्रीकृष्णाने हा संदेश पुन्हा एकदा त्यांचा भक्त असलेल्या अर्जुनाला सांगितले. तेव्हापासून भगवद्गीतेचे हे ज्ञान गुरु-शिष्य परंपरेद्वारे अविरतपणे हस्तांतरित होत आले आहे.

श्रीवास दास वनचारी यांचा परिचय

श्रीवास दास वनचारी

श्रीवास दास वनचारी हे घाना, पश्चिम आफ्रिका येथील असून ‘इस्कॉन’ या आध्यात्मिक संस्थेशी जोडलेले आहेत. अनेक आव्हानांचा सामना करून त्यांनी ‘भगवद्गीते’चे अनेक भाषांमध्ये भाषांतर पूर्ण केले आहे. ते दक्षिण आफ्रिकेत हिंदु धर्माचा प्रसार करण्यासाठी अत्यंत मोलाचे कार्य करत आहेत.

२. ‘इस्कॉन’चे संस्थापक ए.सी. भक्तीवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद

ए.सी. भक्तीवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांनी ‘भगवद्गीता’ आणि ‘भागवत पुराण’ यांचा संदेश पाश्चात्त्य जगापर्यंत पोचवावा, अशी आज्ञा त्यांचे गुरु परमगुरु भक्तीवेदांत सरस्वती ठाकूर प्रभुपाद यांनी केली. त्यामुळेच वर्ष १९६५ मध्ये भक्तीवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद पाश्चात्त्य देशांकडे निघाले आणि अमेरिकेला पोचले. तेथे पोचल्यावर त्यांना तेथे स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी अत्यंत संघर्ष करावा लागला. शेवटी ‘हरे कृष्ण चळवळ’ आणि ‘इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्ण कॉन्शियसनेस’, म्हणजेच ‘इस्कॉन’ (आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ) ही संस्था स्थापन केली. त्यामुळे भगवद्गीता, भागवत पुराण आणि सनातन धर्म यांचे ज्ञान संपूर्ण जगभर पसरले. यापूर्वी हे ज्ञान अनेक गुरु, स्वामी आणि आचार्य यांनी भारताबाहेर नेण्याचा प्रयत्न केला होता; परंतु श्रील प्रभुपाद यांनी ज्या प्रभावीपणे हे कार्य केले, तसे त्यांना जमले नाही. केवळ ११ वर्षांच्या कालावधीतच स्वामी श्रील प्रभुपाद यांनी जगातील सर्व प्रमुख शहरांना भेटी दिल्या. त्यांनी भगवद्गीता, भागवत पुराण, चैतन्य चरितामृत, रामायण आणि सनातन धर्मातील अन्य सर्व उपदेश यांचे इंग्रजीमध्ये भाषांतर केले. इतकेच नव्हे, तर त्यांनी त्यांच्या शिष्यांना या ग्रंथांचे स्पॅनिश, फ्रेंच, रशियन अशा जगातील विविध प्रमुख भाषांमध्ये भाषांतर करण्याचे निर्देशही दिले. अगदी आफ्रिकेतही ‘योरुबा’, ‘चुई’, ‘स्वाहिली’ अशा अनेक आफ्रिकी भाषांमध्ये ‘भगवद्गीता’ भाषांतरित केली आहे. त्यामुळे जगभरातील सूज्ञ आणि बुद्धीमान लोक आता ‘सनातन धर्मा’चे महत्त्व ओळखू लागले आहेत. स्वामी श्रील प्रभुपाद यांनी वर्ष १९७७ मध्ये देह ठेवला. त्यापूर्वी त्यांनी जगभरात १०८ मंदिरांची स्थापना केली होती. आज ‘इस्कॉन’ची जगभरात ९०० मंदिरे, उपाहारगृहे (रेस्टॉरंट्स), शाळा, शेती प्रकल्प अशा अनेक उपक्रमांचे जाळे पसरलेले आहे. या सर्व ठिकाणी लोक भगवद्गीतेसह रामायण, मनुसंहितेसह सनातन धर्माच्या सर्व तत्त्वज्ञानांचा सखोल अभ्यास करत आहेत.

३. आफ्रिका खंडात सनातन धर्माचा प्रसार

अ. नगर हरिनाम, प्रवचने आणि विनामूल्य अन्नदान यांच्या माध्यमातून हिंदु धर्माचा प्रसार : संपूर्ण आफ्रिका खंडातच आमचे कार्य विस्तारलेले आहे. आफ्रिकी संस्कृतीमध्ये आपल्याला ‘सनातन धर्मा’चे अनेक अंश किंवा खुणा दिसून येतात. सनातन धर्मातील अनेक गोष्टींवर आफ्रिकी लोकांचाही विश्वास आहे. या संस्कृतीमध्ये लोक उपदेवता, विविध देव, मृत्यूनंतरचे जीवन, पुनर्जन्म, भूत-प्रेत यांवर विश्वास ठेवतात. अनेक आफ्रिकी लोकांना विदेशातून आलेली एखादी गोष्ट स्वीकारायचीच असेल, तर ती ‘सनातन धर्म’च असावी, असे वाटते. अर्थात् आपल्यासमोर अनेक आव्हानेही आहेत.

काही कट्टर ख्रिस्ती आणि कट्टर मुसलमान यांना आफ्रिकी परंपरांचा भाग म्हणून ‘हिंदु धर्मा’चा स्वीकार केला जाऊ नये, असे वाटते. या विरोधावर मात करण्यासाठी आम्ही तेथे ‘नगर हरिनाम’ उपक्रमाचा मोठ्या प्रमाणावर अवलंब करतो. आम्ही रस्त्यांवर भजन-कीर्तन करत नाचतो आणि गातो, पुस्तके वाटतो, लोकांना उपदेश करतो, तसेच शाळा अन् महाविद्यालये येथे व्याख्यानांचे आयोजन करतो. शाळांमध्ये आणि गरजू लोकांना विनामूल्य अन्नदान करतो. यासमवेतच प्रसारमाध्यमांशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले. त्यामुळे ते आपल्याला रेडिओ आणि दूरचित्रवाहिन्या येथे संवाद साधण्यास संधी देतात. याचा परिणाम असा झाला की, घानामध्ये अनेक लोक हिंदु धर्म स्वीकारत आहेत.

आ. सनातन धर्माच्या ज्ञानाने ख्रिस्ती धर्मगुरु प्रभावित : घानामध्ये एक अत्यंत प्रभावशाली धर्मप्रचारक आहेत. त्यांचा अनुयायी वर्ग प्रचंड आहे. त्यांची स्वतःची एक अतिशय भव्य अशी विद्यापीठ संस्था आहे. आमचे आध्यात्मिक गुरु घानाला भेट देत असत, तेव्हा आम्ही दूरचित्रवाणी कार्यक्रमांमध्ये काही ख्रिस्ती धर्मप्रचारकांनाही आमंत्रित करायचो. त्याप्रमाणे त्या अत्यंत प्रभावशाली धर्मप्रचारकालाही आमच्या आध्यात्मिक गुरूंसमवेत एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निमंत्रित केले; पण त्यांनी कार्यक्रमाला येण्यास नकार दिला, तसेच काही ना काही कारण सांगून ते आम्हाला टाळू लागले. त्यानंतर आम्ही त्यांच्या कार्यालयात त्यांच्यासाठी ‘भगवद्गीता’ ग्रंथ आणि ‘आत्म-साक्षात्काराची लक्षणे’ हे पुस्तक वाचण्यास दिले. त्या धर्मप्रचारकांनी ती पुस्तके वाचण्यास प्रारंभ केला.

एकदा चर्चमध्ये प्रवचन देत असतांना अचानक त्यांनी ‘हरे कृष्ण चळवळी’विषयी बोलण्यास प्रारंभ केला. ते म्हणाले, ‘रस्त्यावर तुम्हाला जे कपाळावर टिळे आणि अंगाभोवती भगवे वस्त्र गुंडाळलेले लोक दिसतात, त्यांच्याकडे प्रचंड ज्ञान आहे. तुम्ही त्यांची पुस्तके घेऊन निश्चित वाचा. मी त्यांची पुस्तके वाचत आहे आणि ती पुस्तके खरोखरच अद्भुत आहेत. आपल्याला आवश्यक असलेले सर्व ज्ञान त्या पुस्तकांमध्ये सामावलेले आहे.’ आमच्याकडील भगवद्गीतेच्या पुष्कळ प्रती या एका चर्चकडून खरेदी केल्या जातात. अधूनमधून अनेक लोक मंदिरात येतात आणि भगवद्गीतेची प्रत विकत घेतात. आणखी एका चर्चच्या धर्मगुरूंकडेही भगवद्गीतेची एक प्रत होती. त्यांना ती पुष्कळ आवडली. त्यांनीही त्यांच्या चर्चमधील सदस्यांना हरे कृष्ण मंदिरातील भगवद्गीता वाचून ईश्वराविषयी अधिक माहिती जाणून घेण्यास सांगितले. तिसरे एक धर्मगुरु शाकाहाराचा प्रचार करत आहेत. त्यांनी शाकाहाराच्या लाभांविषयी एक पुस्तक वाचले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या चर्चमध्ये शाकाहाराचा प्रसार करण्यास प्रारंभ केला.

इ. घानाचे तत्कालीन राष्ट्रपती ‘हरे कृष्ण’ कार्यक्रमामुळे अत्यंत प्रभावित : घानाच्या एका पूर्वीच्या एका राष्ट्रपतींच्या काळात तेथील दूरचित्रवाहिनीवर ‘हरे कृष्ण चळवळी’विषयी एक कार्यक्रम प्रसारित झाला होता. तो कार्यक्रम त्यांना अत्यंत आवडला. त्या कार्यक्रमात त्यांना आजवर मिळालेला हा सर्वोत्तम संदेश आहे, असे वाटले. त्यांनी दूरचित्रवाहिनीच्या संचालकांना दूरभाष करून तो कार्यक्रम परत प्रसारित करण्यास सांगितले. तिसर्‍या आठवड्यात राष्ट्रपतींनी पुन्हा एकदा संचालकांना दूरभाष करून तोच कार्यक्रम पुन्हा लावण्यास सांगितले.’

-श्रीवास दास वनचारी, ‘इस्कॉन’, घाना, पश्चिम आफ्रिका.