विद्यार्थ्यांनी बनवलेल्या श्री गणेशमूर्ती चांगल्या दर्जाच्या ! – मुख्याध्यापक कुडाळकर
यंदाच्या नागपंचमीसाठी ‘नागा’च्या मूर्तीही सिद्ध

पणजी, १२ जुलै (वार्ता.) – विकलांग मुलांसाठीचे ‘संजय स्कूल’ यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यंदा विद्यार्थ्यांनी सिद्ध केलेल्या चिकण मातीच्या पर्यावरणपूरक ५०० श्री गणेशमूर्तींची बाजारात विक्री करण्याचे ठरवले आहे. विद्यार्थ्यांमधील कौशल्यांचा विकास करून विद्यार्थी या कौशल्याच्या आधारावर भविष्यात स्वावलंबी होतील, या उद्देशाने ‘संजय स्कूल’ हा उपक्रम राबवत आहे.
या उपक्रमाविषयी अधिक माहिती देतांना ‘संजय स्कूल’चे मुख्याध्यापक तातू कुडाळकर म्हणाले, ‘‘यंदा ‘संजय स्कूल’ने ‘कलाकृती, म्हापसा’ यांच्या सहयोगाने सलग चौथ्या वर्षी श्री गणेशमूर्ती सिद्ध करण्याच्या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. अशा कार्यशाळेमुळे विद्यार्थी चिकण मातीचा वापर करण्यासाठी प्रशिक्षित झाले आहेत आणि त्यांना याविषयी आत्मविश्वास निर्माण झाला आहे. ‘संजय स्कूल’ आणि ‘कलाकृती, म्हापसा’ यांना विद्यार्थ्यांमध्ये चिकण मातीचा वापर करून मूर्ती घडवण्याचे कौशल्य विकसित करायचे आहे अन् यामुळे प्रत्येक विद्यार्थी यापुढे चिकणमातीची मूर्ती सिद्ध करू शकणार आहे. गतवर्षी या उपक्रमाला चांगला प्रतिसाद लाभल्यानंतर आम्ही यंदा या उपक्रमाची व्याप्ती वाढवली आहे. यंदा आम्ही नागरिकांना आवाहन करतो की, त्यांनी गणेशोत्सवात यंदा ‘संजय स्कूल’च्या विद्यार्थ्यांनी सिद्ध केलेल्या आणि चिकण मातीपासून बनवलेल्या श्री गणेशमूर्ती खरेदी कराव्यात. विद्यार्थ्यांप्रती सहानुभूती बाळगून नव्हे, तर त्यांनी बनवलेल्या श्री गणेशमूर्ती चांगल्या दर्जाच्या आहेत म्हणून नागरिकांनी त्या विकत घेतल्या पाहिजेत. ‘संजय स्कूल’ या ठिकाणी कायमस्वरूपी श्री गणेशमूर्ती सिद्ध करण्याचे प्रशिक्षण देणार्या कार्यशाळेचे आयोजन करण्याचे नियोजन करत आहे. यामुळे प्रतिवर्षी नवनवीन विद्यार्थी प्रशिक्षित होतील. या श्री गणेशमूर्तीच्या विक्रीमधून मिळणारे पैसे हा प्रकल्प पुढे चालू ठेवण्यासाठी वापरला जाणार आहे.’’
मूर्ती सिद्ध करण्यासाठी विद्यार्थ्यांना असे घडवले जाते !
कार्यशाळेच्या प्रशिक्षक स्वेता हरमलकर प्रशिक्षणाविषयी अधिक माहिती देतांना म्हणाल्या, ‘‘ही कार्यशाळा विशेष विद्यार्थ्यांसाठी आहे. येथे विद्यार्थी प्रथम सामान्य शिल्पकलेची माती वापरून प्रशिक्षण घेतात आणि नंतर ते शाडूमाती वापरण्यास प्रारंभ करतात. त्यानंतर मूर्ती सिद्ध करतांना प्रथम मातीला प्लास्टरच्या साच्याच्या माध्यमातून आकार दिला जातो. ही माती घट्ट झाल्यानंतर ती साच्यातून काढून विविध साधनांचा वापर करून मूर्ती घडवली जाते. मूर्तीची आभूषणे आणि मुकूट वेगळे हाताने सिद्ध केले जातात आणि नंतर ते मूर्तीवर बसवले जातात. विद्यार्थी नंतर शिक्षकांच्या मार्गदर्शनाद्वारे मूर्तींना ‘पॉलीश’ करून रंग देतात. कार्यशाळेत
५ शिक्षक एकूण १४ विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतात. एका मूर्तीवर अनुमाने २ विद्यार्थी काम करत असतात. यंदा विद्यार्थ्यांनी नागपंचमीसाठी ‘नागा’च्या मूर्ती सिद्ध केल्या आहेत आणि या मूर्ती ‘संजय स्कूल’ थेट विक्री करणार आहे.’’
उघड्यावर कचरा टाकणार्यांवर कडक कारवाई करण्याची सिद्धता !
दिवे घाट (पुणे) येथे वारीच्या काळात इंद्रवज्राचे (संपूर्ण इंद्रधनुष्य) दुर्मिळ दर्शन !
मोशी (पुणे) येथील दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू !
जगद्गुरु तुकाराम महाराज हे मराठी संस्कृतीचा केंद्रीभूत अवतार ! – मुकुंद दातार, संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी प्रशासन सिद्ध !
ठाणे येथे शैक्षणिक सहलीत ६० विद्यार्थ्यांना विषबाधा; चौकशीची मागणी !