गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !

‘गायन, वादन, नृत्य आणि नाट्य या कलांतून ईश्वरप्राप्तीसाठी साधना’, याचे प्रास्ताविक विवेचन !

४ सप्टेंबर २०२५ या दिवसापासून प्रत्येक गुरुवारी चालू झालेल्या लेखमालेत आपण ‘गायन, वादन, नृत्य आणि नाट्य’, या कलांची माहिती घेत आहोत. या कलांच्या सादरीकरणाचा उद्देश काळाच्या प्रभावामुळे पालटत असला, तरी ‘कलेकडे केवळ कला म्हणून न पहाता कलेतून आध्यात्मिक उन्नती कशी साधावी’, हे येथे पाहूया.  (लेखांक २०)                                                         

‘या लेखमालेच्या मागील लेखात आपण कलाकाराच्या साधनेचा पाया सिद्ध होण्यासाठी आवश्यक असलेल्या अष्टांग साधनेपैकी महत्त्वाचे अंग असलेली ‘स्वभावदोष-निर्मूलन आणि गुण-संवर्धन प्रक्रिया’ सविस्तर समजून घेतली. गायनकला, वादनकला, नृत्यकला इत्यादी सादरीकरणाच्या कला (Performing Arts) आहेत. या कलांचे सादरीकरण करणार्‍या कलाकारांमध्ये अहं वाढण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे साधक-कलाकाराने अहंकाराविषयी नेहमी सतर्क रहाणे आवश्यक आहे. अहंकार हा कलाकाराच्या कलेच्या माध्यमातून ईश्वराशी एकरूपता साधण्याच्या साधनेतील मोठा अडथळा आहे. अहंकाराच्या निर्मूलनासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ सांगितली आहे.

‘या लेखाच्या ४ जून या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात आपण ‘अहंकार वाढल्याने कलाकार आणि त्याची कला यांवर होणारे परिणाम, तसेच अहं-निर्मूलनाविषयी समाजातील मान्यवर कलाकारांनी सांगितलेली मार्गदर्शक सूत्रे’ समजून घेतली. 

लेखाच्या आजच्या भागात आपण ‘कला-साधनेमध्ये कलाकाराचा अहं वाढू नये’, यासाठी त्याने करायचे प्रयत्न, तसेच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेली अहं-निर्मूलनाची प्रक्रिया राबवण्याची पद्धत’ समजून घेणार आहोत. (भाग ३)

याच्या आधीचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/1047278.html

साधक-कलाकारांनो, स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवून कलेत आध्यात्मिक प्रावीण्य मिळवा !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘ईश्वरप्राप्तीसाठी साधना करतांना ‘व्यक्तीने स्वतःतील स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करणे’, हे पहिले पाऊल आहे. यामुळे साधनेचा पाया पक्का होतो. साधकांमध्ये स्वभावदोष आणि अहंकार असले, तर त्यांचा ईश्वराशी संवाद होऊ शकत नाही. अध्यात्मात पावलागणिक ईश्वर सांगेल, तसे करायला लागते आणि साधकाने तसे केले पाहिजे.

यासाठी साधक-कलाकाराने पहिली २ – ४ वर्षे साधना आणि स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवायलाच हवी. साधनेमुळे साधक-कलाकाराची सात्त्विकता वाढल्यावर त्याला आध्यात्मिक स्तरावर संगीत, नृत्य आणि नाट्य, या कला सहजतेने शिकता येतात. कलेला साधनेची जोड दिल्यावरच ‘कलेत आध्यात्मिक प्रावीण्य मिळवणे आणि साधना होणे’ साध्य होते.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, संस्थापक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय.

१. ‘अहंकार वाढू नये’, यासाठी साधक-कलाकारांनी करायचे प्रयत्न ! 

श्री. मनोज सहस्रबुद्धे

१ अ. कलागुरूंनी त्यांच्या शिष्याला अहंकाराची जाणीव करून देणे : कला शिकण्याच्या प्रारंभीच्याच टप्प्याला कलागुरूंनी कलेमुळे वाढू शकणार्‍या अहंकाराची जाणीव प्रत्येक शिष्याला करून दिली पाहिजे, तसेच प्रत्येक ठिकाणी शिष्याचे कौतुक न करता ‘तो कुठे आणि कसा न्यून पडत आहे ?’, याची जाणीव त्याला करून देणे आवश्यक आहे. त्यामुळे शिष्यामधील ‘मला जमते’, ‘मी चांगले करतो’, हे अहंचे पैलू वाढण्याची शक्यता अल्प होते.

१ आ. आत्मनिरीक्षण करणे आणि शिकण्याच्या स्थितीत रहाणे : काही वेळा कलेत यश, प्रसिद्धी आणि मान-सन्मान मिळत गेला की, कलाकाराचा अहंकार वाढू शकतो. त्यामुळे त्याची कला-साधनेत हानी होऊ शकते. त्यासाठी साधक-कलाकाराने सातत्याने स्वतःचे आत्मनिरीक्षण केल्यास आणि ‘यश, प्रसिद्धी अन् मान-सन्मान यांमुळे स्वतःचा अहं वाढू नये’, याची काळजी घेतल्यास कलेच्या माध्यमातून त्याची साधना होईल. शिष्याने ‘मला काही येत नाही’, ‘मला आणखी बरेच शिकायचे आहे’, ‘मी एक विद्यार्थी आहे’, असा भाव ठेवल्यास त्याची शिकण्याची वृत्ती वाढेल.

१ इ. इतरांचे कौतुक करणे : साधक-कलाकाराने इतरांमधील गुण पाहून त्यांचे कौतुक केल्यास इतरांना प्रोत्साहन मिळते आणि त्यामुळे स्वत:चा अहं न्यून होण्यासही साहाय्य होते.

१ ई. इतरांचे चांगले गुण स्वतःत आणण्याचा प्रयत्न करणे : काही वेळा कलाकारांना ‘मी श्रेष्ठ आहे’, ‘मी चांगले गायन / वादन / नृत्य / अभिनय करतो’, असा सूक्ष्म अहं होऊ शकतो. त्यासाठी त्यांनी सतत ‘इतरांचे चांगले गुण बघून त्यांतून शिकणे, कुणी काही सुचवले, तर त्याप्रमाणे करून पहाण्याचा प्रयत्न करणे, ‘एखादे सूत्र कळले नाही’, तर ते विचारणे’, अशा प्रकारे प्रयत्न केल्यास ‘स्व’चा विचार न्यून होऊन कलाकाराला कला-साधनेच्या पुढच्या टप्प्यात जाता येईल आणि त्यातून त्याची साधना होईल.

सौ. भक्ती कुलकर्णी

१ उ. कर्तेपणा देवाला देणे : स्वतःला विसरणे म्हणजेच अध्यात्म. त्यामुळे नृत्य, गायन, वादन, नाट्य इत्यादी कला सादर करतांना ‘ते मी करत नसून देवच माझ्याकडून करून घेत आहे’, असा भाव ठेवल्यास ‘मी’पणा येणार नाही; तर शरणागती वाढून कर्तेपणा देवाला अर्पण करता येईल. साधना म्हणून ‘मी केवळ माध्यम आहे’, असाच विचार होईल. सततच्या ईश्वरी अनुसंधानाने आपली कला ईश्वरचरणी रुजू होऊन ‘मी’पणा विसरायला साहाय्य होईल.

१ ऊ. कलेला साधनेची जोड देणे : कलेला साधनेची जोड दिली पाहिजे. असे केल्याने साधक-कलाकाराच्या मनात समर्पणाचा भाव निर्माण व्हायला लागतो आणि त्याचा मिथ्याभिमान गळून पडायला लागतो. त्याला ‘मी काहीच करत नसून देवच आपल्या माध्यमातून कसे करून घेत आहे ?’, याची अनुभूती यायला लागते. त्यामुळे त्याच्या मनाची द्विधावस्था आणि नकारात्मकता नष्ट होऊन त्याला ईश्वरप्राप्तीची ओढ लागते.

१ ए. सतत नामस्मरण करणे : साधक-कलाकाराने सतत नामस्मरण करावे. त्यामुळे मनातील विचार न्यून होऊन ‘भगवंतच सर्वकाही घडवून आणत आहे’, हा भाव दृढ होत जातो आणि हळूहळू अहंकाराचा लय व्हायला लागतो. यातूनच इतरांचा विचार वाढायला लागून त्याच्या इतरांविषयीच्या अपेक्षा न्यून व्हायला लागतात.

१ ऐ. स्वतःकडील ज्ञान इतरांना देणे : कलाकाराकडे जे काही ज्ञान आहे, त्याचा उपयोग त्याने केवळ इतरांना दाखवण्यासाठी न करता स्वतःच्या उन्नतीसाठी, तसेच इतरांना देण्यासाठी केला, तर साधनेच्या दृष्टीने त्याला लाभ होईल.

१ ओ. इतर कलाकारांचा मान ठेवणे : काही वेळा ‘जुगलबंदी’सारख्या कार्यक्रमांत ‘आपण समोरच्या कलाकाराला हरवले’, असा विचार मनात येऊन अहंकार वाढू शकतो; पण साधनेच्या दृष्टीने ‘मी समोरच्या कलाकारापेक्षा श्रेष्ठ आहे’, असा विचार करण्यापेक्षा ‘माझ्यामुळे दुसर्‍याला काही त्रास होणार नाही ना ? मी समोरच्याच्या कलेचा मान ठेवत आहे ना ?’, याकडे त्याचे लक्ष हवे. यामुळे इतरांचा विचार करण्याचा गुण कलाकारात वृद्धींगत होऊ शकतो, तसेच ‘समोरच्या कलाकाराकडूनही काय शिकू शकतो ?’, असा विचार झाल्याने कर्तेपणाचा अहंकार त्याच्या मनात रहात नाही.

२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेली अहं-निर्मूलनाची प्रक्रिया राबवण्याची पद्धत

सनातनच्या ग्रंथाचे मुखपृष्ठ

साधक-कलाकाराने देवाची भक्ती करण्यासह चित्ताची शुद्धी करणेही आवश्यक आहे. अशुद्ध चित्तात भगवंत कसा वास करेल ? चित्त अशुद्ध असल्यास कला-साधनेत प्रगती होत नाही. याचे उदाहरण पाहिल्यास लंकापती रावण हा प्रखर शिवभक्त होता; परंतु तो अहंकारीही होता. या अहंकारापोटीच त्याचे पतन झाले. चित्ताची शुद्धी करून मन निर्मळ करण्यासाठी ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ अत्यंत महत्त्वाची आहे.

२ अ. आरंभी साधक-कलाकाराने स्वतःचे अंतर्निरीक्षण करून स्वतःमधील अहंच्या पैलूंची सूची करावी. 

२ आ. अहं-निर्मूलन सारणी लिखाणाची पद्धत : प्रतिदिन स्वतःतील अहंच्या पैलूंविषयी घडत असलेल्या प्रसंगांची नोंद सारणीमध्ये (वहीमध्ये) करावी. अहं-निर्मूलनाची सारणी लिहिण्याची पद्धत पुढीलप्रमाणे आहे. त्याप्रमाणे वहीमध्ये पुढील रकाने करावेत.

२ आ १. दिनांक   

२ आ २. अहंचा पैलू : ‘प्रसंगात अहंचा कोणता पैलू उफाळून आला ?’, तो येथे लिहावा, उदा. स्वतःला श्रेष्ठ समजणे, अधिकारवाणीने बोलणे इत्यादी.

२ आ ३. कुठे जमले नाही ? : दिवसभरात ज्या प्रसंगात अहंकार उफाळून आला आणि त्याचा परिणाम स्वतःवर अन् अन्यांवरही झाला, अशा प्रसंगाची नोंद येथे करावी.

२ आ ४. कुठे जमले ? : प्रक्रिया राबवत गेल्याने आपल्याला अहंच्या काही पैलूंवर साधनेच्या दृष्टीने योग्य विचारप्रक्रिया ठेवून मात करायला जमायला लागते. असे प्रसंग या रकान्यामध्ये लिहावे.

२ आ ५. प्रसंगांवर योग्य दृष्टीकोन : या ठिकाणी उफाळून आलेल्या अहंकाराच्या पैलूंवर साधनेच्या दृष्टीने योग्य दृष्टीकोन लिहावा, उदा. ‘माझ्या मनाप्रमाणे व्हायला हवे’, या अहंच्या पैलूमुळे चिडचिड होत असेल, तर त्या वेळी ही परिस्थिती देवानेच निर्माण केल्याने माझी साधना म्हणून मी ती स्वीकारीन.’

२ इ. अहं-निर्मूलनासाठी स्वयंसूचना देणे : ज्याप्रमाणे आपण एखादा स्वभावदोष घालवण्यासाठी मनाला स्वयंसूचना देतो, त्याचप्रमाणे अहंच्या पैलूंच्या संदर्भातही स्वयंसूचना द्याव्यात, उदा. ‘स्वतःला श्रेष्ठ समजणे’, या अहंच्या पैलूवर पुढीलप्रमाणे सूचना देऊ शकतो.

२ इ १. स्वयंसूचना : ‘जेव्हा ‘स्वतःला श्रेष्ठ समजणे’, या अहंच्या पैलूमुळे ‘अन्य कलाकारापेक्षा मला अधिक चांगले नृत्य करता येते’, असा विचार माझ्या मनात येत असेल, तेव्हा मला त्याची जाणीव होईल आणि ‘देवाच्या कृपेमुळेच मला ही कला लाभली आहे’, यासाठी कृतज्ञताभावात राहून मी देवाच्या आराधनेसाठीच कलेचा उपयोग करीन.’

(सविस्तर माहितीसाठी वाचा – सनातनचे ग्रंथ ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या विविध पैलूंचे विश्लेषण’ अन् ‘अहं-निर्मूलनासाठी साधना ’)

सारांश : ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ ही केवळ अहंकाराचे निर्दालन करण्याची प्रक्रिया नसून ती मन शुद्ध करण्याची प्रक्रिया आहे. मन जेवढे निर्मळ, शुद्ध आणि अहंकारविरहित असेल, तेवढी ईश्वरी कृपा होऊ शकते. ‘अहंकार असल्यास भक्तीभावही झाकला जातो’, असे म्हटले जाते. ज्या भगवंताने कलेचे वरदान दिले आहे, त्या भगवंताच्या चरणी कृतज्ञ राहिल्यास अहंकार गळून पडतो. साधक-कलाकारांनो, आपल्यातील अहंला घालवून शुद्ध भावभक्तीची कलासुमने भगवंताच्या चरणी अर्पण करूया !’            (समाप्त)

संग्राहक : श्री. मनोज सहस्रबुद्धे, वाद्य-अभ्यासक आणि सौ. भक्ती कुलकर्णी, संगीत-अभ्यासक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (२५.६.२०२६)

साधकांना सूचना आणि हितचिंतकांना विनंती

या लेखमालिकेविषयी कुणाला शंका किंवा प्रश्न असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधावा. – संगीत विभाग, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.

संपर्कासाठी पत्ता

श्री. मनोज सहस्रबुद्धे

संपर्क क्रमांक : ८७९३६ ७८१७८

ई-मेल : [email protected]

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.