‘गायन, वादन, नृत्य आणि नाट्य या कलांतून ईश्वरप्राप्तीसाठी साधना’, याचे प्रास्ताविक विवेचन !
४ सप्टेंबर २०२५ या दिवसापासून प्रत्येक गुरुवारी चालू झालेल्या लेखमालेत आपण ‘गायन, वादन, नृत्य आणि नाट्य’, या कलांची माहिती घेत आहोत. या कलांच्या सादरीकरणाचा उद्देश काळाच्या प्रभावामुळे पालटत असला, तरी ‘कलेकडे केवळ कला म्हणून न पहाता कलेतून आध्यात्मिक उन्नती कशी साधावी’, हे येथे पाहूया.
(लेखांक २०)

‘या लेखमालेच्या मागील लेखात आपण कलाकाराच्या साधनेचा पाया सिद्ध होण्यासाठी आवश्यक असलेल्या अष्टांग साधनेपैकी महत्त्वाचे अंग असलेली ‘स्वभावदोष-निर्मूलन आणि गुण-संवर्धन प्रक्रिया’ सविस्तर समजून घेतली. गायनकला, वादनकला, नृत्यकला इत्यादी सादरीकरणाच्या कला (Performing Arts) आहेत. या कलांचे सादरीकरण करणार्या कलाकारांमध्ये अहं वाढण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे साधक-कलाकाराने अहंकाराविषयी नेहमी सतर्क रहाणे आवश्यक आहे. अहंकार हा कलाकाराच्या कलेच्या माध्यमातून ईश्वराशी एकरूपता साधण्याच्या साधनेतील मोठा अडथळा आहे. अहंकाराच्या निर्मूलनासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ सांगितली आहे.
‘या लेखाच्या मागील भागात आपण ‘कलाकारात साधनेसाठी बाधक असलेले अहंचे पैलू कोणते असू शकतात ?’, हे सविस्तर समजून घेतले. मागील लेखाच्या माध्यमातून आपल्यालाही आपल्यातील अहंचे पैलू कळण्यास साहाय्य झाले असेल.
लेखाच्या आजच्या भागात आपण ‘कलाकारातील अहंच्या विविध पैलूंचा परिणाम त्याच्यावर आणि त्याच्या कलेवर कशा प्रकारे होतो ? तसेच समाजातील ज्येष्ठ कलाकारांनी अहंकार-निर्मूलनाविषयी आणि संगीत-साधनेविषयी सांगितलेली मार्गदर्शक सूत्रे’ जाणून घेणार आहोत.
(भाग २)
भाग १ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1044617.html

५. अहंकाराच्या वाढीमुळे कलाकार आणि त्याची कला यांवर होणारे परिणाम
अ. अहंकारामुळे कलाकाराची नवीन शिकण्याची वृत्ती नष्ट होते. इतरांनी त्याला दिलेल्या चांगल्या सल्ल्याचा विचार त्याच्याकडून होत नाही. कार्यक्रमाचे संयोजक, सहकलाकार इत्यादींच्या समवेत त्याचे पटेनासे होते अथवा काही वेळा त्याचे त्यांच्याशी शत्रुत्वही निर्माण होते. जेथे शिकणे थांबते, तिथे ‘डेड एन्ड (Dead End)’ असतो, म्हणजे त्याचा प्रगतीकडे जाणारा मार्ग थांबतो. इथूनच कलाकाराची घसरण चालू होते.
आ. जोपर्यंत कलाकाराच्या स्पर्धेत प्रतिस्पर्धी म्हणून दुसरा कलाकार येत नाही, तोपर्यंत तो कलाकार पैसा आणि प्रसिद्धी यांच्या शिखरावर असतो; परंतु जेव्हा एखादा तोडीस तोड कलाकार प्रतिस्पर्धी म्हणून येतो, तेव्हा मनाप्रमाणे कार्यक्रम न मिळाल्याने ‘मान-अपमान, स्वतःची प्रतिमा जपणे’, अशा अहंच्या अनेक पैलूंमुळे उत्तम कलाकार असूनही छोट्या छोट्या गोष्टींमुळे त्याच्या मनात नैराश्य निर्माण व्हायला लागते. त्याच्या मनाचा समतोल ढळू लागतो. याचा परिणाम त्याच्या कलेच्या सादरीकरणावरही दिसून येतो. तीव्र अहंकारामुळे कलाकार व्यसनाधीनतेकडेही वळू शकतो.
इ. अधिक अहंकारी कलाकाराच्या कलेतील स्पंदनेही सात्त्विक नसतात. त्यामुळे अशा कलाकाराची कला ऐकतांना किंवा पहातांनाही मनाला चांगले वाटत नाही. याउलट कलाकार नम्र असेल आणि त्याच्यात भाव असेल, तर अशा कलाकाराची कला सकारात्मकता देणारी असून ती ऐकणार्याच्या, तसेच पहाणार्याच्या अंतर्मनाला स्पर्शून जाते.
याचे उदाहरण बघायचे झाल्यास काही प्रसिद्ध कलाकारांच्या कलांचे जुने ध्वनीमुद्रण (‘रेकॉर्डिंग’), म्हणजे ते नुकतेच बाहेर कला सादर करू लागले होते, त्या वेळचे आणि त्यांना प्रसिद्धी मिळाल्यानंतरचे त्यांचे ध्वनीमुद्रण आपण पाहिले किंवा ऐकले, तर या दोन्हींमध्ये आपल्याला बराच फरक जाणवतो. आरंभी कलाकारामध्ये ‘कलेकडे साधना म्हणून पहाणे, नम्रता’ इत्यादी घटक असतात; परंतु पैसा आणि प्रसिद्धी मिळू लागल्यावर त्याचा कलेप्रतीचा भाव हळूहळू नकळत न्यून होऊ लागतो. हे आपल्याला त्याची कला ऐकतांना किंवा पहातांना प्रकर्षाने जाणवू लागते.
ई. आज समाजातील कलाकारांमध्ये ‘टोकाची भूमिका घेणे, नकारात्मकता, सूडबुद्धी’, असे अहंचे अनेक पैलू आपल्याला पहायला मिळतात. काही कलाकार तर अपयश पचवू न शकल्याने आत्महत्येसाठीसुद्धा प्रवृत्त झालेले दिसतात.
६. अहं-निर्मूलनाच्या संदर्भात समाजातील मान्यवर कलाकारांनी सांगितलेली मार्गदर्शक सूत्रे !
६ अ. विदुषी सौ. अनुपमा भागवत, सतारवादक, बेंगळुरू : ‘मी संगीत शिकत असतांना एकदा माझ्या गुरूंना विचारले, ‘‘आपण कलेला ईश्वराचे देणे म्हणतो; परंतु काही चांगले कलाकार माणुसकी सोडून का वागतात ?’’ तेव्हा माझे गुरुजी म्हणाले, ‘‘कलेतून मिळणारा मान आणि प्रसिद्धी यांमुळे असे होते. यासाठी कलाकार स्वतःकडे कायम लक्ष ठेवत या सर्वांपासून जेवढा लांब राहील, तेवढा त्याचा कलेतून साधनेचा प्रवास चांगला होईल.’’
६ आ. प्रसिद्ध बासरीवादक पद्मश्री रोणू मजुमदार, मुंबई : ‘अध्यात्म हे इमानदारीचे, पवित्र विचारांचे नाव आहे. द्वेष नसलेले शुद्ध मन असेल, तर त्याचा परिणाम तुमच्यावर होईलच, तसेच तुमच्या संपर्कात येणार्यालाही ते जाणवेल.’
६ इ. पं. अरविंदकुमार आझाद, प्रसिद्ध तबलावादक, पुणे : ‘स्वभावात नम्रता येण्यामागचे कारण, म्हणजे ‘यात माझे काही नसून गुरूंनी दिलेले मी सांभाळत आहे’, हा भाव ठेवणे.’
६ ई. पद्मश्री स्वरचंद्रिका सौ. पद्मजा फेणाणी-जोगळेकर, मुंबई : ‘यश हे मृगजळाप्रमाणे आहे. यशाच्या मागे धावू नका, तर सतत अभ्यास करा. शिकत रहा.’
६ उ. पं. जयतीर्थ मेवुंडी, शास्त्रीय गायक, हुब्बळ्ळी, कर्नाटक : ‘शरिराला साथ देणे’, हे देवाचेच कार्य आहे. मी व्यासपिठावर बसतो; पण माझ्या गळ्यातून गाणे आलेच नाही तर…? मला गाताच आले नाही तर…? गातांना मध्येच आवाज बसला, तर काय करणार ? त्यामुळे ‘गायन करू शकणे’, हे देवाचेच काम आतून चालू असते. आपण केवळ पूर्ण शरणागतीने प्रत्येक गाणे म्हणावे. भारतरत्न पं. भीमसेन जोशी म्हणायचे, ‘‘जेव्हा आपण गातो, तेव्हा देवाला समर्पित करूनच गायचे आहे.’’ ‘कलाकाराचे दोष आणि अहं वाढू नये’, यासाठी त्याने आध्यात्मिक होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.’
७. अहंकारी कलाकार आणि अहं अल्प असणारा कलाकार, यांच्या वर्तनातील भेद दर्शवणारी उदाहरणे !
एका रुद्रवीणा वादनाच्या कार्यक्रमात एक अहंकारी रुद्रवीणावादक त्याला तबल्याची साथ करणार्या सहकलाकाराला सर्व प्रेक्षकांसमोर जोरात ओरडून ‘तीनताल (एक प्रकारचा ताल) वाजव’, असे सांगत होता. प्रत्यक्षात तबलावादक तीनतालच वाजवत होता. दोन-तीनदा असे झाल्यावर त्या वीणावादकाला जेव्हा आपली चूक लक्षात आली, तेव्हा त्याने तबलावादक आणि प्रेक्षक यांची क्षमा मागून कार्यक्रम थांबवला.
याउलट एक जगविख्यात; परंतु अतिशय नम्र, असे तबलावादक पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांच्या एका कार्यक्रमाच्या वेळी ते तबला वाजवत असतांना जेव्हा त्यांचा ध्वनीक्षेपक (माईक) स्टँडवरून सारखा खाली घसरायला लागला, तेव्हा ते एका हाताने माईक वर करत होते. तो परत खाली यायच्या मधल्या वेळेत त्याच तालातील तबल्यातील करामती दाखवत त्यांनी प्रेक्षकांना हसवत ठेवले. त्यामुळे कार्यक्रमातील वातावरण प्रसन्न राहून प्रेक्षक आणि कलाकार, अशा दोघांनाही त्याचा आनंद घेता आला. अशा प्रसंगी कलाकाराची आयोजकांवर चिडचिडही होऊ शकते. कलाकाराची सहजता हीसुद्धा अहंकार अल्प असल्याचे लक्षण आहे.
८. अहंमुळे दुःख वाट्याला येते !
अहंकारामुळे होणारी सगळ्यांत मोठी हानी, म्हणजे अहंमुळे दुःख वाट्याला येते. समर्थ रामदासस्वामींनी दासबोधामध्ये म्हटले आहे,
मी कर्ता ऐसें म्हणसी । तेणें तूं कष्टी होसी ।
राम कर्ता म्हणतां पावसी । यश कीर्ति प्रताप ।। – दासबोध, दशक ६, समास ७, ओवी ३६
अर्थ : ‘मी’ म्हणून जेवढे कर्म करशील, तेवढे दुःखच पदरी पडणार; परंतु ‘कर्ता-करविता भगवंत (राम) आहे’, हे जाणल्याने यश आणि कीर्ती आपोआप मिळते.
त्यामुळे साधक-कलाकाराने कला-साधनेतील अहंकाराचा धोका लक्षात घेऊन त्याविषयी सतत सतर्क रहाणे आवश्यक आहे, तरच तो कला-साधनेतून ईश्वरप्राप्तीच्या दिशेने सहजतेने मार्गक्रमण करू शकेल.
या लेखाच्या पुढील भागात आपण अहंकार-निर्मूलनासाठी साधक-कलाकाराने करायच्या प्रयत्नांविषयी जाणून घेणार आहोत.’
याच्या नंतरचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/1049745.html
(क्रमशः)
संग्राहक : सौ. भक्ती विश्वनाथ कुलकर्णी, संगीत-अभ्यासक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (१९.५.२०२६)
क्रिकेटचा उदो उदो नको !
बलात्कार प्रकरणी पोलीस आणि प्रशासन यांना निर्देश देणारे झारखंड उच्च न्यायालयाचे निकालपत्र !
मनुष्याचे शरीर, चित्त, मन आणि बुद्धी यांच्यावर प्रारब्धाचा असलेला प्रभाव अन् त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध !
ओस पडत चाललेल्या चर्चचा पंचनामा ?
स्त्रीत्वाचा उत्सव !
स्वीकारण्याची वृत्ती असलेल्या आणि तळमळीने अन् भावपूर्ण सेवा करणार्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती मधु मेहता !