आदिवासी कि वनवासी ?

शब्दांना अर्थ असतो; म्हणूनच ते जाणीवपूर्वक योजले जातात. असे जाणीवपूर्वक योजलेले शब्द पुढे जाऊन अर्थाला अपेक्षित परिणामही घडवत रहातात. ‘आदिवासी’ हा एक असा शब्द आहे, जो पाश्चिमात्य विद्वानांनी मुद्दाम योजला. हा शब्द भारताच्या प्राचीन वाङ्मयात नाही. इतकेच कशाला, इथल्या मूळ म्हणून सांगितल्या जातात, त्या मुंडारी आणि ऑस्ट्रिक भाषांतही तो नाही. भारतातील जंगलात रहाणारे आणि मैदानी भागात रहाणारे लोक वेगवेगळ्या वंशाचे अन् संस्कृतीचे आहेत, असा विचार पेरायला पाश्चिमात्य विद्वान, तसेच मिशनरी यांनी प्रारंभ केला, त्यातून योजलेला शब्द म्हणजे ‘आदिवासी’.

१. ब्रिटीश प्रशासक आणि ख्रिस्ती मिशनरी यांनी रुजवलेले चुकीचे शब्द

अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया येथे ‘ॲबओरिजिनल्स’,  ‘इंडिजिनस’, अशी संकल्पना होती; कारण तिथे युरोपियन लोकांनी बाहेरून जाऊन स्थानिक लोकांना आणि संस्कृतीला संपवले होते. भारतात तशी परिस्थिती नव्हती. येथील सर्वांचे पूर्वज आणि संस्कृती एकच होती; परंतु ब्रिटीश प्रशासकांनी आणि ख्रिस्ती मिशनर्‍यांनी पाश्चात्त्य सिद्धांतांची हुबेहूब नक्कल करून भारतामध्येही ‘मूळ रहिवासी विरुद्ध नंतर आलेले आक्रमक’ असा चुकीचा विषार पेरला. त्या ‘ॲबओरिजिनल्स’ शब्दाचे आणि त्याच्या अर्थासह संकल्पनेचे भारतीय रूप, म्हणजे ‘आदिवासी’ अन् ‘मूलनिवासी’.

२. आदिवासी शब्दावरून होत असलेला वाद

श्री. प्रसन्न शिवराम बर्वे

‘आदिवासी’ हा शब्द पहिल्यांदा वर्ष १९३० च्या दशकात (साधारण वर्ष १९३० ते १९३५ या कालावधीत) अधिकृतपणे वापरात आला. प्रसिद्ध समाजसुधारक ठक्कर बाप्पा यांनी वर्ष १९३० च्या दशकात जंगलात आणि डोंगराळ भागात रहाणार्‍या लोकांसाठी सामूहिकरित्या ‘आदिवासी’ (आदि – प्रारंभीचे, वासी – रहिवासी) हा शब्द पहिल्यांदा मोठ्या प्रमाणावर प्रचलित केला. त्याच काळात आजच्या झारखंडमधील (तेव्हाचा बिहार) ‘छोटा नागपूर’ भागातील वनहक्कांसाठी लढणार्‍या राजकीय कार्यकर्त्यांनी स्वतःची राजकीय ओळख निर्माण करण्यासाठी हा शब्द स्वीकारला. त्यातून ‘आदिवासी महासभे’चा उदय झाला. ‘आदिवासी महासभे’चे नेते जयपाल सिंह मुंडा यांनी राज्यघटनेत ‘आदिवासी’ हा शब्द वापरण्याची मागणी केली होती; परंतु घटना समितीने ती नाकारली. ठक्कर आणि मुंडा हे दोघेही आदिवासी शब्द वापरत असले, तरी त्यांच्यात एक वैचारिक भेद होता. आदिवासी हे हिंदु संस्कृतीचाच भाग असल्याचे ठक्करबाप्पांचे मत होते. ‘आम्ही हिंदु नाही आणि कधीच नव्हतो’, असे मुंडा यांचे मत होते. ‘आदिवासींना बळजोरीने हिंदु ठरवणे किंवा त्यांच्यावर हिंदु रितीरिवाज लादणे, म्हणजे आदिवासींची मूळ निसर्गपूजक संस्कृती नष्ट करणे’, असे मुंडांचे म्हणणे होते. मुंडा हे आदिवासी होते, हे सांगितले जात असले, तरी ते मिशनरी संस्कृतीत वाढलेले ख्रिस्ती होते. ख्रिस्ती पंथाने जगभर निसर्गपूजक संस्कृती संपवल्या, हे मुंडा यांना ठाऊक नव्हते काय ? निश्चितच आणि चांगलेच ठाऊक होते. तरीही स्वत:स ख्रिश्चॅनिटीपासून दूर न करता त्यांनी कायम वनात अन् जंगलात रहाणार्‍यांना निसर्गपूजक हिंदु  संस्कृतीपासून तोडण्याचे काम केले.

३. ख्रिश्चॅनिटीला निसर्गपूजक संस्कृती संपवता न येणे

वनात, जंगलांच्या पायथ्याशी, सखल किंवा मैदानी भागात आणि समुद्रकिनारी रहाणारे यांत भौगोलिक परिस्थितीप्रमाणे वागण्या-बोलण्यात भेद आहेत; पण त्यांची संस्कृती एकच आहे. हिंदु ही जगातील एकमेव जिवंत निसर्गपूजक संस्कृती आहे. सगळ्या धारणा, विचार, सण, उत्सव, संकेत हे एकाच निसर्गपूजक संस्कृतीतून आलेले आहेत. राखीगढीच्या जनुकीय संशोधनात ‘सर्व भारतियांचे मूळ एकच आणि त्यात सातत्य आहे’, असे समोर आले आहे. त्यामुळे ना मानवी वेगळेपण आहे, ना संस्कृतीचे वेगळेपण आहे; भेद आहे तो त्याच्या भौगोलिक रचनेनुसार आलेला. हेच फरक, संघर्षबिंदू (फॉल्टलाईन) शोधून ते मोठे करून संपूर्ण जगातील निसर्गपूजक संस्कृती नष्ट करणार्‍या ख्रिश्चॅनिटीला भारतात ते का पूर्णपणे जमले नाही ? त्यामागे मुख्य कारण, म्हणजे तात्त्विक आणि वैचारिक बैठक. ज्या निसर्गपूजक संस्कृती संपल्या, ते केवळ निसर्गपूजक होते, त्यामागचा विचार विभिन्न स्तरावर मौखिक किंवा लिखित स्वरूपात रुजला नव्हता.

४. हिंदु संस्कृती नष्ट करण्यासाठी रचलेले कारस्थान

हिंदु संस्कृती टिकून राहिली; कारण आपल्याकडे ती वैचारिक बैठक होती आणि अजूनही आहे. ही वैचारिक बैठक नष्ट करण्यासाठी पुष्कळ कष्ट लागतात, सातत्य लागते आणि शेकडो वर्षे द्यावी लागतात. त्यांची ती सिद्धता होती. म्हणून त्यांनी भाषेची वर्गवारी केली आणि तिला वांशिक वर्गवारीपर्यंत आणून जोडले. त्यातूनच अशी स्थानिक माणसे शोधून काढली आणि वाढवली, जी हा भेद मोठा करत रहातील. अशा लोकांना जातीय आणि सामाजिक अस्मिता यांचे प्रतीक बनवले. त्यामुळे आता त्यांना विरोध, म्हणजे समाजाला, जातीला विरोध ही भावना दृढ झाली. जे वनवासी लोकांविषयी केले गेले, तेच आर्य-द्रविड, दलित-सवर्ण (तथाकथित) आणि शीख यांच्याविषयीही केले गेले. परिणामी सगळे हिंदु संस्कृतीपासून स्वत:ला वेगळे सिद्ध करू लागले.

५. ब्रिटीश राजवटीतील कथानक आणि त्याचे खंडण

ब्रिटीश राजवटीत जेव्हा संथाल परगणा आणि छोटा नागपूर भागात नवीन भूमी महसूल व्यवस्था (कायम धारा पद्धत) लागू झाली, तेव्हा जंगल अन् भूमी बळकावण्यासाठी बाहेरून लोक आले. यामध्ये हिंदु जमीनदार आणि सावकार (महाजन) जसे होते, तसेच मुसलमान व्यापारी, ब्रिटीश अधिकारी अन् नंतर आलेले ख्रिस्ती मिशनरीसुद्धा होते. या सर्वांसाठी ‘दिक्कू’ हा शब्द वापरात आला. जर निसर्गपूजक संस्कृतीवर हिंदु संस्कृतीने आक्रमण केले असते, तर हा शब्द सहस्रो वर्षांपूर्वीच यायला हवा होता; पण तो आधुनिक आहे. यावरूनच ‘हिंदु संस्कृती लादली’, हा विचार टिकत नाही. संथाली आणि मुंडारी भाषेत स्वतःच्या समुहाला ‘होर’ किंवा ‘होडोपोन’ (माणूस किंवा मानव) म्हणतात. द्रविडी भाषांत डोंगरावर रहाणार्‍यांना ‘मळैवासी’ (डोंगरावरील रहिवासी) किंवा ‘कूळ’, तर जंगलात रहाणार्‍यांना ‘काडूवासी’ (वनात रहाणारे) म्हटले जायचे. ऑस्ट्रिक (मुंडा) भाषा समुहातील (उदा. संथाली, मुंडारी, हो) लोक स्वतःला किंवा इतरांना ओळखण्यासाठी ‘आदिवासी’सारखा कालवाचक शब्द (आधी-नंतर) कधीच वापरत नाहीत. द्रविड भाषांमधील मूळ शब्दमूळ प्रोटो-द्रविड किंवा प्राचीन तमिळ, कन्नड, तेलुगु भाषांमध्येही ‘आदिवासी’ या संकल्पनेला समांतर शब्द नाही.

‘वनवासी’ हा स्थानवाचक शब्द ‘स्थान’ किंवा ‘भूगोल’ दर्शवतो. याचा अर्थ होतो, ‘जंगलात किंवा वनात रहाणारे’. हा शब्द कुठेही कोण आधी आले आणि कोण नंतर आले, हा काळाचा किंवा वंशाचा भेद करत नाही. तो संपूर्ण भारतीय समाज हा एकच आहे आणि त्यातील काही लोक वनात रहातात, हे सत्य हा शब्द स्पष्ट करतो. ‘आदिवासी’ हा कालवाचक किंवा आक्रमण सूचक ओळख सांगणारा शब्द आहे. ‘आदि’, म्हणजे सर्वांत पहिले. हा शब्द वापरल्याने नकळतपणे एक असा संदेश जातो की, हे लोक ‘पहिले’ आहेत आणि बाकीचे सर्व हे ‘नंतर आलेले’ किंवा ‘बाहेरचे’ आहेत, ही एकाच संस्कृतीच्या लोकांमध्ये ‘परकेपणाची’ भावना निर्माण होते. एका प्रदेशात आणि एका कालखंडात केवळ ‘आदिवासी’च रहात होते अन् अन्य कुणीच नव्हते, हे न पटणारे आहे.

६. आदिवासींमध्ये रुजवला जाणारा घातक विचार

या सगळ्यात एक अत्यंत घातक विचार रुजवला जातो. तो, म्हणजे इस्लामी आणि ख्रिस्ती विचार रुजवण्यासाठी जे अत्याचार करण्यात आले, त्यांना सामान्य करणे किंवा नाहीसे करणे यांसाठी. ख्रिस्ती आणि मुसलमान यांना दोष द्यायचा असेल, तर हिंदूंना तो स्वत:लाही द्यावा लागेल; कारण ‘आदिवासींना पहिल्यांदा हिंदु करण्यात आले, नंतर मुसलमान किंवा ख्रिस्ती. सगळेच बाहेरून आलेले, सगळ्यांनीच आमच्यावर अन्याय केला’, हा घातक विचार रुजवला जात आहे. त्यासाठी तेव्हा योजलेला ‘आदिवासी’ शब्द आता अत्यंत उपयुक्त, साहाय्यक ठरण्यासह त्याचा अर्थ आणि हेतू आता फलद्रूप होत आहे.

– श्री. प्रसन्न शिवराम बर्वे, पणजी, गोवा. (३१.५.२०२६)