महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने मंगळुरू (कर्नाटक) येथे भावपूर्ण वातावरणात झालेले ‘ईश्वरप्राप्तीसाठी संगीत-साधना शिबिर’ !

‘१२ ते १४.५.२०२६ या कालावधीत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने मंगळुरू (कर्नाटक) येथे ३ दिवसांचे ‘ईश्वरप्राप्तीसाठी संगीत-साधना शिबिर’ घेण्यात आले. या शिबिराचा लाभ कर्नाटक, तमिळनाडू, आंध्रप्रदेश आणि केरळ, या ४ राज्यांतील एकूण २५ शिबिरार्थींनी घेतला. हे शिबिरार्थी गायन, वादन आणि नृत्य, या कला शिकणारे होते.

संगीत-साधना शिबिरात सहभागी झालेले शिबिरार्थी आणि आयोजक-साधक

१. शिबिराचे स्वरूप

शिबिराचा शुभारंभ शंखनादाने झाला. त्यानंतर सौ. अनघा जोशी (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ४५ वर्षे) यांनी संगीताची आराध्य देवी श्री सरस्वती हिचे स्तुतीपर गायन केले. या ३ दिवसांच्या शिबिरामध्ये ‘कलेला साधनेची जोड कशी द्यावी ? कलेतील सूक्ष्म स्पंदनांचा अभ्यास कसा करावा ? कलेतून साधनेचा पाया सिद्ध होण्यासाठी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया कशी राबवावी ? कलेचे सादरीकरण करतांना भावजागृतीसाठी प्रयत्न कसे करावेत ?’, अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरार्थींकडून या विषयांचा अभ्यास कलेतील प्रात्यक्षिकांसह करून घेण्यात आला. गटचर्चेमध्ये सगळे शिबिरार्थी मोकळेपणाने बोलले आणि त्यांनी त्यांच्या अडचणी मांडून मार्गदर्शन घेतले. सर्व शिबिरार्थींचा शिबिरातील सहभाग चांगला होता. शिबिरार्थी उत्स्फूर्त आणि अचूक उत्तरे देऊन शिबिरात सहभाग घेत होते.

शिबिरामध्ये सुश्री तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के), सौ. अनघा जोशी आणि श्री. मनोज सहस्रबुद्धे यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. शिबिराचे सूत्रसंचालन कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय १९ वर्षे) हिने केले.

या शिबिराला सनातनचे ७५ वे संत पू. रमानंद गौडा (वय ५० वर्षे) यांनी भेट दिली. त्या वेळी त्यांनी शिबिरार्थींना कलेतून साधना करण्यासाठी कृतीप्रवण होण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले.

सुश्री तेजल पात्रीकर

२. कलेच्या सादरीकरणाची प्रात्यक्षिके 

अ. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाची साधिका कु. अपाला औंधकर हिने श्री सरस्वतीदेवीच्या स्तुतीपर भजनावर भरतनाट्यम् नृत्याची प्रस्तुती केली. त्या वेळी ‘कलेचे सादरीकरण करतांना साधक-कलाकाराचा भाव कसा असावा ? कलेचे सात्त्विक प्रदर्शन कसे असावे ?’, हे शिबिरार्थींनी अनुभवले. या नृत्य-प्रस्तुतीच्या वेळी उपस्थित शिबिरार्थींना विविध अनुभूती आल्या.

आ. शिबिरार्थींपैकी कथ्थक नृत्य करणारी कु. प्रेरणा प्रभु आणि कर्नाटकी भजन गाणार्‍या साधिका सौ. अपर्णा भट यांचे प्रात्यक्षिक ठेवण्यात आले होते. या दोघींनी त्यांची कला नामजप न करता आणि नामजप करून सादर केली. शिबिरार्थींना ‘या दोन्ही प्रस्तुतींच्या वेळी काय जाणवते ?’, याचा अभ्यास करण्यास सांगितला होता. नामजपानंतर नृत्य करणार्‍या साधिकेतील सहजता सगळ्यांना अनुभवता आली, तसेच साधिकेच्या भावपूर्ण गायनाने बर्‍याच शिबिरार्थींची भावजागृती झाली. नामजप करून कला सादर केल्याने कलेत सकारात्मक स्पंदने निर्माण झाली. या स्पंदनांचा प्रायोगिक स्तरावर अभ्यास झाल्यामुळे साधनेचे महत्त्व सगळ्या शिबिरार्थींच्या लक्षात आले.

शिबिराची सांगता सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करणार्‍या ‘धन्य धन्य हम हो गए गुरुदेव…’ (म्हणजे गुरुदेव, आम्ही धन्य धन्य झालो)’, या भावपूर्ण गीताने झाली. या गीतामुळे शिबिरातील वातावरण भावपूर्ण झाले होते. या वेळी शिबिरार्थींची भावजागृती झाली. ‘या शिबिराचा शिबिरार्थींनी भावाच्या स्तरावर लाभ करून घेतला’, असे आमच्या लक्षात आले.

३. शिबिराची क्षणचित्रे

अ. १४ वर्षे वयाचा कु. आदित्य भट याची अनुभूती : शिबिरामध्ये ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आलेले नामजप आणि अन्य नामजप’, यांचा अभ्यास करून घेण्यात आला. त्या वेळी कु. आदित्य भट (वय १४ वर्षे) याने सांगितले, ‘‘अन्य नामजप मी बाह्य कानांनी ऐकत होतो; परंतु गुरुदेवांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आलेला नामजप लावल्यावर तो ऐकतांना ‘माझा जप श्वासाला कधी जोडला गेला आणि आतून कधी व्हायला लागला ?’, हे मलाच समजले नाही. मी यासाठी काहीच वेगळे प्रयत्न केले नाहीत.’’ एवढ्या लहान वयात आदित्यचे हे आध्यात्मिक स्तरावरील निरीक्षण कौतुकास्पद होते.

आ. भावावस्था आ:णि दैवी कण : शिबिराच्या दुसर्‍या दिवशी सर्व शिबिरार्थी भावावस्थेत होते. त्या दिवशी रात्री शिबिरस्थळी स्वच्छता करतांना साधकांना अनेक रंगांचे दैवी कण दिसले. ‘या दैवी कणांच्या माध्यमातून ईश्वराने सगळ्यांना भरभरून आशीर्वाद दिला’, असे आम्हाला जाणवले.

इ. शिबिर चालू असलेल्या सभागृहाच्या समोरच एका संतांची खोली होती. ‘शिबिर चालू असतांना मला भावाची स्पंदने सभागृहातून माझ्या खोलीत येतांना जाणवायची’, असे त्या संतांनी सांगितले.

 ४. शिबिरार्थींच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे

४ अ. ‘शिबिरामुळे ‘संगीताच्या माध्यमातून ईश्वरप्राप्ती’, हे खरे ध्येय मिळाले’, असे शिबिरार्थींनी सांगणे :  शिबिरामधील शिबिरार्थी अनेक वर्षांपासून संगीत शिकणारे होते. त्यांतील २ जणांनी सांगितले, ‘‘आम्ही पुष्कळ वर्षे संगीत क्षेत्रात आहोत; परंतु ‘कला शिकण्याचे ध्येय काय आहे ?’, हे आम्हाला ठाऊकच नव्हते. या शिबिरामुळे आम्हाला ‘संगीताच्या माध्यमातून ईश्वरप्राप्ती करणे’, हे खरे ध्येय मिळाले आहे.’’

४ आ. मनोगत व्यक्त करतांनाही शिबिरार्थींची पुष्कळ भावजागृती होत होती. त्या वेळी ते म्हणाले, ‘शिबिरामुळे आमच्या व्यक्तीमत्त्वाचा आध्यात्मिक विकास चालू झाला आहे.’

४ इ. शिबिरार्थींनी त्यांना आलेल्या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे कृतज्ञताभावाने लिहून देणे : सर्व शिबिरार्थींनी घरी जाण्यासाठी निघण्यापूर्वी त्यांना आलेल्या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे लिहून दिली. शिबिरार्थींनी हे लिखाण एकाग्रतेने केले. त्या लिखाणामध्ये सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव, शिबिर अन् आयोजक-साधक यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञताभाव जाणवत होता.

४ ई. ‘शिबिर संपल्यावर घरी जाऊ नये’, असे पुष्कळ जणांना वाटले आणि निघतांना त्यांची पुष्कळ भावजागृतीही झाली.

४ उ. शिबिरार्थींना एका संतांनी वाजवलेली बासरीची धून ऐकवल्यावर त्यातील सात्त्विकतेची अनुभूती घेतल्याने ‘आपल्या कलेतही असे चैतन्य अन् सात्त्विकता निर्माण व्हावी’, अशी त्यांना तळमळ लागली आहे’, असे लक्षात आले.

५. शिबिराच्या पहिल्या दिवशी झालेले आध्यात्मिक त्रास आणि संतांची उपस्थिती अन् साधकांचे भावाच्या स्तरावरील प्रयत्न यांमुळे त्रास दूर झाल्याची आलेली अनुभूती !

पहिल्या दिवशी शिबिरात आध्यात्मिक त्रासाचे प्रमाण अधिक जाणवत होते. शिबिरस्थळी दाब जाणवत होता. त्या दिवशी शेवटच्या सत्रामध्ये भावजागृतीचा सामूहिक प्रयोग झाल्यावर शिबिरार्थींनी भाव अनुभवल्यामुळे ‘दुसर्‍या दिवशी सकाळपासूनच शिबिराच्या ठिकाणचा दाब न्यून झाला आहे’, असे जाणवले.

दुसर्‍या दिवसापासून शिबिरार्थींची भावजागृती होऊ लागली. भावाच्या स्पंदनांमुळे वातावरणातील हलकेपणा वाढत गेल्याचे लक्षात आले. भावजागृतीच्या प्रयोगानंतर सर्वांमध्ये ‘अंतर्मुखता आणि सहजता’ वाढल्याचे लक्षात आले.

आ. पहिल्या दिवशी शिबिरातील चैतन्य सहन न झाल्याने शिबिरात सहभागी एका साधिकेला त्रास होऊ लागला. २ शिबिरार्थींच्या मनात अनावश्यक नकारात्मक विचार आले. ‘शिबिरातून परत जाऊया’, असा विचार मनात आला’, असे त्यांनी सांगितले. एका शिबिरार्थीला पाठीत कोणीतरी लाथ मारत असल्याप्रमाणे वेदना व्हायला लागल्या.

शिबिरात ‘कलेतून साधना’, हा विषय घेतांना ‘विषय भरकटत आहे कि काय ?’, असा विचार तो विषय घेणार्‍या साधिकेच्या मनात येत होता. (प्रत्यक्षात विषय योग्य पद्धतीनेच होत होता.) गुरुकृपेमुळे सर्व शिबिरार्थींना या त्रासांवर मात करता आली आणि दुसर्‍या दिवसापासून आध्याित्मक त्रास न्यून होऊन शिबिरातील वातावरणच पालटले असल्याचे सगळ्यांनी अनुभवले. यातून ‘अनिष्ट शक्तींचे अडथळे कसे असतात ?’, हे शिबिरार्थींना अनुभवता आले.

शिबिर भावाच्या स्तरावर होणार असल्याने, तसेच ‘त्याचा लाभ शिबिरार्थींना मिळू नये’, यासाठी अनिष्ट शक्तींनी शिबिराच्या पहिल्याच दिवशी आध्यात्मिक त्रासाचा भाग वाढवला होता’, असे लक्षात आले; परंतु संतांची उपस्थिती आणि सर्व साधकांचे भावाच्या स्तरावरील प्रयत्न, यांमुळे आध्यात्मिक त्रास दूर होऊन शिबिरार्थी साधकांना शिबिराचा आध्यात्मिक स्तरावर लाभ घेता आला.

६. शिबिराचे आयोजन करणार्‍या साधकांना आलेल्या अनुभूती

६ अ. सेवेसाठी साधकसंख्या अल्प असूनही मनावर ताण न येता शिबिरातील सर्व सेवा सहजतेने पूर्ण होणे :  शिबिराच्या आयोजनाची सेवा करणार्‍या साधकांनी सांगितले, ‘‘एरव्ही अन्य विषयांचे शिबिर असले, तरी ‘सेवा करतांना धावपळ होणे, मनावर सेवेचा ताण रहाणे’ इत्यादी होते; परंतु या शिबिराच्या वेळी सेवेसाठी साधकसंख्या अल्प असतांनाही आमच्या मनावर कोणताही ताण न रहाता सेवा सहजतेने कशा पूर्ण होत गेल्या ?’, हे आमचे आम्हालाच कळले नाही.’’

६ आ. ‘स्वतःचे मन भावजागृतीच्या प्रयत्नांची आठवण करून देत आहे’, असे जाणवणे : शिबिराच्या सेवेमध्ये सहभागी असलेल्या श्री. अमर यांनी सांगितले, ‘‘एरव्ही शिबिराची सेवा करत असतांना मला स्वतःला सारखे सांगावे लागते, ‘तुला भाव ठेवून सेवा करायची आहे’; परंतु या शिबिरात माझे मनच मला ‘भावजागृतीच्या प्रयत्नांची आठवण करून देत आहे’, असे मी अनुभवले.’’

६ इ. शिबिरार्थींची भावजागृती होत होती; परंतु ‘शिबिरातील भावपूर्ण वातावणामुळे आमचीही भावजागृती होत आहे’, असे आम्ही अनुभवत होतो.

‘हे गुरुमाऊली, ‘आपल्या कृपेमुळेच हे शिबिर निर्विघ्नपणे पार पडले. आपणच आम्हा साधकांना यातून अनेकविध पैलू शिकवले’, याबद्दल आपल्या चरणी अनंत कोटीशः कृतज्ञता !’

– सुश्री तेजल पात्रीकर (संगीत विशारद, आध्यात्मिक पातळी ६० टक्के), संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (२९.५.२०२६)

 

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक