गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ अन् कला ! 

‘गायन, वादन, नृत्य आणि नाट्य या कलांतून ईश्वरप्राप्तीसाठी साधना’, याचे प्रास्ताविक विवेचन ! 

४ सप्टेंबर २०२५ या दिवसापासून प्रत्येक गुरुवारी चालू झालेल्या लेखमालेत आपण ‘गायन, वादन, नृत्य आणि नाट्य’, या कलांची माहिती घेत आहोत. या कलांच्या सादरीकरणाचा उद्देश काळाच्या प्रभावामुळे पालटत असला, तरी ‘कलेकडे केवळ कला म्हणून न पहाता कलेतून आध्यात्मिक उन्नती कशी साधावी’, हे येथे पाहूया.

(लेखांक २०)

‘या लेखमालेच्या मागील लेखात आपण कलाकाराच्या साधनेचा पाया सिद्ध होण्यासाठी आवश्यक असलेल्या अष्टांग साधनेपैकी महत्त्वाचे अंग असलेली ‘स्वभावदोष-निर्मूलन आणि गुण-संवर्धन प्रक्रिया’ सविस्तर समजून घेतली. गायनकला, वादनकला, नृत्यकला इत्यादी सादरीकरणाच्या कला (Performing Arts) आहेत. या कलांचे सादरीकरण करणार्‍या कलाकारांमध्ये अहं वाढण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे साधक-कलाकाराने अहंकाराविषयी नेहमी सतर्क रहाणे आवश्यक आहे. अहंकार हा कलाकाराच्या कलेच्या माध्यमातून ईश्वराशी एकरूपता साधण्याच्या साधनेतील मोठा अडथळा आहे. अहंकाराच्या निर्मूलनासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ सांगितली आहे.

मनुष्यामध्ये असलेल्या विविध स्वभावदोषांच्या मागे कोणतातरी अहंकाराचा पैलू कार्यरत असतो, उदा. ‘चिडचिडेपणा’. या स्वभावदोषाच्या मागे ‘मनाप्रमाणे व्हावे’, असे वाटणे इत्यादी अहंकाराचे विविध पैलू कार्यरत असू शकतात. ‘कलाकारामधील अहंचे पैलू कोणते असू शकतात ?’, हे आपण आजच्या लेखात जाणून घेणार आहोत.

(भाग १)

१. कलाकाराचा अहंकार कसा वाढू शकतो ? 

प्रसिद्ध बासरीवादक पद्मश्री रोणू मजुमदार यांनी एक सुंदर वाक्य सांगितले आहे, ‘‘संगीत की शुरुवात अलंकार से होती है, और अंत अहंकार से !’’ याचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे – कलाकाराचा संगीत शिकण्याचा आरंभ ‘सा, रे, ग, म…’, हे अलंकार शिकण्याने होतो. पुढे कलाकार जसजसा कलेत प्रावीण्य मिळवत जातो, तसतसा त्याचा कलेतील अहं वाढून ‘मला सगळे कळते किंवा येते’, या टप्प्याकडे, म्हणजेच अहंकाराकडे त्याची वाटचाल होऊ शकते.

कलाकाराच्या कलेतील प्रवासाविषयी वरील एक वाक्य बरेच काही सांगून जाते. आरंभीच्या टप्प्याला एखादी व्यक्ती जेव्हा कला शिकायला प्रारंभ करते, तेव्हा ती सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणेच असते. जसजसा कलाकार कलेतील थोडा पुढचा टप्पा गाठायला लागतो, तसतशी लोकांच्या स्तुतीमुळे त्याची ‘आपण इतरांपेक्षा कुणीतरी वेगळे अन् मोठे कलाकार आहोत’, अशी धारणा होऊ लागते. कलाकारात अहं-निर्मितीची प्रक्रिया इथेच चालू होते. हा अहंकार आरंभी सुप्तावस्थेत आणि सूक्ष्म असतो; परंतु प्रसंगांनुसार तो प्रगट होऊ लागतो.

२. कलाकाराच्या अहंकार-वाढीचा पुढील टप्पा 

श्री. मनोज सहस्रबुद्धे

कलाकाराची कला पुढील टप्प्याला जाऊ लागल्यावर तो स्वतःला त्या क्षेत्रातल्या दिग्गजांच्या बरोबरीचा समजू लागतो. ‘स्वतंत्र कार्यक्रम करणे आणि त्यातून लोकांच्या टाळ्या, कौतुक अन् मान-सन्मान, हे सर्व स्वीकारणे’, हे करत असतांना त्याच्यात कर्तेपणाची भावना निर्माण होऊ लागते. ‘मी अतिशय कष्टाने कलेतील काहीतरी सुंदर निर्मिती करतो; म्हणून सर्व जण माझे कौतुक करतात. मी कुणीतरी श्रेष्ठ आहे. मला मान-सन्मान मिळतो’, या विचारात त्याचा अहंकार वाढायला लागतो, तसेच यामुळे कलाकार पैसा आणि प्रसिद्धी यांच्या फेर्‍यात अडकायला लागतो.

अशा अहंकारी कलाकारांचे समाजातील वर्तनही पालटायला लागते, उदा. ‘लहान-मोठा’, याचा विचार न करता कुणाशीही उद्धटपणे बोलणे, ज्याने आपल्यावर उपकार केले आहेत, जे आपल्या प्रगतीला कारणीभूत आहेत, अशांशीसुद्धा फटकळपणे वागणे, साथीदारांशी अयोग्य वर्तन करणे इत्यादी. त्याची हीच उर्मटपणाची वागणूक त्याच्या घरात, तसेच नातेवाइकांच्या संदर्भातही दिसायला लागते. अहंकारामुळे कलाकाराचे कलेत आणि कला-साधनेत पतन होते.

३. कलाकारांमधील अहंचे काही पैलू आणि त्यासंबंधित काही उदाहरणे !

३ अ. ‘स्वतःचे कौतुक व्हावे’, अशी अपेक्षा असणे : एखाद्या कार्यक्रमानंतर अथवा मैफिलीनंतर ‘माझ्या कलेचे कौतुक व्हावे’, अशी कलाकाराची अपेक्षा असते. त्याचे कौतुक झाले नाही, तर तो लगेच नकारात्मक विचारात जातो किंवा यासाठी इतरांना दोष देऊ लागतो.

३ आ. तुलना करणे : कला शिकणार्‍या एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेत आपल्याहून अधिक गुण प्राप्त झाल्यास इतर कलाकारांची त्याच्याशी तुलना होते. एखाद्या कलाकाराला आपल्यापेक्षा अधिक मान-सन्मान, समाजात महत्त्व, अधिक मानधन (बिदागी) मिळाले की, त्याच्याविषयी असूया वाटून तुलना होऊ लागते.

३ इ. स्वकर्तृत्वाचा अभिमान असणे : कलाकाराला ‘स्वतःचा आवाज, स्वतःच्या नृत्याविषयीचे वर्चस्व, वादनातील निपुणता’, या कौशल्यांचा अथवा कर्तृत्वाचा ‘मी चांगले करतो’ अथवा ‘माझे चांगले आहे’, असा अभिमान असतो. ‘लोक मला मानतात’, हा सूक्ष्म अहंसुद्धा येथे कार्यरत असतो.

३ ई. स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजणे : ‘इतर कलाकारांपेक्षा मला अधिक ज्ञान आहे’, असे वाटल्याने कलाकार इतरांना तुच्छ लेखू लागतो. त्यामुळे ‘त्याला यातले काय कळते ?’, असे तो दुसर्‍या कलाकाराविषयी नकळतपणे बोलू लागतो.

३ उ. इतरांवर सतत टीका करणे : ‘इतर कलाकारांच्या दोषांवरून त्यांना सतत बोलणे, टोमणे मारणे, त्यांची टिंगलटवाळी करणे’, यांमुळे कलाकाराची वृत्ती बहिर्मुख होते.

३ ऊ. स्वतःची प्रतिमा जपणे : कलेच्या सादरीकरणात आपले काही चुकल्यास ‘इतरांना काय वाटेल ?’, असा प्रतिमेचा विचार कलाकाराच्या मनात येतो. ‘स्वतःची एखादी चूक झाली, तरी तिला झाकण्याचे आटोकाट प्रयत्न करणे आणि ‘स्वतःची प्रतिमा डागाळली जाणार नाही’, याची सतत काळजी घेणे’, असे त्याच्याकडून होऊ लागते.

३ ए. कर्तेपणा घेणे : उत्कृष्ट सादरीकरणानंतर कौतुक झाल्यावर ‘मी हे केले, ते माझ्यामुळे झाले’, असे वाटून कलाकारातील कर्तेपणाचा अहं जागृत होतो. कार्यक्रमाचे आणि कौतुकाचे सगळे श्रेय तो स्वतःकडे घेतो.

३ ऐ. स्वतःच्या मनाप्रमाणे व्हावेसे वाटणे : ‘मला वेळ असतांनाच साथीदारांनी सरावासाठी यावे, कला सादर करण्यासाठी मला अमुक एका कलाकारानंतरच संधी मिळावी, कला सादरीकरणासाठी मला पाहिजे तेवढा वेळ आयोजकांनी द्यावा’ इत्यादी प्रकारच्या विचारांमुळे कोणतीही गोष्ट स्वतःच्या मनाप्रमाणे व्हावी’, याकडेच त्याचा कल अधिक रहातो. त्यामुळे अपेक्षित असे झाले नाही की, ‘चिडचिड करणे, परिस्थिती न स्वीकारणे, राग येणे’ इत्यादी त्याचे परिणाम दिसायला लागतात.

४. प्रसिद्ध तबलावादक तालयोगी पद्मश्री पं. सुरेश तळवलकर यांनी सांगितलेले संगीत-साधनेतील अहं-निर्मूलनाचे महत्त्व !

संगीताचा रियाज (सराव) – अहंकार  = संगीत साधना

अर्थ : संगीताचा रियाज किंवा कला-सादरीकरण यांतून अहंकार उणे केला (घालवला), तरच संगीतातून आपली साधना होऊ शकते.

कलेतून साधनारत असलेले विद्यार्थी किंवा कला-उपासक यांनी वरील सर्व सूत्रांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. साधक-कलाकारांनी ‘वरील अहंच्या पैलूंपैकी आपल्याला कोणते पैलू लागू पडतात ?’, याचा अभ्यास करावा. त्यामुळे त्यांची कला-साधनेतील अंतर्मुखता वाढून त्यांना स्वतःतील अहंचे पैलू दूर करण्यासाठी प्रयत्न करणे सोपे होईल.

साधकांना सूचना आणि हितचिंतकांना विनंती

या लेखमालिकेविषयी कुणाला शंका किंवा प्रश्न असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधावा. – संगीत विभाग, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.

संपर्कासाठी पत्ता –

श्री. मनोज सहस्रबुद्धे

संपर्क क्रमांक : ८७९३६ ७८१७८

ई-मेल : [email protected]

या लेखाच्या पुढील भागात आपण ‘अहंकार वाढल्याने कलाकार आणि त्याची कला यांवर होणारे परिणाम, तसेच या संदर्भातील कलाक्षेत्रातील मान्यवर कलाकारांनी सांगितलेली मार्गदर्शक सूत्रे’ जाणून घेणार आहोत.’

(क्रमशः)

– श्री. मनोज सहस्रबुद्धे, सतारवादक, वाद्य-अभ्यासक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (१९.५.२०२६)

भाग २ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1047278.html