राजकारणाचे हिंदुत्वकरण आणि हिंदूंचे सैनिकीकरण !

‘हिंदु आणि राष्ट्र हितैषी’ सदर !

१. पंडित मदनमोहन मालवीय यांच्या विशाल सभेत ‘अखिल भारतीय हिंदु महासभे’ची स्थापना

‘स्वातंत्र्यवीर दामोदर सावरकर हे भारताचे सर्वांत मोठे स्वातंत्र्यसैनिक, लेखक, क्रांतीकारक, विचारवंत आणि २ वेळा जन्मठेपेची शिक्षा भोगणारे महानायक होते. देशाची सभ्यता, संस्कृती, सीमा आणि समस्त हिंदू यांचे रक्षण व्हावे, यांसाठी त्यांनी सर्वप्रथम ‘राजकारणाचे हिंदुकरण आणि हिंदूंचे सैनिकीकरण’, अशी घोषणा दिली होती. ‘देशाला स्वातंत्र्य मिळावे आणि अखंड हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी’, या उद्देशाने वर्ष १८८३ मध्ये हिंदु महासभेची स्थापना करण्यात आली होती. वर्ष १९१५ मध्ये हरिद्वारमध्ये बैसाखीच्या (पंजाबमधील लोकांचा नववर्ष दिन) दिवशी पंडित मदनमोहन मालवीय यांनी एका विशाल सभेचे आयोजन केले होते. त्यात संत, स्वातंत्र्यसैनिक, राजे-महाराजे यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय स्तरावर ‘अखिल भारतीय हिंदु महासभे’ची स्थापना झाली.

२. भारताचे इस्लामीकरण करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न

श्री. मुन्नाकुमार शर्मा

हिंदु महासभेच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण तन, मन आणि धन अर्पून स्वातंत्र्यसंग्रामात सहभाग घेतला. हिंदु महासभेने स्वातंत्र्य मिळवून दिले; परंतु देशाच्या सत्तेवर कधीही हक्क सांगितला नाही. परिणामी देशाची सत्ता काँग्रेसकडे गेली. सत्ता मिळाल्यानंतर काँग्रेसने  हिंदुस्थानचे इस्लामीकरण करण्याचा प्रयत्न केला. या देशात पूर्वी १०० टक्के हिंदू रहात होते; परंतु मुसलमान आक्रमणकर्त्यांमुळे मोठ्या प्रमाणात येथील हिंदूंचे इस्लामीकरण झाले. तलवारीच्या बळावर हिंदूंना मुसलमान बनवले गेले. त्यानंतर २०० वर्षे ख्रिस्त्यांचे राज्य होते. त्यांच्या काळातही मोठ्या प्रमाणात हिंदूंचे धर्मांतर झाले. त्यामुळे हिंदूंच्या लोकसंख्येचे प्रमाण घटत गेले आणि आजही घटत आहे. जेव्हा शिक्षा संपवून वीर सावरकर देशाच्या राजकारणात आले, तेव्हा त्यांनी अखिल भारतीय हिंदु महासभेमध्ये योगदान देण्याचे स्वीकारले. त्या वेळी त्यांनी सर्वप्रथम ‘राजकारणाचे हिंदुत्वकरण आणि हिंदूंचे सैनिकीकरण करा’, ही घोषणा दिली. त्या वेळी नेहरूंच्या मंत्रीमंडळात शिक्षणमंत्री मुसलमान होते. बंगाल, बिहार यांसह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल मुसलमानधार्जिणे होते. अशा प्रकारे काँग्रेसने संपूर्ण देशाचे इस्लामीकरण चालू केले होते. या इस्लामीकरणाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी विरोध केला.

३. दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी ब्रिटिशांच्या सैन्यात हिंदूंनी सहभागी होण्याचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे आवाहन

दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी त्यांनी ‘हिंदु युवकांनी भारतीय सैन्यात सहभागी व्हावे’, असे आवाहन केले होते. ‘सावरकर इंग्रजांच्या बाजूचे असल्याने ते त्यांची बाजू घेतात’, असा आरोप काँग्रेसने केला होता. यावर सावरकर यांचे म्हणणे होते, ‘जर सैन्यात हिंदु सहभागी झाले नाही, तर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर आपल्या देशाचे रक्षण कोण करणार ? भारताच्या सीमांचे रक्षण कोण करणार ? अन् हिंदूंना मुसलमान आणि ख्रिस्ती  यांच्यापासून कोण वाचवणार ? त्यामुळे हिंदु युवकांनी अधिकाधिक संख्यने इंग्रजकालीन भारतीय सैन्यात सहभागी झाले पाहिजे’, असे त्यांना वाटत होते.’

– श्री. मुन्नाकुमार शर्मा, देहली, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय हिंदु महासभा.