‘श्री समर्थ रामदास – एक अभ्यास’ ग्रंथ : अभ्यासपूर्ण मननीय, चिंतनीय आणि संदर्भ ग्रंथ

‘श्री. सुरेश जाखडी लिखित ‘श्री समर्थ रामदास – एक अभ्यास’ हा ४४८ पानांचा ग्रंथ नुकताच माझ्या हाती आला. लेखकाने समर्थांच्या जीवनचरित्राचा आणि वाङ्मयाचा विविध अंगाने विचार करून सादर केलेला हा परिपूर्ण अभ्यासग्रंथ आहे. यातील ९ प्रकरणांतून स्वामींचे अलौकिक चरित्र, असामान्य व्यक्तीत्त्व, राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक कार्यकर्तृत्व उलगडण्याचा प्रयत्न झाला आहे. स्वामींचे व्यामिश्र (संमिश्र) व्यक्तीमत्त्व कसे आकारत गेले, ते या ग्रंथातून पहाता येते. स्वामींचे गुणविशेष, प्रतिभासामर्थ्य, चिकाटी, अभ्यास, व्यासंग, शिस्त, चारित्र्यसंपन्नता, लोकोद्धाराची तळमळ, हिंदवी स्वराज्याची श्रद्धा, संघटन, संप्रदायाची मांडणी, संस्कृतीरक्षण, विवेक या सार्‍यांचा ऊहापोह ग्रंथात दिसून येतो. यातील सर्वच प्रकरणे अभ्यासपूर्ण मननीय आणि चिंतनीय झाली आहेत.

ग्रंथाचे मुखपृष्ठ

अभ्यासपूर्ण मते आणि प्रगल्भतेने मांडणी 

श्री. सुरेश जाखडी
डॉ. अस्मिता देशमुख

यासाठी लेखकाने समर्थ शिष्य पू. गिरिधरस्वामी, पू. भीमस्वामी, पू. आत्मारामस्वामी यांचे दाखले देत आधुनिक विचारवंत शंकरराव देव, ल.रा. पांगारकर, इतिहासाचार्य वि.का. राजवाडे, डॉ. पु.ग. सहस्रबुद्धे, पू. (प्रा.) के.वि. बेलसरे, श्री.म. साठे यांचे संदर्भ विचार अभ्यासून स्वतःची मते मांडली आहेत. त्यामुळे त्या मतांना प्रगल्भता लाभली आहे. समर्थ विचार पुढील पिढ्यांना प्रेरणादायी असले, तरी समर्थ या ना त्या कारणाने दुर्लक्षित उपेक्षित राहिले. काही टीकाकारांनी समर्थांवर टीका करून स्वामींचे जनप्रियत्व न्यून करण्याचा प्रयत्न केला. स्वामींनी बालवयात देव आणि देश कार्यासाठी स्वतःच्या लग्न मंडपातून केलेले पलायन हा चेष्टेचा विषय झाला. ‘टवाळा आवडे विनोद’, या उक्तीवरून त्यांना विनोदाचे शत्रू ठरवण्यात आले. स्वामींच्या शिवछत्रपतींशी असलेल्या संबंधावर संशय व्यक्त करून त्यांना हिंदवी स्वराज्य कार्यापासून वेगळे करण्यात आले. या सर्व आरोपांना लेखकाने संधी मिळेल, तिथे उत्तरे दिली आहेत. लेखकाच्या मते या टीकाकारांच्या मतात कालविपर्यास आणि मनात दुराग्रह असल्याने अशी टीका होत आहे; पण त्यात काही तथ्य नाही.

या ग्रंथाचे वैशिष्ट्य, म्हणजे त्यातील ओघवती भाषाशैली, साधीसोपी; पण अर्थवाही शब्दरचना, त्यामुळे ग्रंथ वाचतांना कंटाळा न येता उत्सुकता वाढते. पारदर्शी विचारांसह त्या विचारवंतांचे संदर्भ आल्याने एक संदर्भ ग्रंथ म्हणूनही मोल त्याला लाभले आहे. समर्थ वाङ्मयप्रेमी, अभ्यासक, तसेच जिज्ञासू वाचक यांनी हा ग्रंथ एकदा तरी वाचावा, असा आहे.’

– डॉ. अस्मिता देशमुख

पुस्तकाचे नाव : ‘श्री समर्थ रामदास – एक अभ्यास’

लेखक : श्री. सुरेश जाखडी

संपर्क भ्र.क्र. : ७७३८७७८३२२

पृष्ठे : ४४८ आणि मूल्य : ५०० रुपये

प्रकाशक : प्रा. शरयू जाखडी, विजया प्रकाशन, मुंबई.

भ्र.क्र. : ९८२१३०७५०१