सिनेमा अनेकदा व्यक्तींना त्यांच्या स्वप्नांच्या दिशेने झटतांना दाखवतो आणि यातून ही कल्पना दृढ होते की, आपल्या ध्येयांचा पाठपुरावा करणे, हा जीवनाचा एक योग्य उद्देश आहे. स्वप्न साकार झाल्यावर पुढे काय होते, याचा सिनेमा क्वचित्च अभ्यास करतो. कदाचित् याच ठिकाणी सिनेमा अधिक पुढे जाऊ शकतो. केवळ महत्त्वाकांक्षा आणि यश चित्रित करण्यातच नव्हे, तर स्वत्वाच्या पलीकडील उद्देशावर प्रकाश टाकू शकतो. चित्रपट अनेकदा व्यक्तींना त्यांच्या स्वप्नांच्या दिशेने संघर्ष करतांना दाखवतो आणि यातून ही कल्पना दृढ होते की, स्वतःच्या ध्येयांचा पाठपुरावा करणे, हा जीवनाचा एक योग्य उद्देश आहे अन् असे करण्यापासून कुणीही परावृत्त होऊ नये, तसेच तो संघर्षच अस्तित्वाला अर्थ देतो.

१. जीवनातील स्वप्न साकार झाल्यावर ‘पुढे काय ?’, याचा विचार चित्रपटांमधून क्वचित्च होणे
जीवनाचा उद्देश आनंद, यश आणि वैयक्तिक समाधान अनुभवणे, हा आहे. ‘आपल्याला जे हवे आहे, ते मिळवण्यात आणि त्याच्या फळांचा उपभोग घेण्यातच खरा आनंद आहे’, अशी एक गर्भित सूचना अनेक कथांमध्ये असते. त्याच वेळी चित्रपट अपयशी ठरलेल्यांच्या वेदनांचे आणि महत्त्वकांक्षा यांचे चित्रण करतो. यामुळे हा प्रश्न निर्माण होतो की, त्यांना जे हवे होते, ते मिळाले नाही, केवळ याच कारणामुळे ते दुःखी आहेत का ? तरीही ‘स्वप्न साकार झाल्यावर पुढे काय होते’, याचा विचार चित्रपट क्वचित्च करतो.
२. पुढच्या टप्प्याविषयी चिंतन होणे आवश्यक !

अनेक कथा किंवा विचारप्रवाह अप्रत्यक्षपणे असे सुचवतात की, यशामुळे चिरस्थायी आनंद मिळतो; परंतु या गृहितकाचा फारसा विचार केला जात नाही. बर्याचदा यश मिळवण्यावरच त्या कथेचा शेवट होतो. त्यापुढील टप्प्याचा विचार केला जात नाही. हे समजून घेण्यासाठी आपल्याला प्रत्यक्ष जीवनाकडेच वळावे लागेल. जेव्हा आपण स्वतःचा आणि इतरांचा जीवन प्रवास पहातो, तेव्हा असे लक्षात येते की, यश मिळाल्यावर नेहमीच चिरस्थायी समाधान मिळतेच, असे नाही. ध्येय गाठले जाते, तरीही नवीन प्रश्न उभे रहातात. समाधान मिळते; पण ते फार काळ टिकत नाही. अनेकदा त्याची जागा एखादी नवीन धडपड किंवा पूर्ण होण्याची वाट पहाणारी दुसरी एखादी इच्छा घेते. व्यापक दृष्टीकोनातून पाहिल्यास जीवन हे एका अखंड चक्रासारखे वाटू शकते, एका मागून एक स्वप्ने पूर्ण करण्याच्या धडपडीचे चक्र. यामुळे एक अधिक खोलवरचा प्रश्न निर्माण होतो तो, म्हणजे आपल्याला मिळालेल्या वेळेचा हाच सर्वोत्तम उपयोग आहे का ? यामुळे आणखी एका सखोल चिंतनाकडे वाटचाल होते.
३. आपल्या स्वप्नांचा उगम कुठे होतो ?
एखाद्या कल्पनेसाठी जर स्वतःचा बराचसा वेळ, ऊर्जा, लक्ष आणि संसाधने खर्ची पडत असतील, तर त्या कल्पनेचा उगम आणि तिचे मूल्य पडताळून पहाणे आवश्यक ठरते. आणखी एक प्रश्न, ज्याचा फारसा विचार केला जात नाही तो, म्हणजे माणसाला एखादी गोष्ट इतक्या तीव्रतेने का हवीहवीशी वाटते ? एखादी विशिष्ट महत्त्वाकांक्षा, इच्छा किंवा ध्येय इतके महत्त्वाचे का बनते की, त्यासाठी माणसे स्वतःची अनेक वर्षे खर्ची घालतात ? अनेकदा लोक अत्यंत दृढ विश्वासाने त्यांच्या ध्येयांचा पाठपुरावा करतात; परंतु ते स्वप्न मुळात स्वतःसाठी इतके अर्थपूर्ण का बनले, याचा विचार करण्यासाठी ते क्वचित्च थांबतात आणि काही वेळा तर त्यांना त्यापासून परावृत्त करणेही कुणालाच शक्य होत नाही.
४. … तरी कृती स्वतःच्या हातात !
कधी कधी कोणत्याही स्पष्ट बाह्य प्रभावाविनाही एखादी व्यक्ती अगदी लहानपणापासूनच एका विशिष्ट ध्येयाचा ध्यास धरते आणि तेही अत्यंत ठामपणे अन् सातत्याने. अनेकदा ‘आपण नेमके त्या मार्गाकडे कसे वळलो ?’, हे त्या व्यक्तीला स्पष्टपणे सांगता येत नाही. तरीही त्या मार्गासाठी ती व्यक्ती स्वतःच्या आयुष्यातील अनेक वर्षे समर्पित करते. अशा वेळी स्वाभाविकपणे एक प्रश्न पडतो, जर त्या कल्पनेचा उगमच स्पष्टपणे ओळखता येत नसेल, तर ‘ती कल्पना खरोखरच स्वतःची आहे’, असे म्हणता येईल का ? यावरून एक सूक्ष्म; पण महत्त्वाचा भेद अधोरेखित होतो, तो म्हणजे कल्पना स्वतःपर्यंत येऊ शकतात; पण त्या आपणच निर्माण केलेल्या असतात, असे नाही; मात्र स्वतःच्या नियंत्रणात असते ती म्हणजे निवड. स्वप्नाचा उगम स्वतःच्या नियंत्रणात नसला, तरी त्याकडे आपण कसा दृष्टीकोन ठेवतो किंवा त्याविषयी आपण कशी कृती करतो, हे मात्र नेहमीच आपल्या हातात असते. यामुळेच उत्तरदायित्वाचे महत्त्व अधोरेखित होते.
५. ‘निःस्वार्थ सेवा स्वतःसह इतरांचेही आयुष्य पालटू शकते’, असे दर्शवणारे काही सर्वाेत्कृष्ट दर्जाचे चित्रपट
कोणत्याही ध्येयासाठी स्वतःचे आयुष्य समर्पित करण्यापूर्वी स्वतःला हे विचारणे आवश्यक आहे की, यामुळे समाज आणि जगात सलोखा निर्माण होण्यास साहाय्य होते का? सर्वोत्कृष्ट दर्जाचे चित्रपट या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतात. भारतीय आणि पाश्चात्त्य अशा दोन्ही चित्रपटसृष्टींमधील काही अत्यंत प्रभावी कथा अशा व्यक्तींचे चित्रण करतात, ज्या केवळ स्वतःच्या यशासाठीच नव्हे, तर इतरांच्या सेवेसाठीही कार्य करतात. ‘तारे जमीन पर’ (जिथे एक शिक्षक मुलातील सुप्त क्षमता ओळखतो आणि ती विकसित करतो), ‘लगे रहो मुन्ना भाई’ (जिथे सत्य आणि अहिंसा लोकांचे आयुष्य पालटतात), ‘द ब्लाईंड साईड’ (जिथे कोणत्याही अपेक्षेविना दाखवलेली करुणा एका मुलाच्या आयुष्याची दिशा पालटते), ‘पे ईट फॉरवर्ड’ (जिथे निःस्वार्थपणे दयाभाव दर्शवला जातो) आणि ‘पॅच ॲडम्स’ (जिथे काळजी आणि माणुसकी यांच्या माध्यमातून उपचाराची नवी व्याख्या केली जाते) यांसारखे चित्रपट हेच दर्शवतात की, निःस्वार्थ सेवा कशा प्रकारे केवळ स्वतःचेच नव्हे, तर इतरांचेही आयुष्य पालटू शकते.
६. प्रत्यक्ष अनुभवातून समाधानाची प्रचीती !
हे अनुभव एक खोलवरची जाणीव करून देतात, ‘इतरांच्या कल्याणासाठी योगदान दिल्याने मिळणारे समाधान हे अधिक स्थिर आणि चिरंतन असते. याचे उत्तम उदाहरण ‘आनंद’ या चित्रपटात पहायला मिळते, जिथे मृत्यूची चाहूल लागलेली असतांनाही इतरांच्या आयुष्यात आनंद आणि समाधान निर्माण करण्यातच जीवनाचा खरा अर्थ शोधला जातो. हे केवळ वरकरणी मिळणारे सुख नाही, तर ती एक प्रकारची आंतरिक पूर्णत्वाची भावना आहे, जी सहजासहजी डगमगत नाही. अशा समाधानाचे स्वरूप केवळ सैद्धांतिक चर्चेतून समजत नाही, तर प्रत्यक्ष अनुभवातूनच त्याची प्रचीती येते.
७. स्वप्नाचे योग्य परीक्षण करणे आवश्यक !
आयुष्य स्वतःच या दृष्टीकोनाला बळकटी देतो. आपण आखलेल्या योजना क्वचित्च तंतोतंत तशाच पूर्ण होतात. आयुष्याची दिशा पालटते. प्रारंभीला अडथळा किंवा व्यत्यय वाटणार्या गोष्टी कालांतराने अनेकदा एखाद्या अनपेक्षित लाभामध्ये रूपांतरित होतात. यावरून आणखी एक शक्यता समोर येते. आपल्या मनात विचार तर येतातच; पण त्या विचारांवर आपण कशा प्रकारे कृती करतो, यावरूनच स्वतःच्या आयुष्याचा दर्जा ठरतो. त्यामुळे एखादे स्वप्न पूर्णपणे नाकारण्याची आवश्यकता नाही; पण त्याचे योग्य प्रकारे परीक्षण करणे मात्र आवश्यक आहे. जर एखाद्या ध्येयाच्या पूर्ततेच्या प्रक्रियेतून सकारात्मकता निर्माण होत असेल आणि त्यातून इतरांचेही भले होणार असेल, तर ते ध्येय गाठण्यासाठी निष्ठेने प्रयत्न करणे सार्थ ठरते.
८. केवळ ध्येय गाठणे नव्हे, तर ते साध्य केल्याने मानवजातीला काय मिळाले, यातच सर्वाेच्च समाधान !
मानवी इतिहासाचा आढावा घेतल्यास असे दिसते की, स्वप्ने पालटतात आणि ध्येयही काळानुसार विकसित होतात; मात्र तो काळ कसा व्यतित केला गेला, त्याचे मूल्य मात्र कायम रहाते. जर एखाद्याचे प्रयत्न इतरांसाठी, समाजासाठी आणि व्यापक हितासाठी सकारात्मक योगदान देणारे असतील, तर अंतिम परिणाम काहीही असो, तो काळ वाया गेला, असे म्हणता येणार नाही. कदाचित् याच ठिकाणी चित्रपटसृष्टी अधिक प्रभावी भूमिका बजावू शकते. केवळ महत्त्वाकांक्षा आणि यश यांचे चित्रण करण्यापुरते मर्यादित न रहाता स्वतः पलीकडच्या उद्देशावर प्रकाश टाकणे, अशा कथा जिथे सर्वाेच्च समाधान केवळ ध्येय गाठण्यात नाही, तर ते साध्य केल्यामुळे मानवजातीला काय मिळाले, यात दडलेले असते.
लेखक : आनंदा मॅथ्यूज, हॉलीवूड ‘सिनेमॅटोग्राफर’ (चलचित्रीकरण तज्ञ), ‘इन क्वेस्ट ऑफ गुरु’ पुस्तकाचे लेखक, गोवा.
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात पीडित धर्मांध मुलांना प्रत्येकी १० लाख रुपये हानीभरपाई देण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश !
‘श्री समर्थ रामदास – एक अभ्यास’ ग्रंथ : अभ्यासपूर्ण मननीय, चिंतनीय आणि संदर्भ ग्रंथ
श्री शिवराज्याभिषेक आणि खोटे कथानक (नॅरेटिव्ह) !
‘सनातन क्रांती’ची नांदी !
छत्रपती संभाजी महाराजांचे ईश्वरनिष्ठ मन !
हिंदु धर्मरक्षणार्थ बलीदान देणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज !