आज तिथीनुसार शिवराज्याभिषेकदिन आहे. त्या निमित्ताने...
छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्वराज्याभिषेक ही हिंदुस्थानच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण घटना असून त्या घटनेचे पडसाद केवळ हिंदुस्थानमध्येच नव्हे, तर देशातील विविध भागासह आंतरराष्ट्रीय स्तरावरही उमटले होते. शिवराज्याभिषेकापूर्वीचा इतिहास आपण डोळ्यांसमोर आणला, तर असे लक्षात येते की, त्या काळात हिंदुस्थानात चौफेर परकीय इस्लामी आक्रमकांचे थैमान माजले होते. हिंदु समाज इस्लामी अन्याय आणि अत्याचार यांमुळे निराशेच्या गर्तेत गेला होता. हिंदु सरदार, वतनदार होऊ शकतो; परंतु राजा होऊ शकत नाही. अशा प्रकारची आत्मग्लानी आलेल्या समाजात हिंदु विजयाची कामना करणेच अशक्य होते. त्यामुळे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्य अर्थात् हिंदुसाम्राज्याची स्थापना कशी केली असेल ?, हा इतिहास समजून घेण्यासाठी आपण ‘शिवराज्याभिषेकदिन’ उत्सव साजरा करत असतो; पण याच काळात आपलेच काही बंधू छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या इतिहासाचे विकृतीकरण करण्याचा प्रयत्न करतात. ‘छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकास ब्राह्मणांचा विरोध, छत्रपती शिवरायांना पायाच्या अंगठ्याने टिळा लावला, तसेच त्यांनी वैदिक पद्धतीचा राज्याभिषेक नाकारून तांत्रिक पद्धतीने पुन्हा राज्याभिषेक केला होता’, असे खोटे कथानक प्रस्तुत करून समाजात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.
छत्रपती शिवरायांनी २७ एप्रिल १६४५ या दिवशी सह्याद्री पर्वताच्या रांगेत असलेल्या रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेऊन सामान्य माणसाला स्वराज्याचा विचार दिला होता. श्री रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेणारे त्यांचे सर्व सोबती सामान्य परिवारातील होते आणि छत्रपती शिवरायांनी त्यांना भगव्या झेंड्याखाली एकत्र केले होते. कान्होजी जेधे, तानाजी मालुसरे, बाजी पासलकर, येसाजी कंक, सूर्याजी काकडे, बापूजी मुद्गल, सोनोपंत डबीर, नरसप्रभु गुप्ते यांच्यासारखे स्वराज्याशी निष्ठा असणारे सोबती होते. छत्रपती शिवरायांनी स्वराज्यासाठी अठरापगड जाती आणि १२ बलुतेदार यांना भगव्या ध्वजाखाली एकत्र आणले. त्यांच्या हृदयात स्वराज्याचे स्फुल्लिंग पेटवले. भगव्या ध्वजाखाली एकत्र आलेल्या मावळ्यांनी असामान्य कर्तृत्व गाजवून तोरणा गडावर स्वराज्याचे तोरण बांधले. हिंदु विजयाच्या इतिहासाचा पाया रचला. इस्लामी सिंहासने उलथापालथ केली. इस्लाम सत्तेसोबत जवळपास ३० वर्षे संघर्ष करून त्यांनी ‘हिंदवी स्वराज्य’ अर्थात् ‘हिंदुसाम्राज्या’ची मुहूर्तमेढ रोवली. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी ६ जून १६८० या दिवशी छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक होऊन छत्रपती शिवराय ‘लोककल्याणकारी राज्यमान्य छत्रपती राजे’ झाले होते.
१. शिवराज्याभिषेकास ब्राह्मणांच्या विरोधाचे खोटे कथानक
सह्याद्रीच्या कुशीत रायगडावर ६ जून १६७४ या दिवशी काशीचे पंडित गागाभट्ट यांच्या नेतृत्वात छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक होऊन ते प्रजा कल्याणासाठी छत्रपती झाले होते; पण ‘राज्यभिषेकासाठी काशीवरून गागाभट्ट यांना का बोलावण्यात आले होते ?’, असा प्रश्न विद्रोही मंडळी उपस्थित करून ‘महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी राज्याभिषेकाला विरोध केला होता’, असे खोटे कथानक प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात, तसेच हा कांगावा करून ब्राह्मणांना आरोपीच्या पिंजर्यात उभे करण्याचा प्रयत्नसुद्धा केला जातो. वास्तविक पहाता ‘छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाची संपूर्ण सिद्धता बाळाजी आवजी आणि मोरोपंत पिंगळे यांनीच केली होती, तसेच बाळाजी आवजी यांनीच केशव भट, भालचंद्र भट आणि सोमनाथ भट यांना काशी येथे गागाभट्ट यांना भेटण्यासाठी पाठवले होते’, याची ऐतिहासिक नोंदसुद्धा आहे. प्रत्यक्ष राज्याभिषेकाच्या सोहळ्यास असंख्य ब्राह्मण उपस्थित होते आणि त्यांना छत्रपती शिवरायांनी सुवर्णमुद्रा दान दिल्या होत्या. या घटनेच्या ‘सभासद बखर’ आणि यदुनाथ यांच्या साहित्यात ऐतिहासिक नोंदीसुद्धा उपलब्ध आहेत, तसेच उपस्थित ब्राह्मणांच्या आकड्याची संख्यासुद्धा दिलेली आहे. त्यामुळे ‘महाराष्ट्रातील सर्वच ब्राह्मणांचा राज्यभिषेकास विरोध होता’, असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे ठरेल. यासह समाजविघातकांच्या खोट्या कथानकाप्रमाणे गेल्यास जर काही ब्राह्मणांचा छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध असेल, तर त्याचप्रमाणे तत्कालीन प्रस्थापित मराठ्यांचासुद्धा विरोध होता. दिवंगत कॉ. गोविंद पानसरेंपासून अनेक लेखकांच्या पुस्तकांमध्ये याविषयीचे उल्लेख आहेत.

२. वर्णव्यवस्था नव्हे, तर विधी विस्मृतीमुळे नम्र नकार !
छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला महाराष्ट्रातील काही ब्राह्मणांचा विरोध नव्हे, तर नम्र नकार होता. त्याचे मुख्य कारण, म्हणजे ‘राज्याभिषेक संहिता’ किंवा पूजाविधीची प्रक्रिया लुप्त होणे, हे होते. वर्ष १२०० ते वर्ष १६४० पर्यंत हिंदु समाज इस्लामी सत्तेच्या अधिपत्याखाली रंजला गांजला होता. कुणालाही हिंदु संस्कृतीनुसार सण, उत्सव, पूजापाठ, तीर्थाटन करण्याचे स्वातंत्र्य नव्हते, तसेच सतत इस्लामी सत्तेच्या अत्याचारी स्वार्या, जिझिया कर आणि इतर कडक निर्बंध यांमुळे विविध पूजापद्धती, धार्मिक विधी विस्मृत अथवा लुप्त झाल्या होत्या. यासह अनेक शतकांपासून देशात हिंदु राजांचा राज्याभिषेकच झाला नव्हता आणि ‘भविष्यात तसा राज्याभिषेक होईल’, हा कुणालाही विश्वास नव्हता. त्यामुळेच राज्याभिषेकाचा विधी विस्मृत झाल्याने किंवा ठाऊक नसल्याने तत्कालीन काही ब्राह्मणांनी विरोध नव्हे, तर नम्र नकार दिला होता, असे दिसून येते. आजही काही धार्मिक विधी काही ठराविक ब्राह्मणच करत असून त्यांचे धार्मिक विधी ठरलेले असतात. नारायण नागबळी, दशक्रिया, उपनयन, गृहप्रवेश, वास्तूशांती, शतचंडी यज्ञ इत्यादी धार्मिक विधीचे प्रकार असून नारायण नागबळी आणि दशक्रिया विधी यांचे पंडित ठरलेले असतात. ग्रहशांती, गृहप्रवेश, लग्नकार्य विधी यांचेसुद्धा पंडित ठरलेले असतात. एखाद्या ग्रामीण भागातील ब्राह्मणाला नारायण नागबळी विधी करण्याचे सांगितल्यास तो विरोध नव्हे, तर नम्र नकार देतो. त्यांचा धार्मिक विधीला विरोध नसतो; पण विधी करण्याचे तंत्र अवगत नसल्यामुळे ते ‘नाही’ म्हणतात.
तोच विषय छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या वेळी झालेला आहे; पण वस्तूस्थितीचा विचार न करता विद्रोही मंडळी ‘ब्राह्मणांचा छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध होता’, असे खोटे कथानक प्रस्थापित करून हिंदु समाजात वैचारिक गोंधळ निर्माण करतात. वास्तवामध्ये छत्रपती शिवरायांचे असंख्य सोबती ब्राह्मण होते. त्यांनी स्वराज्यासाठी तलवारी चालवल्या, प्रसंगी मरणसुद्धा पत्करले आहे. मुरारबाजी देशपांडे यांच्यापासून बाजीप्रभु देशपांडे अशी अनेक उदाहरणे आहेत. गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता ?’, या पुस्तकात ‘छत्रपती शिवरायांचे ब्राह्मण सहकारी कोण होते ?’, याची स्वतंत्र सूची दिलेली आहे. छत्रपती शिवरायांनी बादशाहच्या हातावर तुरी देऊन जेव्हा आगर्याहून सुटका केली, त्यामध्ये त्र्यंबकपंत डबीर, रघुनाथपंत तथा उत्तर भारतातील ब्राह्मणांचे मोठे साहाय्य झाल्याची ऐतिहासिक नोंद आहे. छत्रपती शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळात ८ पैकी ७ ब्राह्मण होते, याचासुद्धा विचार करावा लागेल.
३. पायाच्या अंगठ्याने टिळा लावणे शक्य आहे का ?
‘छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला ब्राह्मणांचा विरोध होता’, असा कांगावा करणारी मंडळी ‘राज्याभिषेकाच्या प्रसंगी गागाभट्ट यांनी छत्रपती शिवरायांच्या कपाळी पायाच्या अंगठ्याने टिळा लावला होता’, असा कांगावासुद्धा नेहमीच करतात; पण शिवराज्याभिषेकाच्या भव्य दिव्य सोहळ्याचा अभ्यास केल्यास त्याप्रसंगी छत्रपती शिवरायांना पायाच्या अंगठ्याने टिळा लावणे शक्य आहे का ? कारण छत्रपती शिवराय ज्या सिंहासनावर बसले होते, ते सिंहासन ३२ मण सोन्याचे (१ सहस्र १९४ किलो) आणि ५ फूट उंचीचे मयुरी सिंहासन असावे. त्यामुळे सिंहासनावर बसलेल्या छत्रपती शिवरायांना गागाभट्ट यांनी पायाच्या अंगठ्याने टिळा कसा लावला असेल ? ही कल्पना मान्य होणारी किंवा वस्तूस्थितीला धरून नाही. वास्तविक काशीच्या विश्वेश्वराचे पुजारी आणि मूळचे महाराष्ट्राचे असलेले गागाभट्ट यांची छत्रपती शिवरायांवर प्रचंड श्रद्धा आणि त्यांच्याप्रती आदरभाव होता. छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची ख्याती संपूर्ण देशात होती. हिंदु धर्म, मंदिरे आणि संस्कृती यांच्या रक्षणार्थ तलवार घेऊन लढणार्या छत्रपती शिवरायांवरील श्रद्धेपोटी गागाभट्ट काशीवरून रायगडावर आले होते, ही सत्य वस्तूस्थिती आहे. त्यामुळे गागाभट्ट यांच्याकडून छत्रपती शिवरायांचा अपमान शक्य नाही, तसेच रायगडावर पार पडलेल्या छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचे वर्णन तत्कालीन देश-विदेशातील लेखकांनी केलेले असून त्याविषयी प्रचंड साहित्य उपलब्ध आहे; पण त्यामध्ये या घटनेचा उल्लेख नाही. रायगडावर स्वराज्यासाठी लढणारे शिलेदार उपस्थित होते. येसाजी कंक यांच्यापासून हंबीरराव यांच्यापर्यंतच्या उपस्थितीत छत्रपती शिवरायांचा अपमान होणे शक्य नाही. त्यामुळे ‘शिवराज्याभिषेकास ब्राह्मणांचा विरोध आणि गागाभट्ट यांनी पायाच्या अंगठ्याने टिळा लावला’, ही घटना कपोलकल्पित असून हिंदु समाजात संभ्रम निर्माण करणारे खोटे कथानक आहे.
४. तांत्रिक पूजा, म्हणजे दुसरा राज्याभिषेक नाही !
‘छत्रपती शिवरायांनी २४ सप्टेंबर १६७४ या दिवशी निश्चलपुरी गोसावी यांच्या हस्ते दुसरा राज्याभिषेक करून वैदिक परंपरा नाकारली होती’, असे एक खोटे कथानक समाजात प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जातो. वास्तविक पहाता ६ जून १६७४ या दिवशी छत्रपती शिवरायांचा रायगडावर गागाभट्ट यांच्या हस्ते वैदिक पद्धतीने राज्याभिषेक झालेला आहे, तर निश्चलपुरी यांनी धार्मिक शाक्त आणि तांत्रिक पूजा केली होती. त्या तांत्रिक पूजेला ‘राज्याभिषेक सोहळा’ म्हणता येत नाही. रायगडावरील राज्याभिषेकानंतर राजमाता जिजाबाई यांचे निधन आणि अन्य अपशकून घटना घडल्या होत्या. त्यामुळे हिंदु संस्कृतीचा भाग असलेली तांत्रिक आणि शाक्त पूजा करण्यात आली होती; पण त्यास दुसरा राज्याभिषेक म्हणणे चुकीचे ठरणार आहे. आजही आपल्याकडे नविन घरात गृहप्रवेश धार्मिक विधी करून केला जातो. कधी वास्तूशांती पूजासुद्धा केली जाते. कधी कधी दोन्ही पूजा एकत्र केल्या जातात. त्यामुळे छत्रपती शिवरायांच्या रायगडावरील राज्याभिषेकानंतर निश्चलपुरी यांनी केलेला धार्मिक विधी राज्याभिषेक ठरत नाही, तर केवळ हिंदु संस्कृतीमधील एक धार्मिक विधी ठरतो.
५. समाजविघातक शक्तींना उघडे पाडले पाहिजे !
छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक तत्कालीन इतिहासातील एक महत्त्वपूर्ण घटना असून ‘हिंदु समाज बलाढ्य इस्लामी सत्तेला पराभूत करून विजयी होऊ शकतो’, हा आत्मविश्वास निर्माण करणारी आणि हिंदूंच्या उज्ज्वल भवितव्याची पहाट होती. राज्याभिषेकानंतर देशातील हिंदू इस्लामी सत्तेविरुद्ध लढण्यास सज्ज झाला होता; पण देशात जेव्हा शिवराज्याभिषेकदिनाचा उत्सव साजरा करतो, तेव्हा आपलेच काही बंधू कपोलकल्पित खोट्या ऐतिहासिक घटनांचा कांगावा करून समाजात चुकीचे कथानक प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे इतिहासाचे विकृतीकरण आणि कपोलकल्पित कथानके यांचा सामना करण्यासाठी येणार्या काळात वैचारिक लढाईसाठी सज्ज व्हावे लागणार आहे. तरुणांमध्ये पराक्रमाची प्रेरणा निर्माण करण्यासाठी समाजविघातक शक्तींना उघडे पाडले पाहिजे, हीच काळाची आवश्यकता आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.
लेखक : श्री. अशोक राणे, मुक्त पत्रकार तथा ‘महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई’चे पूर्व सदस्य, अकोला. (२३.६.२०२६)

२७ जून : शिवराज्याभिषेक (हिंदुसाम्राज्य) दिन !
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात पीडित धर्मांध मुलांना प्रत्येकी १० लाख रुपये हानीभरपाई देण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश !
‘श्री समर्थ रामदास – एक अभ्यास’ ग्रंथ : अभ्यासपूर्ण मननीय, चिंतनीय आणि संदर्भ ग्रंथ
सिनेमा आणि स्वतःची स्वप्ने : यशाविषयी सिनेमा काय प्रकट करतो ?
आद्यगोरक्षक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या प्रतिकृतीचे पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या हस्ते अनावरण !
‘सनातन क्रांती’ची नांदी !