भीमाशंकर, तसेच अष्टविनायक मंदिरांसह शेकडो प्रमुख देवस्थाने ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन (प्रारूप) अधिनियम, २०२६’ कायद्याच्या विरोधात एकवटली !

पुणे – देवस्थानांच्या भूमी वाचल्या, तरच मंदिरे आणि धर्मकार्य सुरक्षित राहील. त्यामुळे सरकारने या भूमी अधिग्रहित करण्याचे काम तात्काळ थांबवावे, अशी चेतावणी भीमाशंकर ज्योतिर्लिंग देवस्थान आणि अष्टविनायक समितीसह पुणे पंचक्रोशीतील शेकडो प्रमुख देवस्थानांनी ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन (प्रारूप) अधिनियम, २०२६’ या कायद्याच्या विरोधात दिली आहे. यासंदर्भात मंदिर महासंघाच्या वतीने पुण्यात महत्त्वपूर्ण बैठका पार पडल्या. कायद्याविरोधात पुढील २५ दिवसांत लाखो कायदेशीर हरकती नोंदवण्यासह राज्यभर व्यापक स्वाक्षरी अभियान राबवण्यात येणार आहे. यासह प्रत्येक मंदिरात महाआरती, आगामी पावसाळी अधिवेशनाच्या काळात विधीमंडळात ‘घंटानाद आंदोलन’ आणि आवश्यकता भासल्यास मुंबईतील आझाद मैदानात ‘महाआंदोलन’ करण्याचा, तसेच लवकरच ‘राज्यस्तरीय देवस्थान भूमी संरक्षक परिषद’ आयोजित करण्याचा एकमुखाने निर्धार करत मंदिर विश्वस्तांनी मैदानात उतरण्याची घोषणा केली आहे.
मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी ‘हा लढा मंदिरांच्या अस्मितेचा असल्याचे सांगत २ जून या दिवशी विभागीय आयुक्तांना निवेदन देऊन राज्यभर आंदोलनांना प्रारंभ केला जाईल’, अशी सरकारला चेतावणी दिली. पुण्यातील सारसबागेतील श्री सिद्धिविनायक मंदिर, आकुर्डी येथील खंडोबा मंदिर आणि हडपसर येथील श्री सियाराम मंदिर, गोशाळा येथे बैठका पार पडल्या.

१. ज्येष्ठ अधिवक्ता एस्.के. जैन यांनी देवस्थानांचे अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांच्या भूमी सुरक्षित रहाणे अत्यंत आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.
२. माजी धर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख यांनी कायद्यामागील शासनाचा हेतू संशयास्पद वाटत असल्याचे सांगत विश्वस्तांना अधिकाधिक हरकती नोंदवण्याचे आवाहन केले.
३. रांजणगाव येथील महागणपति देवस्थानचे विश्वस्त डॉ. तुषार पाटील पाचुंदकर यांनी अष्टविनायक मंदिरांच्या वतीने या कायद्याला तीव्र विरोध दर्शवला.
४. भीमाशंकर देवस्थानचे अधिवक्ता सुरेश कौदरे यांनी सेवाधार्यांच्या अधिकारांचे रक्षण करण्याची मागणी केली.
आंदोलनाची रणनीती निश्चित करण्यासाठी आणि प्रत्येक मंदिरात जनजागृतीचे फलक लावून व्यापक लोकचळवळ उभी करण्यासाठी राज्यभरातील प्रमुख विश्वस्त एकवटले आहेत.
या बैठकांना भीमाशंकर देवस्थानचे कार्याध्यक्ष मधुकर गवांदे, प्रसाद गवांदे, ग्रामदैवत कसबा गणपतीच्या संगीताताई ठकार, भवानीपेठ पालखी मंदिराचे प्रमोद बेंगरूट, कानिफनाथ मंदिराचे ज्ञानोबा आणि सुरेश फडतरे, श्रीमंत सरदार खासगीवाले लिमये, निलेश वाळावे (शिरवळ), निवृत्ती बडदे (कोडीत), अखिल मंडई गणेशोत्सव मंडळाचे वांजळे, जेजुरी मार्तंड देवस्थान आणि दगडूशेठ दत्त मंदिरचे अधिवक्ता थोरवे, आकुर्डी खंडोबा देवस्थानचे अध्यक्ष विठ्ठल काळभोर आणि उपाध्यक्ष पंढरीनाथ काळभोर, तसेच चतुःश्रृंगी देवस्थानचे ट्रस्टी आणि अधिवक्ता वृषाली दातार यांसह विधी, तसेच धार्मिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाणे येथे पत्रकारांचे आंदोलन
महिला सदस्यांच्या समितीद्वारे लैंगिक शोषणविरोधी कायद्यांचे पुनरावलोकन करावे !
देवस्थान भूमीसंदर्भात शासकीय देवस्थान समितीची पहिली बैठक पार पडली !
गायीला राष्ट्रमाता घोषित करा ! – पू. किशोरशास्त्री दवे
‘श्रद्धे’चा बाजार !
शिक्षिकेच्या स्थलांतरावरून सोनुर्ली शाळा आजपासून बंद ठेवण्याची ग्रामस्थांची चेतावणी