‘श्रद्धे’चा बाजार !

नुकत्याच पश्चिम महाराष्ट्रातील एका प्रसिद्ध देवस्थानात दर्शनासाठी जाण्याचा योग आला. भाविक मंदिरात जातांना उपास्यदेवतेप्रती कृतज्ञता म्हणून श्रद्धेने दर्शनाला जातात; परंतु आजकाल मंदिर आणि मंदिर परिसराच्या आसपास बाजारीकरण झाल्यामुळे मंदिरात जातांना कुठल्या मंदिरात जात आहोत कि ‘जत्रे’ला जात आहोत, अशी स्थिती पहायला मिळते. मी ज्या मंदिरात गेलो होतो, तिकडे आसपास लहान मुलांची पुष्कळ खेळणी विक्रीसाठी ठेवली होती. त्यात विविध प्रकारच्या ‘कार्टुन’ पात्रांचे मुखवटे यांसह भुतांचे मुखवटे, कवट्या, हाडे इत्यादी भयावह चित्रे असलेले टी-शर्ट विक्रीस होते. अनेक ठिकाणी देवतांची चित्रे रस्त्यावर पडलेली होती. ‘हे सर्व पाहून येणार्‍या भाविकांच्या मनावर देवाप्रतीच्या भावाचा किंवा भक्तीचा संस्कार होणार का ?’, असा प्रश्न पडला.

नेहमीपेक्षा वेगळे काही दिसले की, दृष्टी लगेच त्याकडे आकर्षित होते, यामुळे काही दुकानदार काहीतरी ‘वेगळे’, ‘आकर्षक’, ‘भन्नाट’ अशा वस्तू विक्रीस ठेवतात आणि त्यातून त्यांचा धंदा चालवतात; परंतु त्यामुळे मंदिरासारख्या पवित्र ठिकाणाचे पावित्र्य नष्ट होण्याचे पाप नकळतपणे आपल्या हातून घडते, याचे त्यांना भान मात्र त्यांना रहात नाही. दुर्दैवाने या गोष्टीत कुणालाही काहीच अयोग्य वाटत नाही. जो तो येतो, पहातो आणि एक करमणुकीचे साधन म्हणून त्याकडे दुर्लक्ष करून पुढे जातो. ही आजकालची परिस्थिती असून ती हिंदूंसाठी लज्जास्पद आहे. एकीकडे जिवाचा आटापिटा करून देवदर्शनासाठी जायचे, त्यासाठी सुटी काढून वेळ द्यायचा; परंतु पुन्हा येतांना देवाविषयी भक्ती निर्माण न होता केवळ ‘सहल’ म्हणून देवदर्शन केल्यासारखेच होते. विशेष म्हणजे हिंदूंची धार्मिक स्थळे किंवा मठ या ठिकाणीच हा प्रकार अधिक प्रमाणात पहायला मिळतो. हाच भाग गावच्या देवाची जत्रा किंवा अन्य मोठ्या उत्सवांतही मोठ्या प्रमाणावर पहायला मिळतो आणि त्याचा लाभ घेऊन मग अन्य धर्मीयही मंदिर परिसर किंवा जत्रोत्सव या ठिकाणी त्यांचा बाजार मांडून पैसे कमवतात. चर्च किंवा मशिदीच्या ठिकाणी असा कुठला बाजार भरल्याचे दिसत नाही. अन्य धर्मीय स्वत:च्या मुलांना लहानपणापासून स्वत:च्या श्रद्धास्थानांचा अवमान वा अनादर होणार नाही, याचे शिक्षण देतात. हा भाग हिंदूंनी त्यांच्याकडून शिकायला हवा. मंदिराच्या परिसरात देवतेचा नामजप लावणे, भक्तीगीते लावणे, परिसरात संबंधित देवतेची कथा, मंदिराची इतिहास, मंदिरात चालणारे धार्मिक विधी, महोत्सव, पुराणकाळातील काही संदर्भ असल्यास त्याविषयी माहिती असे साहित्य उपलब्ध करून दिल्यास निश्चितच भाविकांच्या मनात देवतेप्रती श्रद्धा आणि भाव निर्माण होण्यास साहाय्य होईल ! यासाठी हिंदूंनी पुढाकार घेऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे !

– श्री. संदेश नाणोसकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.