स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांची आज आवश्यकता !

आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची दिनांकानुसार जयंती आहे. त्या निमित्ताने विनम्र अभिवादन !

भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या ८० वर्षांनंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांची काय आवश्यकता आहे, असा प्रश्न कुणाच्याही मनात निर्माण होईल. त्याला उत्तर असे, ‘शरीररूपी सावरकर जेवढे महत्त्वाचे होते, त्यापेक्षाही विचाररूपी सावरकर हे कालजयी आहेत आणि त्यांचे विचार हे प्रत्येक भारतियासाठी अमर आहेत.’ तत्कालीन प.पू. सरसंघचालक बाळासाहेब देवरस लिहितात, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर हे ज्वलंत  आणि जन्मजात देशभक्त, क्रांतीमंत्रांचा उद्गाता, विज्ञानाधिष्ठित, तर्कसिद्ध आणि सार्वकालिक सत्य हिंदुत्वाचा प्रवक्ता, अखंड प्रेरणादायी श्रेष्ठ नेता, दिक्कालाला भेदून भविष्याचा वेध घेणारा प्रतिभासंपन्न महाकवी, आशयसंपन्न निबंधकार, जीवनदर्शन घडवणारा नाटककार, राजकीय अन् सामाजिक पार्श्वभूमीवर आधारित कादंबर्‍यांचा लेखक, रक्ताच्या शाईत बुडवून विद्युल्लतेच्या लेखणीने लिहिणारा, तसेच उज्ज्वल भूतकाल आणि श्रेष्ठ परंपरांचे ज्ञान देऊन राष्ट्रभक्तीचा स्फुल्लिंग चेतवणारा ग्रंथकार, अतीत घटनांचा अन्वयार्थ उलगडून दाखवणारा द्रष्टा इतिहासकार, भाषाशास्त्रज्ञ, दूरदृष्टीचा राजनीतीज्ञ, क्रियावान समाजसुधारक, दशसहस्रेषु आढळणारा ओजस्वी वक्ता, असे व्यक्तीमत्त्व होते. ‘हे मातृभुमि, तुजला मन वाहियेले । लेखाप्रती विषय तूचि अनन्य झाला ।’, अशा समर्पण वृत्तीने इतिहासाच्या ज्ञानप्रकाशाने प्रकट केलेल्या आणि डोळसपणे स्वीकारलेल्या दिव्य आणि दाहक व्रताची सांगता करण्यासाठी त्यांनी हे सर्व गुण उपयोगात आणले, हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे आगळे वैशिष्ट्य होते.’ आध्यात्मिक गुरु ब्रह्मर्षि प.वि. वर्तक यांच्या मते ‘सावरकर हे राजयोगी होते. ते महायोगी होते आणि त्यांना दिव्यदृष्टी होती.’ पातंजल योगात सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीच्या जन्मजात गुण आणि वागणुकीची पद्धत यांचा अभ्यास करून त्यांनी अतीत, म्हणजे पूर्वीच्या गोष्टींची सविस्तर माहिती मिळवली होती अन् त्यामुळे त्यांना अनागत, म्हणजे भविष्यात होणार्‍या गोष्टी यांचे अचूक ज्ञान प्राप्त झाले होते. वर्तक यांच्या मते जवळजवळ ४० अशी उदाहरणे देता येतील, जेव्हा सावरकर यांनी फार पूर्वी पुढे काय होईल, ते सांगितले होते आणि त्याप्रमाणेच घडले.

स्वातंत्र्यवीर सावरकर

सावरकर यांच्या मते,

अ.‘अल्पसंख्यांकांमधील जे विचारवंत आहेत, विवेकी आहेत, त्यांचा आवाज बुलंद करणे आवश्यक आहे.’

आ.‘धर्मप्रचार वेगळा आणि फसवून, लालूच दाखवून धर्मांतर करणे वेगळे !’

सावरकर यांचे काही विषयांवरील विचार थोडक्यात आपण पाहूया.

– श्री. प्रवीण दीक्षित

१. ऐतिहासिक घटनांचे अचूक ज्ञान

१ अ. भारताचा प्राचीन इतिहास सांगण्याचे महत्त्व : भारताचा इतिहास अतीप्राचीन असला, तरी सर्वसामान्य इतिहासकार ज्याला मान्यता देतात, अशा सिकंदरच्या भारतावरील मोहिमेपासूनच्या काळाचे सावरकर यांनी विश्लेषण केले आहे. भारत सार्वभौम रहावा, स्वतंत्र रहावा आणि परकियांचा गुलाम होऊ नये, यांसाठी सावरकर यांनी ‘सहा सोनेरी पाने’ किंवा ‘Six Glorious Epochs’ यांचे सविस्तर विश्लेषण केले आहे. ‘सुवर्णपाने का लिहिली ?’, याविषयी सावरकर सांगतात, ‘प्रत्येक देशाला स्वातंत्र्य युद्धांचे स्मरण केल्यामुळे जोश प्राप्त होतो. त्यांची अस्मिता तीव्र होते आणि माणसे आत्मविश्वासाने काम करून अनेक क्षेत्रांमध्ये उत्तमोत्तम कामगिरी करतात जसे, अमेरिकेविषयी ‘American war of Independence’चे महत्त्व आहे. आपल्या प्राचीन इतिहासामुळे चीन, बॅबिलॉन, पर्शिया, इजिप्त, प्राचीन पेरू आणि मेक्सिको, ग्रीस अन् रोम अशा अनेक देशांना आपल्या सहस्रो वर्षांपूर्वीच्या इतिहासाची पाने परत परत वाचाविशी वाटतात; परंतु यातील सर्व राष्ट्रातील ऐश्वर्य आणि वैभव काळाच्या ओघात नाहीसे झाले आहे अन् त्यांचे केवळ नाव शिल्लक राहिले आहे; परंतु भारताचा इतिहास हा सतत प्रेरणा देणारा, तसेच चिरंतन आहे. शक, हूण, मोगल यांनी भारतासारखीच चिनी संस्कृती नामशेष केली. प्रसिद्ध ‘चायना वॉल’ बांधूनही चीन स्वतःचे संरक्षण करू शकला नाही; परंतु भारतियांनी मात्र परकियांचा प्रत्येक वेळी पराभव केला; परंतु तरीही खोडसाळ इंग्रजी इतिहासकारांनी जाणूनबुजून खोटा प्रचार केला की, हिंदू हे सतत पराभूत होत राहिले आणि ते नेहमीच परकियांचे गुलाम होते. दुर्दैवाने काही भाडोत्री भारतीय इतिहासकारांनीही त्यांचीच री ओढली.’ सावरकर लिहितात, ‘हा प्रचार केवळ आपल्या देशाचा अभिमान कायम ठेवण्यासाठीच नव्हे, तर ऐतिहासिक सत्य सांगण्यासाठी देशकार्य म्हणून करणे आवश्यक आहे.’ सावरकर सांगतात, ‘पिढ्यांमागून पिढ्यांनी भारतीय योद्ध्यांनी परकीय आक्रमणकर्त्यांचा पराभव करून देशाचे स्वातंत्र्य कसे आबाधित ठेवले, हे स्पष्ट करण्यासाठी मी ‘सहा सुवर्णपाने’ वाचकांपुढे उलगडून दाखवत आहे.’

श्री. प्रवीण दीक्षित

१ आ. सावरकर यांनी खरा इतिहास सप्रमाण मांडणे : सावरकर यांनी सांगितलेले हे विचार त्रिकालाबाधित आहेत आणि शाळा, तसेच महाविद्यालयांच्या पुस्तकातून हे विचार जाणीवपूर्वक दूर ठेवूनही ज्या कुणाला जेव्हा केव्हा हे विचार वाचायला मिळतात, तेव्हा त्यातील सत्यतेमुळे वाचक पूर्णपणे भारावला जातो अन् हे विचार आपण आधी का वाचले नाहीत ? म्हणून स्वतःला दोष देतो.

अनेक इतिहासकार स्वातंत्र्यवीर सावरकर यांना इतिहासकार समजण्यास नाखूश असतात; परंतु सुप्रसिद्ध रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई एकदा वीर सावरकर यांना मुद्दाम भेटायला गेले असतांना त्यांनी सांगितले, ‘सावरकर, आपण इतिहासातील घटनांची जंत्री देणारे नसून आपण इतिहास निर्माण करणारे आहात.’ वीर सावरकर यांनी भारतीय स्वातंत्र्य युद्धात इंग्रजांना भारत सोडायला लावण्यात महान कारवाई तर केलीच; पण त्याविना वसाहतवादी इंग्रज आणि इतर युरोपियन, तसेच इंग्रजांच्या प्रोत्साहनाने स्वतःला इतिहासकार म्हणवणार्‍या; पण खर्‍या इतिहासाची पूर्वग्रहदूषित मांडणी करणार्‍या भारतीय अन् तत्सम अन्य तज्ञांचेही दावे हे सत्यावर आधारित नाहीत, हे सप्रमाण दाखवून दिले.

वीर सावरकर यांचे ठाम मत होते, जे देशवासीय जागरूकपणे आपल्या इतिहासाची माहिती करून घेत नाहीत, त्यांचे भविष्य हे अंधारमय आहे. देशाने आपल्या इतिहासाची चोख माहिती ठेवावी; परंतु पूर्व इतिहासाचे गुलाम होऊ नये. वीर सावरकर यांच्या मते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेळेस मोगलांचा विरोध हा त्या वेळेप्रमाणे न्याय्य आणि योग्य होता; परंतु तीच भावना आज कायम ठेवणे, हे अयोग्य आणि वेडेपणाचे होईल.

१ इ. वीर सावरकर यांनी सांगितलेला भारताचा खरा इतिहास : वीर सावरकर यांनी त्यांच्या काळात असलेले इतिहासाविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी संशोधन करून आणि अत्यंत परखडपणे प्राचीन, मध्ययुगीन अन् आधुनिक भारताचा खरा इतिहास लोकांपुढे ठेवला. वीर सावरकर त्यांच्या प्रत्येक लिखाणात प्रभावीपणे सांगतात, ‘इतिहासाच्या ३ सहस्र वर्षांत प्रबळ राजकीय शत्रूंवर हिंदु राष्ट्राने वारंवार विजय मिळवून ‘हिंदू हे गुलाम रहायलाच योग्य आहेत’, हा अपसमज दूर केला. अलेक्झांडरच्या यावनी सैन्याने हिंदुस्थानवर स्वारी केली, त्या वेळेस त्यांना दाती तृण धरायला लावून हिंदुकुशपर्यंत पिटाळून लावले. प्रलयकारी हूणांच्या आक्रमणात रोमन साम्राज्याचा चक्काचूर होऊन गेला; पण त्याच हूणांना हिंदु राष्ट्राने पूर्णपणे नाहीसे केले. त्यानंतर आलेल्या शक, कुशाण यांच्याशी चाललेल्या ३ शतकांच्या युद्धात शेवटी शक, कुशाण कोण होते ? ते प्रदर्शनात दाखवण्यापुरतेसुद्धा उरले नाहीत. पुढे मुसलमानांच्या आक्रमणांमध्ये सारे भारतवर्ष मुसलमानांनी ग्रासून टाकले’; पण वीर सावरकर सप्रमाण दाखवून देतात, ‘जसे राहू सूर्यास ग्रासतो, तसे केवळ ग्रहणकाळापुरते. संधी मिळताच हिंदूंनी मुसलमानांना ‘दे माय धरणी ठाय’ केले. मोगली तख्ताच्या ठिकर्‍या उडवल्या आणि सर्वांत शेवटी ज्या समुद्रातून ब्रिटीश भारतावर चढून आले, त्या समुद्रातच त्यांच्या साम्राज्य सत्तेला भारताने बुडवून टाकले.’ वीर सावकर आग्रहाने सांगतात, ‘Survival of the fittest – आम्ही हिंदु श्रेष्ठतम होतो; म्हणून जगावयास योग्य ठरलो.’

वीर सावरकर यांनी सप्रमाण दाखवून दिले, हिंदुस्थानला हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी मराठ्यांनी भारताच्या सर्व भागांमध्ये चढाई केली आणि तिथे न्यायावर आधारित प्रशासन निर्मिती केली.’ अनेक इतिहासकारांनी मराठ्यांना ‘पेंढारी’, ‘लुटारू’ म्हणून संबोधले; परंतु ‘हे धादांत खोटे होते’, हे सावरकर यांनी सिद्ध केले.

१ ई. वर्ष १८५७ चे युद्ध स्वातंत्र्य युद्ध असल्याचे शिक्कामोर्तब करणे : आजही इंग्रज इतिहासकारांवर विश्वास ठेवून ‘वर्ष १८५७ मध्ये केवळ शिपायांचे बंड झाले’, हे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न अनेक जण करत असतात; परंतु ‘वर्ष १८५७ मध्ये  इंग्रजांच्या विरुद्ध झालेले ते स्वातंत्र्यसमर होते’, हे अनेक इंग्रज इतिहासकारांच्याच पुस्तकांतून आणि तथ्यांच्या आधारे दाखवत अत्यंत कोवळ्या वयाच्या वीर सावरकर यांनी अतुलनीय असे काम केलेले आहे. या त्यांच्या लिखाणामुळे भारतातील सर्व ठिकाणचे तरुण, विचारवंत यांच्यामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आणि ‘पूर्व दिव्य ज्यांचे, रम्य त्यांना भावीकाळ’ यावर वीर सावरकर यांनी शिक्कामोर्तब केले.

२. हिंदुपदपादशाही

मराठ्यांच्या इतिहासाविषयी लिहितांना एक दुष्प्रचार केला जातो की, मराठे हे केवळ लुटारू होते आणि त्यांनी केवळ चौथाईचा (महसूल) हक्क वसूल करणे एवढेच काम केले. महाराष्ट्राच्या बाहेरील हा खोटा प्रचार खोडून काढत सावरकर लिखाणातून सप्रमाण दाखवून देतात, ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि पेशवे यांच्यामुळेच हिंदुसाम्राज्य स्थापन होऊ शकले.’ मोगलांविषयी लिहिणार्‍या त्या काळच्या सर्व मुसलमान लेखकांनी केवळ मुसलमान बादशहांविषयी स्तुतीच केली आहे. सावरकर लिहितात, ‘हिंदु आणि मुसलमान यांच्या ऐक्यासाठी भाऊसाहेब अन् विश्वासराव यांनी वर्ष १७६१ मध्ये देहलीचे तख्त फोडले, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. त्या घटनेने हिंदूंनी आम्ही शारीरिकदृष्ट्याही समानतेच्या पातळीवर समर्थ आहोत, हे दाखवून दिले आणि हिंदूंना जिंकणार्‍यांचा त्यांनी पूर्ण पाडाव केला अन् ‘जर आमच्याशी मुसलमानांना मैत्री पाहिजे असेल, तर त्यांनी आमच्याशी समानतेने वागले पाहिजे’, हे अधोरेखित केले आणि त्यामुळेच हिंदु अन् मुसलमान यांचे ऐक्य कायमचे कसे राहील, याचा धडा दिला.’ सावरकर यांच्या मते ‘छत्रपती शिवाजी, बाजीराव, भाऊसाहेब आणि जनकोजी, नाना अन् महादजी, रामदास आणि मोरोपंत यांच्या अभ्यासामुळे न्याय अन् मानवी हक्क, तसेच स्वातंत्र्य आणि देशाची सार्वभौमता यांचे उत्कृष्ट उदाहरण डोळ्यांसमोर उभे रहाते.’

सावरकर यांचे वरील विचार वाचल्यानंतर सामाजिक ऐक्य राखण्यासाठी प्रत्येकाला साहाय्य होईल, याचे आश्चर्य वाटायला नको.

३.  १८५७ चे स्वातंत्र्यसमर

प्रसिद्ध होण्यापूर्वीच बंदी घातलेले आणि मराठीतील पुस्तक नाहीसे झालेले असतांनाही लाखो स्वातंत्र्यसैनिकांनी ज्याचे पारायण केले ते, म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे ‘१८५७ चे पहिले स्वातंत्र्यसमर’ हे पुस्तक होय. ‘वर्ष १८५७ मध्ये झालेले युद्ध हे शिपायांचे बंड नसून ते स्वातंत्र्यसमर होते’, हे सावरकर यांनी विस्तृतपणे दाखवून दिले आहे. ‘ज्या देशाला आपल्या इतिहासाची योग्य जाणीव नसेल, त्याला कोणतेही भविष्य असत नाही, हे स्पष्ट करतांना इतिहासाचे योग्य ज्ञान अत्यंत महत्त्वाचे आहे’, असे सावरकर लिहितात. सावरकर पुढे लिहितात, ‘छत्रपती शिवाजींच्या काळात मोगलांविरुद्धचा राग योग्य असला, तरी आजच्या काळात मुसलमानांविरुद्ध कोणतीही भावना ठेवणे, हे केवळ मूर्खपणाचेच नसून पूर्णपणे अन्यायकारक आहे. वर्ष १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध हिंदु आणि मुसलमान यांनी एकत्रपणे परकीय इंग्रजांशी दिलेला लढा, हे उत्कृष्ट उदाहरण आहे.’ ‘सिंधूपासून म्यानमारमधील इरावडीपर्यंत भारत हा एक आहे आणि भारत अखंड राहिला पाहिजे’, हे सावरकर यांचे ठाम मत होते. वर्ष १८५७ चे युद्ध स्वधर्म आणि स्वराज्य यांसाठीचा लढा होता, हे त्यांनी स्पष्ट केले आहे.

(क्रमशः उद्याच्या दैनिकात)

– श्री. प्रवीण दीक्षित, निवृत्त पोलीस महासंचालक, मुंबई. (२५.५.२०२६)

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/1045042.html

संपादकीय भूमिका

प्रत्येक देशाने स्वतःच्या इतिहासाची चोख माहिती ठेवतांना पूर्व इतिहासाचे गुलाम न होता खरा इतिहास मांडावा !