सिद्धहस्त कवी मोरोपंत लिखित ‘मंत्र रामायणम्’मधील श्रीरामनामाची अद्भुत गुंफण !

‘१८ व्या शतकात महाराष्ट्रात मोरेश्वर रामचंद्र पराडकर नावाचे एक सिद्धहस्त कवी होऊन गेले. ते ‘मयूर कवी’, ‘मयूर पंडित’ किंवा ‘मोरोपंत’ या नावांनीही ओळखले जातात. त्यांनी ‘मंत्र रामायणम्’ नावाचे एक अद्भुत रामायण काव्य लिहिले.

मंत्र रामायणामध्ये ‘श्रीराम जय राम जय जय राम’ हा १३ अक्षरी राममंत्र गुंफला आहे.

‘मंत्र रामायणम्’च्या विविध श्लोकांमध्ये ‘श्रीराम जय राम जय जय राम’, या मंत्राची अनेक वेळा पुनरावृत्ती 

अ. आपण ‘मंगलचरणा’सह ‘बालकांडा’कडे पाहिले, तर पहिल्या श्लोकाचे पहिले अक्षर ‘श्री’, दुसर्‍या श्लोकाचे पहिले अक्षर ‘रा’, तिसर्‍या श्लोकाचे पहिले अक्षर ‘म’, चौथ्या श्लोकाचे पहिले अक्षर ‘ज’, पाचव्या श्लोकाचे पहिले अक्षर ‘य’, सहाव्या श्लोकाचे पहिले अक्षर ‘रा’, सातव्या श्लोकाचे पहिले अक्षर ‘म’, आठव्या श्लोकाचे पहिले अक्षर ‘ज’, नवव्या श्लोकाचे पहिले अक्षर ‘य’, दहाव्या श्लोकाचे पहिले अक्षर पुन्हा ‘ज’, अकराव्या श्लोकाचे पहिले अक्षर ‘य’, बाराव्या श्लोकाचे पहिले अक्षर ‘रा’ आणि तेराव्या श्लोकाचे पहिले अक्षर ‘म’ आहे. आपण प्रत्येक श्लोकाचे पहिले अक्षर वाचले, तर त्याचा क्रम अर्थात, ‘श्रीराम जय राम जय जय राम’ असेल. हे १ ते १३ पर्यंत आहे.

त्यानंतर १४ ते २६ पर्यंतही तेच आहे. आपण १४ व्या श्लोकापासून २६ व्या श्लोकापर्यंत पहिले अक्षर वाचले, तर ‘श्रीराम जय राम जय जय राम’, हेच दिसून येईल आणि मग आपण

२७ व्या श्लोकापासून ३९ व्या श्लोकापर्यंत पाहिले, तरी त्यातूनही हेच निघेल. संपूर्ण मंगलचरण आणि बालकांड यांमध्ये २९९ श्लोक आहेत. त्यामुळे पहिले अक्षर वाचल्यावर ‘श्रीराम जय राम जय जय राम’, या मंत्राची २३ वेळा पुनरावृत्ती होते.

आ. दुसरे कांड ‘अयोध्याकांड’ आहे. जर आपण प्रत्येक श्लोकाचे (जे २६० श्लोक आहेत) दुसरे अक्षर वाचले, तर ‘श्रीराम जय राम जय जय राम’ २० वेळा निघते.

इ. आपण अरण्यकांडातील (ज्यात ३९० श्लोक आहेत) प्रत्येक श्लोकातील तिसरे अक्षर वाचले, तर त्यात ‘श्रीराम जय राम जय जय राम’च्या ३० वेळा आवृत्ती होतात.

ई. चौथे कांड ‘किष्किंधाकांड’ आहे. त्यामुळे प्रत्येक श्लोकातील चौथे अक्षर वाचल्यावर ‘श्रीराम जय राम जय जय राम’ या १३ अक्षरी मंत्राच्या ३० आवृत्ती होतात.

उ. ‘सुंदरकांड’ हे पाचवे कांड आहे. त्यात प्रत्येक श्लोकाचे पाचवे अक्षर वाचल्यावर (४६८ श्लोकांमध्ये) ‘श्रीराम जय राम जय जय राम’च्या ३६ आवृत्ती होतात.

ऊ. ‘युद्धकांड’ हे सहावे कांड आहे. आपण या कांडातील प्रत्येक श्लोकातील सहावे अक्षर वाचले, तर त्यात ‘श्रीराम जय राम जय जय राम’च्या ८६ आवृत्ती होतात.

ए. शेवटी ‘उत्तरकांड’ अन् मंत्र संख्या विभाग या दोन्हींमध्ये मिळून १ सहस्र २७ श्लोक आहेत, जे ७९ च्या १३ पट आहेत. जर आपण प्रत्येक श्लोकातील सातवे अक्षर वाचले, तर त्यामुळे ‘श्रीराम जय राम जय जय राम’च्या ७९ वेळा आवृत्ती होतात.’

श्रीराम जय राम जय जय राम ।

(संदर्भ : ‘नित्यानंद’ यू ट्यूब वाहिनी)