दोन्ही पालख्यांच्या स्वागतासाठी पुणे शहरातील पोलीस यंत्रणा सज्ज !

वारकर्‍यांची ‘हायटेक’ सुरक्षाव्यवस्था ८ सहस्रांहून अधिक पोलीस तैनात

प्रातिनिधीक चित्र

पुणे – ९ ते १२ जुलै या वेळेत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुणे शहरात मुक्कामी असणार आहेत. या कालावधीत लाखो वारकरी पुण्यात मुक्कामी असतील. त्यांच्या सुरक्षेसाठी कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय), ड्रोन, मुखवटा ओळखणारी यंत्रणा, जी.पी.एस्. ट्रॅकिंग, अत्याधुनिक सीसीटीव्ही आणि ८ सहस्रांहून अधिक पोलिसांच्या फौजफाट्यांसह यंदाच्या वारीची सुरक्षा व्यवस्था केली जाणार आहे. गर्दी, धोक्याच्या ठिकाणी हवेतून ड्रोनचे लक्ष असेल, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

यंदा प्रथमच पालखी मार्गावर एकूण २४४ कृत्रिम बुद्धीमत्ता आधारित छायाचित्रक कार्यरत आहेत. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी मार्गावर १०१, जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी मार्गावर १२५ आणि २८ मुखवटे पडताळणी छायाचित्रक बसवले आहेत. पालखीच्या रथांवर आणि मिरवणुकीच्या मागे-पुढे १२ जी.पी.एस्. उपकरणे याशिवाय ५०० ध्वनीक्षेपक व्यवस्था, ३०० वॉकी-टॉकी, वायरलेस संच (बिनतारी यंत्र), डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर (प्रवेशद्वारावर बसलेले सुरक्षा यंत्र), हँड मेटल डिटेक्टर (हातातील धातूशोधक यंत्र), स्फोटक शोधक आणि नाशक पथक आणि श्वान पथकाची विशेष नियुक्ती केली आहे. कोणतीही अनुचित घटना घडल्यास तातडीने कारवाई करण्यासाठी जलद प्रतिसाद पथके सज्ज ठेवली आहेत. नाना पेठ, पालखी विठोबा मंदिर, निवडुंग्या विठोबा मंदिर, रामोशी गेट चौक आणि संत कबीर चौक या ठिकाणी विशेष पोलीस साहाय्यता केंद्रे उभारली आहेत.