दशावतारासह लोककलाकारांचे अनुदान दुप्पट होणार ! – आशिष शेलार

मुंबई, ८ जुलै (वार्ता.) – महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा असलेल्या कोकणातील दशावतार कलेसह अन्य लोककलाकारांच्या शासकीय अनुदानात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. राज्यातील ‘दशावतार’ ही केवळ लोककला नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि पारंपरिक वारशाचा अविभाज्य भाग आहे. या कलेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी दशावतारासह लोककला अनुदानाची रक्कम २ कोटी २२ लाख रुपयांवरून ४ कोटी ४० लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री अधिवक्ता आशिष शेलार यांनी विधानसभेत ८ जुलै या दिवशी लक्षवेधी सूचनेला उत्तर देतांना केली. विधानसभेत आमदार निलेश राणे यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री आशिष शेलार म्हणाले की,

१. या संदर्भातील शासन निर्णय पुढील १५ दिवसांत काढण्यात येईल. ‘दशावतार’ कलाकारांची जिल्हास्तरावर प्रत्यक्ष पडताळणी आणि नोंदणी करून त्यांना ओळखपत्रे दिली जातील.

२. ‘दशावतार आणि नमन महोत्सवा’प्रमाणेच राज्यातील भारूड, शंकासूर आणि शक्तीतुरा या लोककलांचे महोत्सव राज्याच्या प्रत्येक विभागात आयोजित केले जातील.

३. ‘देव खेळ’ या वेब सिरीजमध्ये लोकपरंपरेचा विपर्यास केल्याच्या तक्रारींची नोंद घेत संबंधितांवर पोलीस कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

४. राज्यातील भजनी मंडळांना साहित्य खरेदीसाठी मिळणारे अनुदान अधिक व्यापक केले जाईल आणि पात्र वृद्ध कलाकारांना मानधन योजनेचा लाभ दिला जाईल.

५. ‘राजर्षी शाहू महाराज वृद्ध कलाकार मानधन योजने’त पात्र दशावतार कलाकारांचा समावेश करण्यासाठी जिल्हास्तरीय समित्याद्वारे कार्यवाही करण्यात येईल.