मला अपकीर्त करा; पण महाराष्ट्राला करू नका ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री.

दरड कोसळल्यानंतर १८ घंट्यांत ‘मिसिंग लिंक’वरील वाहतूक पूर्ववत् केली !

(‘मिसिंग लिंक’ म्हणजे दोन मोठे महामार्ग किंवा एक्सप्रेस वे एकमेकांपासून काही अंतरावर असतात. त्यांना जोडल्या जाणार्‍या महामार्गाला ‘मिसिंग लिंक’ म्हणतात.)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, ८ जुलै (वार्ता.) – ‘काही लोक दूरदर्शनवर येऊन खोटे दावे करत आहेत. माझ्यावर टीका करा, शिव्या द्या; पण अपप्रचार करून महाराष्ट्राला अपकीर्त करू नका. ‘मुंबई-पुणे एक्सप्रेस वे मिसिंग लिंक’ हा अभियांत्रिकीचा चमत्कार असून दरड कोसळल्यानंतरही केवळ १८ घंट्यांत येथील वाहतूक पूर्ववत् करण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. मुंबईतील अतीवृष्टी, पूरस्थिती आणि ‘मुंबई-पुणे एक्सप्रेसवे मिसिंग लिंक’ प्रकल्पावरून विरोधकांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत प्रत्युत्तर दिले. नियम २९३ अंतर्गत झालेल्या चर्चेला उत्तर देतांना त्यांनी मुंबई आणि ‘एम्.एम्.आर्.’ (मुंबई महानगर प्रदेश) क्षेत्रासाठी महत्त्वाच्या घोषणा केल्या.

ते म्हणाले की, आघाडी सरकारच्या काळात ‘मिसिंग लिंक’चा प्रस्ताव बनवण्यात आला होता; मात्र तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी १४ कारणे देत धारिका बंद केली होती. महायुती सरकारने मात्र अधिकारी आणि तज्ञ यांच्याशी चर्चा केली. त्यांनी हा प्रकल्प शक्य असल्याचे सांगितल्यानंतर सरकारने निर्णय घेऊन पूर्ण करून दाखवला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,

१. मुंबईची ‘तुंबई’ होण्यापासून रोखण्यासाठी १३ सहस्र कोटी रुपयांचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी पाठवला असून याद्वारे ३७० पूरग्रस्त ‘हॉटस्पॉट’ (वारंवार पाणी साचणारी आणि वाहतूक ठप्प होणारी संवेदनशील ठिकाणे) दूर केली जातील.

२. मुंबईतील २ सहस्र ५० कि.मी. रस्त्यांपैकी ९५ टक्के रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले जात असून मे २०२७ पर्यंत हे काम पूर्ण होईल. रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाडी वर्ष २०२३ मध्ये २०३ कोटी रुपये खर्च आला होतो. वर्ष २०२६ हा खर्च अवघ्या ४५ कोटी रुपयांवर आला आहे.

३. मुंबईची पाण्याची तफावत भरून काढण्यासाठी ‘गारगाई प्रकल्पा’सह मनोरी आणि वर्सोवा येथील समुद्राचे पाणी गोड करणार्‍या प्रकल्पांद्वारे २०३० पर्यंत अतिरिक्त १ सहस्र एम्.एल्.डी. पाणी उपलब्ध केले जाईल.

४. ६ दिवसांत मुंबईत पावसाळ्याच्या ४२ टक्के अपवादात्मक पाऊस झाला असून नैसर्गिक संकटाचा सामना करण्यासाठी सरकार सर्वंकष नियोजन करत आहे.

५. मागे अनेकांनी दरड कोसळण्याच्या भीतीमुळे ‘कोकण रेल्वेचा प्रकल्प करू नये’, असे मत व्यक्त केले होते; मात्र तत्कालीन रेल्वेमंत्री मधु दंडवते यांनी धाडसी निर्णय घेत कोकण रेल्वे उभारली.