सभागृहात एकही मंत्री आणि सचिव नसल्यामुळे अध्यक्षांनी व्यक्त केला संताप !

मुख्य सचिवांना अर्ध्या घंट्यात सभागृहात उपस्थित रहाण्याचे दिले निर्देश !

 

मुंबई, ८ जुलै (वार्ता.) – ८ जुलै या दिवशी विधानसभेत नियम २९३ अन्वये प्रस्ताव चालू असतांना सभागृहात सरकारच्या वतीने एकही मंत्री आणि सचिव उपस्थित नसल्यामुळे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी संताप व्यक्त केला. मंत्रालयात ११० सचिवांना सरकार वेतन देते, त्यातील ४ सचिवही सभागृहात उपस्थित राहू शकत नाहीत का? पुढील अर्ध्या घंट्यामध्ये राज्याचे मुख्य सचिव सभागृहात उपस्थित राहिले नाहीत, तर सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करीन, असे निर्देश देऊन राहुल नार्वेकर यांनी सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी स्थगित केले. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्देशानंतर राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल सभागृहात उपस्थित झाले. सभागृह पुन्हा चालू झाल्यावर संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंत्रीमंडळाची बैठक असल्यामुळे मंत्री तेथे गेल्याची माहिती सभागृहात दिली. त्यावर राहुल नार्वेकर यांनी ‘सभागृहाच्या कामकाजापेक्षा कोणतेही काम महत्त्वाचे नाही’, असे स्पष्ट केले.

संपादकीय भूमिका

विधीमंडळात महत्त्वाच्या विषयांवर चर्चा चालू असतांना मंत्री आणि अधिकारी यांनी उपस्थित न रहाणे जनतेच्या दृष्टीने अनाकलनीय !