राज्य परिवहन महामंडळाकडील बसगाड्या जुन्या झाल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले !

चालकांच्या  चुकीमुळे ४ सहस्र २८१ अपघात

मुंबई, ८ जुलै (वार्ता.) – महामंडळाकडील बसगाड्या जुन्या झालेल्या आहेत, त्या वारंवार नादुरुस्त होतात. रस्त्यावर बंद पडतात. महामंडळाच्या बसगाड्यांचे अपघात होण्याचे प्रमाणही अधिक आहे. अशा प्रसंगी कर्मचार्‍यांवर कारवाई करण्यापेक्षा त्यांच्याकडून अधिक चांगले काम कसे करून घेता येईल, असा प्रयत्न महामंडळाकडून केला जातो, असे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत सांगितले. भाजपचे सदस्य प्रवीण दरेकर यांनी ‘राज्यातील बस अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याविषयी’चा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

१. महामंडळाच्या एप्रिल २०२४ ते जानेवारी २०२६ या कालावधीत ६ सहस्र ८२० अपघात झाले. त्यात चालकांचा दोष असलेले ४ सहस्र २८१ अपघात होऊन त्यात ८१५ जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणांमध्ये दायित्व चालकांवर खातेनिहाय प्रमादीय कारवाई केली आहे.

२. महामंडळाच्या बसगाड्यांचे अपघातांचे प्रमाण अल्प करण्यासाठी नियमितपणे अपघात नियंत्रण उपाययोजना करण्यात येतात. अपघात विरहित सेवा देणार्‍या चालकांचा विशेष सन्मान केला जातो.

३. अपघातात मृत झालेल्या ८१५ पैकी ६७ मृत व्यक्ती हे राज्य परिवहन मंडळाचे प्रवासी होते. ६७ व्यक्ती या पादचारी होत्या. इतर वाहनांतील मृत पावलेल्यांची संख्या ५६२ एवढी आहे.

संपादकीय भूमिका

बसगाड्या जुन्या होऊन अपघात होईपर्यंत महामंडळ शांत कसे बसते ? जनतेच्या जिवाची पर्वा न करणारे राज्य परिवहन महामंडळ काय कामाचे ? असा प्रश्न कुणाला पडल्यास चूक ते काय ?