अनेक जण ईश्वरविषयक काही तत्त्वज्ञान सांगणार्या ग्रंथांचे वाचन करत असतात. पैकी बर्याच जणांना साधना म्हणजे काय, याची कल्पनासुद्धा नसते. ‘साधना म्हणजे ईश्वरप्राप्तीसाठी जाणीवपूर्वक प्रतिदिन काया-वाचा-मन यांच्या माध्यमातून करायच्या कृती.’ ईश्वरविषयक तात्त्विक माहिती घेण्याच्या आधी साधना चालू करणे का महत्त्वाचे ? तसेच कुणी आवडते म्हणून ईश्वरविषयक तात्त्विक माहितीचे वाचन करत असतील, तर त्यांनीसुद्धा तत्परतेने साधना का चालू करावी, हे स्पष्ट करण्यासाठी हा लेख !

१. व्यवहारज्ञान काय सांगते ?
व्यवहारात पाककृतींची पुष्कळ पुस्तके वाचली; परंतु चुलीजवळही गेला नाही, अशाला कुणी स्वयंपाकी किंवा आचारी म्हणत नाहीत. येथे प्रत्यक्ष कृती करणे, याला अनन्यसाधारण महत्त्व आहे, हे लक्षात येईल. विचार करून पाहिल्यास अशी व्यावहारिक उदाहरणे पुष्कळ आढळतील.
२. शिक्षणशास्त्र काय सांगते ?
शिक्षणशास्त्रात कृतीयुक्त अध्यापनपद्धत किंवा अनुभवजन्य शिक्षण असावे, असे सांगितले जाते. रसायनशास्त्र शिकायचे झाल्यास काही प्रयोग करावे लागतात किंवा वैद्यकशास्त्र समजायचे झाल्यास रुग्णांना तपासावे लागते. तो तो विषय शिकण्यासाठी त्या त्या विषयानुसार योग्य ते प्रयोग करावे लागतात. अध्यात्म हेही एक स्वतंत्र शास्त्र / विज्ञान आहे. अध्यात्माचा प्रायोगिक भाग म्हणजे साधना !
३. आधुनिक विज्ञानाचे वैशिष्ट्य आणि ईश्वरप्राप्तीचे शास्त्र

आधुनिक विज्ञानात तात्त्विक भाग आणि प्रायोगिक भाग परस्परांना पूरक असतात. त्यातून त्या विज्ञानाचे गम्य समजते, तसेच ईश्वरप्राप्तीचे स्वतंत्र शास्त्र आहे. त्यात तात्त्विक आणि प्रायोगिक भाग परस्परांना पूरकच आहेत. जसा विज्ञानात आहे, तसाच अध्यात्मातही कार्यकारण संबंध, म्हणजे कशामुळे, कशापासून काय झाले इत्यादी सांगितलेले आहे. तो कसा आहे, हे अर्थातच त्या त्या शास्त्राच्याच आधारे समजून घ्यावे लागते.
अ. ईश्वरप्राप्तीसाठी योग्य स्वपरिवर्तन आवश्यक : विज्ञानात एकाने शोध लावला, तर बाकीच्यांनी त्याची फळे घेतली असे होऊ शकते. ईश्वरप्राप्तीच्या शास्त्रात ‘कुणा एकाने आपण काही करून दुसर्याने काहीही साधना केली नाही, तरी त्याला ईश्वरप्राप्ती करून देतो’, असे होत नाही. याचे कारण व्यक्तीने स्वत:मध्ये प्रयत्नपूर्वक योग्य ते परिवर्तन घडवून आणत, म्हणजेच साधना करत अंत:करण शुद्धी करून घेतल्यानंतरच ईश्वरप्राप्ती हे ध्येय साध्य होते. असे का हे आपण १. त्रिगुण विचार, २. मल, विक्षेप, आवरण हे जीवाचे गुणधर्म आणि ३. इच्छा, उर्मी, स्फुरण या अंत:करणाच्या क्रिया या ३ अंगांनी समजून घेऊ.
अ १. व्यक्तीची त्रिगुणात्मकता : पंचमहाभूत, तसेच सत्त्व, रज आणि तम या ३ गुणांनी व्यक्ती बनते. पंचमहाभूतांपासून व्यक्तीचा देह आणि त्रिगुण हे वर्तनाचे निर्देशक आहेत. थोडक्यात सांगायचे झाल्यास सत्त्वगुण म्हणजे ज्ञान, रजगुण म्हणजे क्रियाशीलता, तमगुण म्हणजे आळस. समाजात काही मोजके अपवाद वगळता बहुतांश व्यक्तींमध्ये रज आणि तम या गुणांचेच प्राबल्य असते. ईश्वरप्राप्तीच्या दिशेने पुढे जायचे झाल्यास रज आणि तम या गुणांचे प्राबल्य न्यून होऊन सत्त्व गुणाचे प्राबल्य निर्माण व्हावे लागते.
अ २. ईश्वरप्राप्तीमध्ये सत्त्व गुणाचे महत्त्व : सत्त्व गुण प्रधानता ही ईश्वरप्राप्तीसाठी उत्तम वाटचाल होण्यासाठी आवश्यक आहे. याचे कारण, म्हणजे सत्त्वगुण हा ज्ञानधारक आहे. सत्त्व गुण प्रधानता असेल, तर विचारांत सुस्पष्टता, विवेक इत्यादी येऊ शकतात. त्यातून जे वाचले ते नेमके समजून जीवनात ते आचरणात आणण्याचा काही प्रयत्न होण्याची शक्यता वाढते. येथे हेही लक्षात घ्यावे की, शब्दांचा, तसेच वाक्यांचा अर्थ समजणे, म्हणजे त्याचा बोध झाला, असे नाही. बोध म्हणजे अंतर्यामी होणारे स्पष्ट आणि दृढ आकलन. स्वत:मध्ये सत्त्व गुणप्रधानता होण्यासाठी रज आणि तम गुण न्यून व्हावे लागतात अन् सत्त्व गुण वाढावा लागतो. हे केवळ तात्त्विक वाचनातून होत नाही. त्यासाठी तम आणि रज गुण न्यून होण्यासाठी स्वभावदोष अन् अहंकार न्यून होऊन आचार-विचार सारेच पालटावे लागते, म्हणजेच साधना करावी लागते. साधनेतील इंद्रियांचा निग्रह आणि मनाचे नियंत्रण इत्यादींमुळे सत्त्वप्रधानता वाढते अन् वाचलेल्या सूत्रातून नेमके काय अपेक्षित आहे, याचे आकलन होऊ लाकते. सत्त्व गुणप्रधानता जितकी अधिक असेल, तर जो बोध होईल, तो तसाच दीर्घकाळ आपोआप टिकून रहाण्याची क्षमता वाढते. याचे कारण सत्त्व गुणाच्या आधारेच ज्ञान, म्हणजे आत्मज्ञान रहात असते.
आ. मल, विक्षेप आणि आवरण दूर होण्यासाठी साधना अनिवार्य : अध्यात्मामध्ये जीवामधील अशुद्धतांचे मल, विक्षेप आणि आवरण हे ३ गट सांगितले असून त्यामुळे जीव मायेत अडकलेला आहे, हे सांगितले आहे. त्यामुळे ईश्वरप्राप्तीसाठी त्या अशुद्धता दूर व्हायला हव्यात, हेही सांगितले आहे.
आ १. मल : मल म्हणजे चुकीचे संस्कार. हे जणू लोखंडाला जसा गंज चढतो, तसे अंत:करणामध्ये असतात. काम, क्रोधादिक षडरिपूंच्या स्वभावदोषात्मक अभिव्यक्तींतून त्याची जाणीव ईश्वरप्राप्तीसाठी व्यक्ती जेवढी सतर्क त्या प्रमाणात होत असते. आता लोखंडावरील गंज केवळ फुंकर मारली, तर जात नाही. त्यासाठी काहीतरी चांगले उपकरण घेऊन लोखंडाला काय वाटेल, याची फिकीर न करता चांगले घासावे लागते, तसेच केवळ तात्त्विक माहिती वाचली आणि जीवातील मल गेला, असे होत नाही. त्यासाठी आचार-विचारांत पालट जाणीवपूर्वक करावे लागतात. सोप्या भाषेत स्वभावदोष-अहंकार आदी प्रयत्नपूर्वक घालवावे लागतात. यासाठी साधना करावी लागते.
आ २. विक्षेप : माया ब्रह्म आहे, त्या जागी भलतेच काही तरी दाखवून जीवाला अनुभवाला येणार्या जगात गुंतवून टाकते. वास्तव सोडून असे भलतेच काही दाखवणे म्हणजे विक्षेप. त्यामुळे जीव जगाशी बांधला जातो. त्यामुळे त्याला जगात अनंत प्रकारचे भेद वाटत रहातात. यावर उपाय म्हणून उपासनाभक्ती, म्हणजेच साधना आवश्यक आहे.
आ ३. आवरण : जीव स्वत:च ब्रह्मस्वरूप असूनही त्याला त्याचा विसर पाडणे, ही मायेची आवरण शक्ती.
वरील तिघांमध्ये मल हा सर्वांत स्थूल आहे. तो न्यून झाल्याखेरीज बाकीचे दोन दूर होण्याचा संभवच नाही. त्यामुळे त्या दोघांचा येथे तूर्त फार विचार करण्याची आवश्यकता नाही.
(क्रमशः उद्याच्या दैनिकात)
श्रीगुरुचरणार्पणमस्तु ।
– आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत (वय ६५ वर्षे), एम्.डी. (मेडिसीन), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.७.२०२६)
विस्थापित नागरिकांविषयी अमेरिका आणि भारत यांच्या भूमिकांमधील भेद !
सिद्धहस्त कवी मोरोपंत लिखित ‘मंत्र रामायणम्’मधील श्रीरामनामाची अद्भुत गुंफण !
‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’ या घोषणेची प्रभावी कार्यवाही कधी होणार ?
गाझामधील हमास राजवटीचा शेवट ?
२३ वर्षांपूर्वी परात्पर गुरुदेवांनी ‘गाडगीळबाईंना (श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना) भेटून या, तुम्हाला आनंद मिळेल’, असे साधकांना सांगणे आणि साधकांनी ते अनुभवणे
सेवा करतांना मनात भाव असेल, तरच ती सेवा खर्या अर्थाने परिपूर्ण होते ! – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ