स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांची आज आवश्यकता !

२८ मे या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची दिनांकानुसार जयंती झाली. त्या निमित्ताने...

भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या ८० वर्षांनंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांची काय आवश्यकता आहे, असा प्रश्न कुणाच्याही मनात निर्माण होईल. त्याला उत्तर असे, ‘शरीररूपी सावरकर जेवढे महत्त्वाचे होते, त्यापेक्षाही विचाररूपी सावरकर हे कालजयी आहेत आणि त्यांचे विचार हे प्रत्येक भारतियासाठी अमर आहेत.’ २८ मे या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘ऐतिहासिक घटनांचे अचूक ज्ञान, हिंदुपदपादशाही आणि १८५७ चे स्वातंत्र्यसमर’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.

(भाग २)

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/1044593.html

स्वातंत्र्यवीर सावरकर

४. हिंदु समाजातील वैगुण्ये 

हिंदु समाजातील विविध चालींचा प्रदीर्घ अभ्यास केल्यानंतर सावरकर अंतर्मुख होतात आणि भारतातील विविध प्रकारच्या ७ बंदींकडे लक्ष वेधतात. त्या अशा,

अ. वाळीत टाकणे – श्रुतिस्मृतीपुराणोक्त बेडी

आ. लोटीबंदी (पाणी पिण्यावरील बंदी)

इ. रोटीबंदी (जेवणावरील बंदी)

ई. बेटी बंदी (अंतर्जातीय विवाहावरील बंदी)

उ. स्पर्श बंदी (अस्पृश्यता)

ऊ. शुद्धीबंदी (धर्मांतर केलेल्या लोकांना शुद्ध करून / हिंदु धर्मात घेण्यास बंदी)

ए. सिंधूबंदी (समुद्रप्रवासावर बंदी)

श्री. प्रवीण दीक्षित

सावरकर लिहितात,

‘या ७ बंदी, म्हणजे हिंदु समाजाच्या पायातील बेड्या होत्या. या बेड्या मुसलमान, ख्रिस्ती किंवा अन्य परकीय सत्तेने घातलेल्या नव्हत्या, तर हिंदूंनीच त्यांच्या धर्मरक्षणासाठी घातल्या होत्या. त्यामुळे सावरकर त्यांचा उल्लेख ७ स्वदेशी बेड्या असा करतात. हिंदूंचे गुणच विवेक न बाळगल्यामुळे त्यांचे दोष बनले. भगवद्गीतेचा संदेश की, ‘गुण हेसुद्धा सापेक्ष आहेत आणि परिपूर्ण नाहीत. माणसामाणसांमध्ये सत्त्व, रज आणि तामस गुणांवर आधारित भेद करण्याची आवश्यकता आहे’, या भगवद्गीतेच्या महत्त्वाच्या संदेशाकडे हिंदूंनी दुर्लक्ष केले आणि स्वतःचा विनाश ओढवून घेतला. जिंकल्यानंतर शरण आलेल्या शत्रूला जीवदान देणे, हा आपल्याकडे गुण समजला जातो; परंतु त्याचा गैरवापर करून कृतघ्न अशा महंमद घोरी अन् रोहिला नजिबखान यांना मोकळे सोडण्यामुळे त्यांच्यावर उपकार करणार्‍या पृथ्वीराज चव्हाण याला त्यांनी ठार मारले आणि दुसर्‍याने मराठ्यांचा पानिपतच्या युद्धात पराभव करण्याचे धाडस दाखवले. हिंदूंच्या अत्यंत पवित्र अशा सोमनाथ मंदिराचा विध्वंस मुसलमानांनी केला. त्यानंतर अनेक वेळेला सुवर्णसंधी लाभूनही विषारी अशा नाग सापांसारख्या क्रूर मुसलमान आक्रमणकर्त्यांच्या एकाही मशिदीची एकही वीट हिंदूंनी उपसून काढली नाही.

‘भुकेलेल्याला जेवण आणि तहानेलेल्याला पाणी देणे, हा गुण आहे’, असे हिंदूंनी पाठ केले होते. त्यामुळे या अत्यंत विषारी अशा नाग सापांसारख्या क्रूर मुसलमान आक्रमणकर्त्यांना योग्य धडा शिकवण्याच्या ऐवजी ते दूध पाजत राहिले. मथुरा, काशीपासून थेट रामेश्वरपर्यंतची अनेक मंदिरे फोडून तिथल्या विटा हिंदूंचा अपमान करण्यासाठी मुसलमानांची शौचालये आणि मुतार्‍या यांमध्ये पायदळी तुडवल्या जात असतांना अशा अक्षम्य अपराधाकडे दुर्लक्ष करून त्यांना क्षमा करणे, हा हिंदूंचा सर्वांत मोठा अपराध समजला पाहिजे. राजकीय विजय मिळवल्यानंतरही काशी, मथुरा येथील एकही मशीद हिंदु राजांनी फोडली नाही. फार फार तर काही ठिकाणी त्यांनी पुन्हा मंदिरे उभारली. हे एकदा नव्हे, तर वारंवार घडले’, असे सावरकर अधोरेखित करतात.

हिंदूंच्या स्त्रिया पळवणे आणि त्यांना स्वतःच्या जनानखन्यात कोंबणे, हे आक्रमक मुसलमान स्वतःचे धर्मकर्तव्य समजत होते; परंतु अनेक वेळा आक्रमक मुसलमानांवर विजय मिळवल्यानंतरही मुसलमानांनी कोंडलेल्या हिंदु बायकांना हिंदु राजांनी सोडवले नाही अन् त्यांना मुसलमानांच्या कैदेतच गुलाम म्हणून खितपत ठेवले. सावरकर यांच्या मते हा अक्षम्य अपराध होता. मुसलमान स्त्रियांना हिंदु करणे, हा तर घोर अपराध समजला जात होता. अनेक मुसलमान स्त्रियाही हिंदु स्त्रियांवर अत्याचार करत होत्या; परंतु तरीही ‘स्त्रियांवर दया दाखवावी’, या गुणाचा अतिरेक होऊन हिंदूंनी स्वतःची अपरिमित हानी  केली. सावरकर खेदाने म्हणतात, ‘अहिंसा, दया, शत्रूच्या बायकांविषयीही उदारता, शरण आलेल्याला क्षमा, धार्मिक सहिष्णुता हे नक्कीच गुण आहेत; परंतु ते कधी आणि कसे वापरायचे, याचा विवेक घालवल्यानेच हिंदु समाजाचे दोष ठरले.’

सावरकर खेदाने म्हणतात, 

पात्रापात्र विवेकशून्य, आचरि जरि सद्गुण ।
तो तोचि ठरे दुर्गुण, सद्धर्मघातक ।। – ‘सहा सोनेरी पाने’, या पुस्तकातील ‘पाचवे सुवर्ण पान’, प्रकरण ७

सावरकर यांच्या मते ज्याची ज्याची पितृभू आणि पुण्यभू आसिंधु सिंधू भारतभू आहे तो हिंदु !

५. विज्ञाननिष्ठ सावरकर

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘विज्ञाननिष्ठ निबंध’ यामध्ये अनेक विषयांवर सविस्तर लिहिले आहे. निसर्गचक्राविषयी कृतज्ञता व्यक्त करून सावरकर लिहितात, ‘विश्वातील यच्चयावत् वस्तूजातीच्या मुळाशी जी शक्ती आहे, तिला देव म्हणावयाचे असेल, तर देवाने हे सारे विश्व मनुष्याच्या सुखसोयीसाठीच निर्मिले, ही भावना भाबडी, खुळी आणि खोटी आहे. मनुष्य हा विश्वाच्या देवाच्या खिसगणतीतही नाही. या विश्वाच्या देवाशी कोणताही संबंध जोडण्याची हाव मनुष्याने सोडून द्यावी, हेच इष्ट; कारण तेच सत्य आहे. माणसाचे वाईट किंवा बरे करणे, या दोन्ही भावना विश्वाच्या देवाच्या ठायी असमंजस आहेत.’ सावरकर पुढे लिहितात, ‘मनुष्य जातीच्या सुखाला अनुकूल ते चांगले आणि प्रतिकूल ते वाईट अशी नीती-अनीतीची स्पष्ट मानवी व्याख्या केली पाहिजे. देवास आवडते ते चांगले आणि मनुष्यास जे सुखदायी ते देवास आवडते, या दोन्ही समजुती खुळचट आहेत; कारण त्या असत्य आहेत. विश्वात आपण आहोत; पण विश्व आपले नाही; फार फार थोड्या अंशी ते आपणास अनुकूल आहे; फार फार मोठ्या अंशी ते आपणास प्रतिकूल आहे – असे जे आहे ते नीटपणे, धीटपणे समजून घेऊन त्याला बेधडकपणे तोंड देणे, हीच खरी माणुसकी आहे ! आणि विश्वाच्या देवाची

तीच खरी खरी पूजा !!

(क्रमशः)

– श्री. प्रवीण दीक्षित, निवृत्त पोलीस महासंचालक, मुंबई. (२५.५.२०२६)

अंतिम भाग वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1045449.html