श्री तुळजाभवानी मंदिरात एकमुखी ब्रह्मदेव मूर्ती स्थापनेची भोपे पुजारी मंडळाची मागणी !

एकमुखी ब्रह्मदेव मूर्ती

तुळजापूर – ‘श्री तुळजाभवानी भोपे पुजारी मंडळा’ने श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानकडे मंदिर परिसरात शास्त्राधार आणि ऐतिहासिक परंपरेनुसार एकमुखी ब्रह्मदेवाची मूर्ती स्थापित करण्याची मागणी केली आहे. याविषयी संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, प्राचीन भारतीय शिल्पकला, कदंब, राष्ट्रकूट, चालुक्य आणि यादवकालीन मूर्तीशास्त्रात एकमुखी ब्रह्मदेवाच्या मूर्तींचे संदर्भ आढळत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

श्री तुळजाभवानी मंदिरातील पूर्वीची एकमुखी ब्रह्मदेवाची मूर्ती

प्रस्तावित मूर्ती कृष्णशिळेत घडवून तिचे स्वरूप शास्त्रानुसार एकमुखी, चतुर्भुज, वेद, अक्षमाला, सुवा, कमंडलू आणि हंसवाहनासह असावे, अशी मागणी करण्यात आली आहे. मंदिर परिसरातील योग्य जागेची निवड करून शास्त्रोक्त पद्धतीने प्राणप्रतिष्ठा आणि नियमित पूजा-अर्चा करण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली आहे. या कामासाठी आवश्यक धार्मिक मार्गदर्शन आणि शास्त्राधार उपलब्ध करून देण्यास भोपे पुजारी मंडळाने सिद्धता दर्शवली असून संस्थानने यासाठी समिती नेमून सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.