मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वन्यप्राण्यांवर विषप्रयोग !

मुंबई, ८ जुलै (वार्ता.) – अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत चौराकुंड वनपरिक्षेत्रात खवले मांजर, भेकर आणि माकड या वन्यप्राण्यांवर विषप्रयोग करून त्यांना ठार मारल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. या प्रकरणात एका मुख्य संशयिताला अटक करण्यात आली असून त्याने गुन्हा मान्य केला आहे. आणखी ४ जणांचा यात सहभाग आहे.

या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी चालू असून रासायनिक अहवालातून विषप्रयोग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अंतिम अहवाल येताच दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी ७ जुलै या दिवशी विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. वाघ आणि बिबट्या यांच्या शिकारींमागे आंतरराष्ट्रीय तस्करीचे जाळे कार्यरत असल्याचेही त्यांनी या वेळी मान्य केले.

ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. याला उत्तर देतांना वनमंत्री गणेश नाईक म्हणाले की, भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी वन विभाग आता सतर्कता वाढवणार आहे. यासाठी मानवी वावरास बंदी असलेल्या क्षेत्रांवर ‘सॅटेलाईट’द्वारे देखरेख ठेवणे यांसारख्या उपाययोजना राबवल्या जातील.