सिंधुदुर्ग येथील ‘श्रीदेव कलेश्वर देवस्थाना’च्या भूमीची केवळ शंभर रुपयांत विक्री !

मुंबई, ८ जुलै (वार्ता.) – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील नेरूर तर्फे हवेली येथील ‘श्रीदेव कलेश्वर देवस्थाना’च्या भूमीची अवैधरित्या केवळ १०० रुपयांमध्ये विक्री करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी ८ जुलै या दिवशी याविषयीचा तारांकित प्रश्न विधानसभेत उपस्थित केला. त्यावर मुख्यमंत्री कार्यालयाकडून लेखी उत्तर देण्यात आले.

श्रीदेव कलेश्वर देवस्थान हे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अखत्यारित येते. समिती, तसेच धर्मादाय आयुक्त यांच्याकडे कोणत्याही प्रकारची अनुमती न घेता या भूमीची विक्री करण्यात आली आहे. या प्रकरणी प्रशासनाकडून चौकशी चालू असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली.