शहापूरचा प्रस्तावित कल्याण अपर जिल्हाधिकारी कार्यालयात समावेश करा !

माजी उपसभापती महेश धानके यांची मागणी

महेश धानके

ठाणे, ८ जुलै (वार्ता.) – महसूल आणि वन विभागाने २३ जून या दिवशी प्रसिद्ध केलेल्या जाहीर सूचनेनुसार प्रस्तावित अपर जिल्हाधिकारी, कल्याण (मुख्यालय – कल्याण) आणि उपविभागीय अधिकारी, शहापूर (मुख्यालय – शहापूर) यांच्या कार्यक्षेत्राविषयी हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत; मात्र या प्रस्तावात शहापूर तालुक्याचा कल्याण अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे शहापूर तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा जनक्रांतीचे अध्यक्ष महेश धानके यांनी ठाण्याच्या जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदन देऊन ही त्रुटी दूर करण्याची मागणी केली आहे.

धानके यांनी निवेदनात नमूद केले आहे की, शहापूर हा ठाणे जिल्ह्यातील भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण, डोंगराळ आणि आदिवासीबहुल तालुका असून महसुली कामांसाठी ठाणे येथे जाणे नागरिकांसाठी वेळखाऊ अन खर्चिक ठरते. त्याउलट शहापूरचा दैनंदिन संपर्क, वाहतूक आणि व्यवहार हे कल्याण येथे करणे अधिक सुलभ आहे. प्रस्तावित कल्याण अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर आणि मुरबाड तालुक्यांचा समावेश करण्यात आला असल्याने शहापूरचाही त्यात समावेश करणे भौगोलिक आणि प्रशासकीयदृष्ट्या योग्य ठरेल. त्यामुळे नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचून प्रशासकीय सेवा अधिक गतीमान होतील तसेच ‘प्रशासन जनतेच्या दारी’ हे शासनाचे उद्दिष्ट अधिक प्रभावीपणे साध्य होईल.