मुंबई येथे झालेल्या श्री राजमातंगीदेवी महायज्ञाच्या ठिकाणी वैद्यकीय साहाय्यता कक्ष उभारण्यासाठी आधुनिक वैद्यांनी केलेले साहाय्य आणि त्यांनी सनातन संस्थेवर दाखवलेला विश्वास !

‘सनातन संस्थेच्या वतीने प्रभादेवी, मुंबई येथे १७.५.२०२६ या दिवशी श्री राजमातंगीदेवी महायज्ञ पार पडला. ‘यज्ञस्थळी येणार्‍या भाविकांना काही वैद्यकीय साहाय्य लागले, तर ते तात्काळ उपलब्ध व्हावे’, यासाठी वैद्यकीय साहाय्यता कक्ष उभारण्यात आला होता. हा कक्ष उभारण्याच्या सेवेच्या दरम्यान समाजातील व्यक्तींना सनातन संस्थेविषयी असलेला विश्वास आणि त्यांचे लाभलेले साहाय्य यांविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.

१. वैद्यकीय साहाय्यता कक्ष उभारण्याचा निर्णय झाल्यानंतर अस्थिरोगतज्ञ महेश दीक्षित आणि आधुनिक वैद्य सुरेश मिस्त्री यांनी साहाय्य करणे 

या कक्षावर रुग्णतपासणीसाठी आपत्कालीन स्थिती सांभाळू शकणार्‍या २ आधुनिक वैद्यांचे साहाय्य लागणार होते. त्या वेळी ठाणे येथील अस्थिरोगतज्ञ महेश दीक्षित आणि आधुनिक वैद्या (सौ.) अंजली पाटील यांचे साहाय्य मिळाले. साधिका सौ. शर्मिला बांगर यांच्या संपर्कातील माटुंगा येथील आधुनिक वैद्य सुरेश मिस्त्री यांनी कक्षासाठी आवश्यक असलेली सर्व वैद्यकीय उपकरणे आणि अन्य वस्तू उपलब्ध करून दिल्या. आधुनिक वैद्य मिस्त्री यांची इतरांना साहाय्य करण्याची वृत्ती आम्हाला शिकता आली. ते ‘मी सेवक आहे’, या भावाने आम्हाला साहाय्य करत होते. त्यांनी त्यांच्या ओळखीने एक ‘व्हिलचेअर’ (चाकांची आसंदी) मिळवून दिली.

देहबुद्धी विसरून झोकून देऊन सेवा करणार्‍या आधुनिक वैद्या (सौ.) प्राची दळवी !

‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञाच्या दिवशी वैद्यकीय कक्ष लावण्यात अडचणी येत होत्या. महायज्ञाची वेळ दुपारी ३.३० वाजता होती. रविवारी दुपारी १ वाजला, तरीही अडचणी येतच होत्या. वैद्यकीय कक्ष दुपारी १.१५ वाजता लावून पूर्ण झाला. कक्ष उभारण्याची सेवा करतांना आधुनिक वैद्या (सौ.) प्राची दळवी यांनी देहबुद्धी विसरून झोकून देऊन सेवा केली. महायज्ञ असल्यामुळे सर्व साधक नवीन पोशाख घालून आले होते. आम्ही कक्ष लावण्याच्या सेवेत असल्यामुळे आम्हाला वैयक्तिक आवरण्यासाठी वेळ मिळत नव्हता. त्या वेळी प्राचीताईंनी मला वैयक्तिक आवरून येण्यासाठी पाठवले आणि स्वतः कक्षावरील सेवा सांभाळली.’

– सौ. ममता देसाई, बेलापूर, नवी मुंबई. (१५.५.२०२६)

२. रुग्णवाहिका उपलब्ध होणे 

सौ. ममता देसाई

दादर (मुंबई) येथील जैन रुग्णालयानेही कक्ष उभारणीसाठी साहाय्य केले. वैद्यकीय कक्षात कार्डियाक रुग्णवाहिका (ॲम्बुलन्स) मिळत नव्हती. (हृदयविकाराच्या झटक्यासारख्या गंभीर आणीबाणीच्या प्रसंगी वापरली जाणारी विशेष वैद्यकीय सुविधा असलेली रुग्णवाहिका म्हणजे ‘कार्डियाक ॲम्बुलन्स.’)  महापालिकेत नोकरी करणारे साधक श्री. प्रसाद मानकर त्याच भागात सेवा करत होते. त्यांच्या साहाय्याने आमची महापालिकेचे आधुनिक वैद्य अमोल दोराई यांच्याशी भेट झाली. त्यांनी ‘कार्डियाक ॲम्बुलन्स’ देण्याविषयी अनुकूलता दर्शवली.

३. महायज्ञस्थळाचे वातावरण पाहून आधुनिक वैद्य संजय ताठी प्रभावित होणे 

जैन रुग्णालयाचे आधुनिक वैद्य संजय ताठी वैद्यकीय साहाय्यता कक्ष लावून देण्याच्या सेवेत सहभागी झाले होते. महायज्ञाचे एकूणच आयोजन पाहून ‘हा कार्यक्रम पुष्कळ वेगळा आहे. या ठिकाणचे वातावरण पुष्कळ वेगळे आहे’, असे ते म्हणाले. त्यांना सर्व साधकांचा सेवाभाव पुष्कळ आवडला. महायज्ञ झाल्यानंतर त्यांनी ‘इतर वेळीही अन्य काही सेवा असेल, तर मला सांगा’, असे सांगितले.

४. ‘आधुनिक वैद्यांना येथील दैवी वातावरण अनुभवता येणे’, ही मला श्री गुरूंची (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची) कृपाच वाटली.

‘महायज्ञाच्या वेळी वैद्यकीय कक्षासाठी उपकरणे, रुग्णवाहिका उपलब्ध होणे, आधुनिक वैद्य उपलब्ध होणे, रुग्णांना वैद्यकीय साहाय्य देणे’, या गोष्टी सहजतेने झाल्या. त्या वेळी ‘समाजातील लोकांचा सनातन संस्थेवर किती विश्वास आहे !’, हे दिसून आले’, त्याबद्दल मी श्री गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– सौ. ममता देसाई, बेलापूर, नवी मुंबई. (१५.५.२०२६)