मुंबईत राष्ट्ररक्षणार्थ ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ !

सहस्रो भक्तांच्या उपस्थितीत देशाच्या आर्थिक राजधानीत निनादला वेदमंत्रांचा घोष !

श्री राजमातंगी महायागाच्या वेळी पूर्णाहुती देतांना १ श्री. गुरुमूर्ती शिवाचार्य, वेदमंत्रपठण करतांना २. शिवागम विद्यानिधी आगमाचार्य श्री. अरुणकुमार गुरुमूर्ती, तसेच अन्य पुरोहित गण. या वेळी ३. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, ४. सद्गुरु नीलेश सिंगबाळ, ५. श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि ६. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

मुंबई – सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी ज्या नगरीतून धर्मकार्याचा श्रीगणेशा केला, ती मुंबापुरी (मुंबई) अधिक ज्येष्ठ शुक्ल प्रतिपदेला वेदमंत्रांच्या घोषाने निनादली ! मुंबईचे आराध्य असलेल्या श्री सिद्धिविनायकाच्या कृपाछायेखाली सनातन संस्थेच्या इतिहासातील एक सोनेरी पान जोडले गेले ! प्रभादेवी येथील नर्दुल्ला टँक मैदानात अत्यंत भावपूर्ण आणि मंगलमय वातावरणात दिव्य श्री राजमातंगी महायज्ञ करण्यात आला. सध्याच्या युद्धकाळात तपोभूमी भारताला संरक्षककवच लाभावे आणि भारताची सर्वांगीण अभिवृद्धी व्हावी, यासाठी सनातन संस्थेने आयोजित केलेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’मुळे मुंबईचे आसमंत वेदमंत्रांच्या जयघोषाने अन् सद्गुरु, संत यांच्या वंदनीय उपस्थितीने उजळले. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या चैतन्यदायी अस्तित्वाने वातावरण तेजोमय झाले. यज्ञसोहळ्याला उपस्थित मान्यवर, साधक आणि भक्तजन श्री राजमातंगी देवीच्या कृपावर्षावात न्हाऊन निघाले.महायज्ञाला जीवनाडीपट्टी वाचक पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांचीही वंदनीय उपस्थिती लाभली.

… असा झाला यज्ञसोहळा !

श्री राजमातंगी महायज्ञ सोहळ्याचा प्रारंभ १७ मेच्या दुपारी ३ वाजता श्री महागणपती पूजन करून करण्यात आला. त्यानंतर पुण्याहवाचन आणि महायज्ञाचा संकल्प करण्यात आला. उपस्थित सर्व श्रद्धाळूंनीही या वेळी ‘सामूहिक संकल्प’ केला. यानंतर अत्यंत भावपूर्ण वातावरणात ललिता त्रिशती कुंकूमार्चनाद्वारे देवीला आवाहन करण्यात आले. त्यानंतर श्री राजमातंगी देवीच्या मूलमंत्रांनी यज्ञामध्ये आहुती समर्पित करण्यात आल्या. माला मंत्र, गायत्रीमंत्राचा पाठ, होम आणि पारायण झाल्यानंतर श्री गणपति होमाद्वारे गणेशाची आराधना करण्यात आली. श्री राजमातंगी आणि परिवार देवता यांचा होम झाल्यानंतर देवी सप्तशतीच्या सातव्या अध्यायाचे पठण करत होम करण्यात आला. त्यानंतर यथासांग पूर्णाहुती झाली !

महापूर्णाहुतीचा दिव्य अनुभव घेतला !

इरोड, तमिळनाडू येथील शिवागम विद्यानिधी आगमाचार्य श्री. अरुणकुमार गुरुमूर्ती आणि यज्ञाचे मुख्य आचार्य श्री. गुरुमूर्ती शिवाचार्य यांनी भावपूर्णरित्या केलेले पौरोहित्य अन् श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यामुळे ईश्‍वरी चैतन्याने भारलेल्या वातावरणात उपस्थित श्रद्धाळू एकरूप झालेले असतांनाच आला महापूर्णाहुतीचा क्षण ! श्री राजमातंगी देवीला वस्त्रसमर्पण, सौभाग्यद्रव्य समर्पण, तसेच वसोर्धारा समर्पण झाल्यानंतर त्या चैतन्यमय वातावरणात महापूर्णाहुतीचा दिव्य अनुभव घेतला. जणू ‘देवी प्रत्यक्षच अवतरली आहे’, असे वातावरण सर्वच श्रद्धाळू अनुभवत होते !

देवीतत्त्वाच्या त्या दिव्य उपस्थितीतच महादीप आराधना आणि उपचारपूजा संपन्न झाली. महिषासुरमर्दिनी सामूहिक पाठाने या विधीची सांगता झाली. यज्ञाचा चैतन्यमय प्रसाद आणि देवीतत्त्वाची दिव्य अनुभूती अंतःकरणात घेऊन श्रद्धाळू मार्गस्थ झाले !

सद्गुरु-संतांच्या उपस्थितीत सहस्रो हिंदूंनी घेतला महायज्ञाचा आध्यात्मिक लाभ !

७ सहस्रांची प्रत्यक्ष, तर ४० देशांतील सहस्रावधींची ऑनलाईन उपस्थिती !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु नीलेश सिंगबाळ, तसेच  श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ हे प्रमुख यजमान म्हणून यज्ञस्थळी उपस्थित होते. मुंबई आणि परिसरातील अनेक दांपत्ये यज्ञाचे सहयजमान म्हणून उपस्थित होती.

या मंगलप्रसंगी सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव, सद्गुरु सत्यवान कदम, सद्गुरु अनुराधा वाडेकर, सद्गुरु स्वाती खाडये, तसेच सनातन संस्थेचे  पू. अशोक पात्रीकर आणि  पू. (सौ.) संगीता जाधव यांचीही वंदनीय उपस्थिती लाभली.

हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी, विविध संप्रदायांचे भक्त, प्रतिष्ठित, हितचिंतक, विज्ञापनदाते, पत्रकार आणि सनातन संस्थेच्या साधकांसह ७ सहस्रांहून अधिक भाविक प्रत्यक्ष, तसेच ४० देशांतील लोकांनी ऑनलाईन स्वरूपात चैतन्यदायी महायज्ञाच्या सोहळ्याचा आध्यात्मिक स्तरावर लाभ घेतला.

देशाच्या रक्षणासाठी करण्यात आले श्री राजमातंगीदेवीचे आवाहन !

श्री राजमातंगीदेवी

आदिशक्ती देवी सतीच्या क्रोधातून प्रकट झालेल्या ‘दशमहाविद्यां’मध्ये मातंगीदेवीचे स्थान अनन्यसाधारण आहे. देवी मातंगी ही आदिशक्तीची ‘प्रधानमंत्री’ म्हणजेच प्रमुख सल्लागार मानली जाते. शत्रूवर विजय मिळवण्यासाठी आणि प्रतिकूल परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी या देवीची उपासना फलदायी ठरते. त्रेतायुगात प्रभु श्रीरामाच्या अवताराच्या वेळीही राजमातंगीदेवीचे तत्त्व कार्यरत होते, ज्यामुळे आदर्श रामराज्य स्थापित होऊ शकले. आजच्या काळातही तशाच दैवी शक्तीच्या आशीर्वादाने भारताचे संरक्षण व्हावे, हा या महायज्ञामागील मुख्य उद्देश होता.

महायज्ञाच्या वेळी श्री राजमातंगीदेवीची स्तुती करून भारताचा सर्वांगीण विकास आणि रक्षण यांसाठी सामूहिक प्रार्थना करण्यात करण्यात आली.

सोरटी सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या दिव्य अंशांचे दर्शन !

सोरटी सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दिव्य अंश !

१ सहस्र वर्षांपूर्वी आक्रमक महंमद गझनी याने सोमनाथ ज्योतिर्लिंगाला भग्न केले होते. गेली १ सहस्र वर्षे काही भक्तांनी या ज्योतिर्लिंगाच्या अंशांना जपून ठेवले. या दिव्य अंशांचे महायज्ञाला उपस्थित हिंदु जनसमुदायाला दर्शन लाभले. दुपारी ३.१५ वाजता मुख्य आचार्य श्री. अरुणकुमार गुरुमूर्ती यांच्या हस्ते आणि अन्य पुरोहितांच्या उपस्थितीत या दिव्य अंशांचे नादस्वरात (पारंपरिक वाद्यांच्या गजरात) यज्ञस्थळी आगमन झाले. भाविकांनी अत्यंत भावपूर्ण रितीने या दिव्य अंशांचे दर्शन घेतले. श्री राजमातंगी महायज्ञाच्या निमित्ताने शक्तीची उपासना होत असतांना तेथे सोरटी सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या रूपाने भगवान शिवाचीही प्रत्यक्ष उपस्थिती लाभल्याने जणू ‘शिवशक्ति संगमा’त स्नान केल्याचा भाव भक्तांनी अनुभवला.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी या दिव्यांशांचे औक्षण केले.

क्षणचित्रे

१. सहस्रो वर्षे जपून ठेवलेल्या आणि आता प्रदर्शित होत असलेल्या ज्योतिर्लिंगाच्या दिव्य अंशांचे मंचावर आगमन होताच शेकडो भक्तगणांच्या अंगावर रोमांच उभे राहिले.

२. यज्ञसोहळ्याच्या ठिकाणी उभारलेल्या विविध कक्षांना भाविकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे त्यांच्यातील जिज्ञासूवृत्ती लक्षात आली.

३. यज्ञमंडपाच्या मध्यभागी वरच्या बाजूस सरळ लावलेले प्रबोधनपर वाक्यांचे फलक भाविकांचे लक्ष वेधून घेणारे ठरले.

४. यज्ञाच्या पूर्णाहुतीच्या वेळी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रम परिसरातील आकाशात लख्ख पिवळा प्रकाश पडला होता.

५. मुंबईत यज्ञ समाप्तीनंतर लगेचच रामनाथी येथील सनातनच्या आश्रम परिसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला, जणूकाही वरुणराज आणि देवता यांनी या रूपात सनातनला आशीर्वाद दिला.

महायज्ञाला उपस्थित लोकप्रतिनिधी

  • भाजपचे आमदार ज्ञानेश्‍वर म्हात्रे
  • शिवसेनेच्या विधान परिषदेच्या आमदार डॉ. मनीषा कायंदे
  • भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक श्री. प्रकाश गंगाधरे
  • मनसेचे नगरसेवक श्री. यशवंत किल्लेदार

सहयजमानांपैकी सपत्नीक सहभागी झालेले काही मान्यवर !

  • हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर
  • ज्येष्ठ हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता नितीन प्रधान
  • स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री. रणजीत सावरकर
  • पितांबरी उद्योगसमूहाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई
  • उद्योजक श्री. धनराज विसपुते