सनातन संस्थेच्या वतीने मुंबई येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती !

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८४ व्या जन्मोत्सवानिमित्त प्रभादेवी (मुंबई) येथे १७.५.२०२६ या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने ‘श्री राजमातंगी महायज्ञा’चे आयोजन करण्यात आले होते. साधिकेला या महायज्ञाच्या वेळी आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

श्री राजमातंगीदेवी

१. ‘श्री राजमातंगीदेवी’च्या कृपेने महायज्ञाला उपस्थित रहाण्याची संधी मिळणे 

‘हा महायज्ञ यज्ञस्थळी बसून प्रत्यक्ष पहावा’, असे मला वाटत होते; म्हणून मी श्री राजमातंगीदेवीला सारखी प्रार्थना करत होते. अकस्मात् माझ्या यजमानांनी ‘१७.५.२०२६ या दिवशी मी सकाळी काही कामानिमित्त पुण्याहून मुंबईला चारचाकी गाडीने जाणार आहे’, असे मला सांगितले. त्यामुळे ‘मला यज्ञाला जायला मिळणार’, या विचाराने आनंद झाला. मी दुपारी १२ वाजताच यज्ञस्थळी पोचले. देवीच्या कृपेनेच या महायज्ञाला प्रत्यक्ष उपस्थित रहाण्याची संधी मिळाल्याबद्दल मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.

२. यज्ञस्थळी गेल्यावर आलेल्या अनुभूती 

सौ. वर्षा ठकार

अ. यज्ञस्थळी पोचल्यावर तेथील ‘भव्य मंडप आणि चैतन्यमय वातावरण’ पाहून मी भारावून गेले. मी ते सर्व अनुभवत असतांना माझ्या डोळ्यांतून कृतज्ञतेने अश्रू येत होते.

आ. गुरुदेवांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) पडद्यावरील छायाचित्रातील रूप अत्यंत तेजस्वी आणि सजीव दिसत होते. ‘प्रत्यक्षात ते तेथे उपस्थित आहेत’, असेच मला अनुभवायला येत होते. त्या वेळी ‘गुरुदेवा, तुम्ही किती करता हो साधकांसाठी !’, असे वाटून माझा कंठ दाटून येत होता आणि डोळ्यांतून भावाश्रू येत होते.

इ. चित्रातील श्री राजमातंगीदेवी मोहक अशा कमळावर आरुढ झाली होती. तिचा एक कोमल चरण कमळाच्या पुढच्या एका पाकळीवर ठेवलेला पाहून ‘प्रत्यक्ष देवी समोर प्रगट झाली आहे’, असे मला वाटत होते.

३. यज्ञ चालू असतांना 

अ. महायज्ञ चालू झाल्यावर ‘देवता साधकांवर पुष्पवृष्टी करत आहेत’, असे मला जाणवले.

आ. मला निर्गुणाची अनुभूती येत होती. मला वेळेचे भान रहात नव्हते.

इ. ‘यज्ञाच्या धुरातून मला चैतन्य मिळत होते’, असे मला जाणवले.

ई. सोरटी सोमनाथ येथील ज्योतिर्लिंगाचे दिव्य अंश वाद्यांच्या सुरात वाजत-गाजत यज्ञस्थळी आणण्यात आले. तेव्हा मला ‘शिव-शक्ती प्रकटली आहे’, असे वाटले.

उ. पूर्णाहुतीच्या वेळी देवीसाठी लाल रंगाच्या भरजरी रेशमी वस्त्राची यज्ञकुंडात आहुती दिली, तसेच पुरोहित धनधान्य, प्रसाद, फुलांचे हार इत्यादी गोष्टी यज्ञकुंडात अर्पण करत होते. ‘अग्निदेव ते सर्व श्री राजमातंगीदेवीपर्यंत पोचवत आहेत’, असे मला जाणवले आणि माझी भावजागृती झाली.

ही अनुभूती लिहून देत असतांनाही माझी भावजागृती झाली.

‘हे गुरुदेवा, मी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

–  सौ. वर्षा ठकार, पुणे (२२.५.२०२६)

श्री राजमातंगीदेवी महायज्ञ ‘ऑनलाईन’ पहात असतांना साधिकेला जाणवलेली सूत्रे !

सौ. सुजाता रेणके

‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञ’ अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडला. साधिका रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात बसून ‘ऑनलाईन’ यज्ञ पहात असतांना तिला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

१. ‘यज्ञस्थळी असलेल्या श्री राजमातंगीदेवीच्या मूर्तीतून प्रकाश प्रक्षेपित होत आहे’, असे मला दिसत होते.

२. यज्ञाचे प्रक्षेपण पहात असतांना ‘त्रेतायुगात आणि द्वापरयुगात असेच यज्ञ होत असतील’, असे मला वाटले.

३. तेथील वातावरण चैतन्यमय झाले असल्याचे मला जाणवत होते.

४. यज्ञस्थळी उपस्थित असलेल्या ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना पाहून त्या श्री राजमातंगीदेवीचीच दोन रूपे आहेत’, असे मला वाटले.

५. यज्ञाचा आरंभ झाल्यापासून त्याची सांगता होईपर्यंत माझा नामजप अखंड होत होता. माझ्या मनाला एक प्रकारचा उत्साह वाटत होता.

‘मला श्री राजमातंगीदेवी महायज्ञाचे प्रक्षेपण पहाण्याची संधी मिळाल्याबद्दल आणि या अनुभूती दिल्याबद्दल मी गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– सौ. सुजाता अशोक रेणके, फोंडा, गोवा. (२३.५.२०२६)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक