हिंदु धर्मापुढील जिहादी मुसलमानांच्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चे (‘पी.एफ्.आय.’चे) संकट !

‘हिंदु आणि राष्ट्र हितैषी’ सदर !

१. कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्याची जिहादी ‘पी.एफ्.आय.’ची पद्धत

‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पी.एफ्.आय.) प्रथम मुसलमान मुलांची निवड करतात. त्यांना प्रारंभीच गोळीबार करण्याचे प्रशिक्षण दिले जात नाही. प्रथम ते चालत्या दुचाकीवरून जातांना कुत्र्यांना कापून काढण्याचे प्रशिक्षण देतात आणि त्यानंतर एखाद्यावर पाठीमागून वार करण्याचे प्रशिक्षण देतात. अशा प्रकारे प्रशिक्षण देणारे केंद्र कर्नाटकच्या दक्षिण गड जिल्ह्यात आहे.

अधिवक्ता कृष्णमूर्ती यांचा परिचय

अधिवक्ता कृष्णमूर्ती पी.

‘अधिवक्ता कृष्णमूर्ती हे मडिकेरी (कर्नाटक) येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता आहेत. ते तेथील सत्र न्यायालय आणि कर्नाटक उच्च न्यायालय येथे वकिली करतात. गोहत्या, अवैध गोतस्करी, निरपराध हिंदूंवरील अत्याचार इत्यादींच्या विरोधात ते न्यायालयीन लढा देत आहेत. कथित पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात गोवण्यात आलेल्या निरपराध हिंदूंना ते कायदेशीर साहाय्य करत आहेत. त्यांची आध्यात्मिक पातळी ६४ टक्के आहे. हिंदुत्वासाठी लढा देत असल्यामुळे त्यांच्यावर समाजविघातक लोकांकडून आक्रमणेही झाली आहेत. असे असतांनाही ते धर्मरक्षणाच्या या लढ्यात अखंडपणे कार्यरत आहेत.

२. बजरंग दल कार्यकर्त्याची हत्या केल्याप्रकरणी ‘पी.एफ्.आय.’च्या लोकांना अटक

वर्ष २०१३ मध्ये प्रशांत पुजारी या बजरंग दलाच्या क्रियाशील कार्यकर्त्याला ठार करण्यात आले. दक्षिण कर्नाटकमधील मुडबिद्री येथे ही हत्या झाली. या प्रकरणी ‘पी.एफ्.आय.’च्या लोकांना अटक करण्यात आली. १०.११.२०१६ या दिवशी त्यातील उस्ताफा याला मैसुरू कारागृहात ठेवले, अशी बातमी पसरली. त्याच कारागृहात मृतक प्रशांत पुजारीचा मित्र किरण शेट्टी अटकेत होते. तेथे त्या उस्ताफाची धारदार चमच्याच्या साहाय्याने हत्या करण्यात आली. त्याचा आरोप या शेट्टींवर ठेवण्यात आला. तशा बातम्या माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या.

३. हिंदुत्वनिष्ठाचा खटला लढणार्‍या अधिवक्त्याला ‘पी.एफ्.आय.’ कार्र्यकर्त्यांची धमकी

या प्रकरणी आरोपपत्र प्रविष्ट झाले. मैसुरू जिल्हा न्यायालयात शेट्टींच्या अधिवक्त्याने १५ साक्षीदारांची उलट तपासणी घेतली. त्या दिवशी न्यायालयाच्या आवारात त्या अधिवक्त्याला धमकी देण्यात आली. हा खटला चालू असतांना तेथे प्रत्येक दिवशी ‘पी.एफ्.आय.’चे २० हून अधिक कार्यकर्ते उपस्थित रहायचे. ते छायाचित्र आणि ध्वनीचित्रफीत करायचे. त्यामुळे शेट्टींचा खटला लढणारे अधिवक्ते घाबरले. एक दिवस त्यांनी न्यायाधिशांना सांगितले, ‘मला धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे मी हा खटला लढण्यास असमर्थ आहे.’

साधना करत असल्याने प्राणघातक आक्रमणातून प्राण वाचणे !

अधिवक्ता कृष्णमूर्ती पी.

आपण लोक बचावात्मक स्थितीमध्ये असतो, तर ‘पी.एफ्.आय.’सारखे लोक आक्रमक स्थितीमध्ये असतात. आपण सकाळी उठून गुरुवंदना आणि नामस्मरण करतो. त्यामुळे कोणत्याही विषयाची भीती वाटत नाही. एक दिवस मला ठार करण्यासाठी माझ्यावर गोळीबार करण्यात आला. बंदुकीची गोळी माझ्या हृदयाच्या अर्धा फूट अंतरावरून निघून गेली होती. ती गोळी मला लागणार होती; पण प.पू. गुरुदेव डॉ. आठवले आणि भगवान कृष्ण यांच्या कृपेने ती गोळी मला लागली नाही. गुरु आपल्या समवेत असल्याने जगातील अशी कोणती शक्ती नाही, जी आपल्याला थांबवू शकेल. मी जिवंत दिसत आहे, हेच आपल्यासमोर साक्षात् ईश्वरी कृपेचे एक उदाहरण आहे.

– अधिवक्ता कृष्णमूर्ती पी.

४. बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचा खटला नि:शुल्क लढण्याची सिद्धता

त्यांनी खटला सोडल्यानंतर ३-४ मासापर्यंत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना दुसरा अधिवक्ता मिळाला नाही. वर्ष २०२१ च्या डिसेंबरमध्ये ते मंगळुरू येथून माझ्याकडे आले आणि हा खटला चालवण्याची विनंती केली. हा खटला कुणाच्या विरोधात लढवावा लागणार आहे, याची कल्पनाही त्यांनी दिली. मी हा खटला आनंदाने आणि तोही निःशुल्क स्वीकारला.

माझे गाव मडिकेरी. येथून मैैसूरूला जाण्यासाठी चारचाकी वाहनाने अडीच घंटे लागतात. मी मैसुरूला जाऊन वकीलपत्र प्रविष्ट केले. काही दिवसांनी या प्रकरणाची सुनावणी होती. तेव्हा माझ्या साहाय्यासाठी बजरंग दलाचे २-३ कार्यकर्ते स्वत:हून आले. न्यायालयात ‘पी.एफ्.आय.’चे २० हून अधिक गुंड आधीच पोचले होते. न्यायाधिशांना आधीच शेट्टीविषयी पूर्वग्रह असल्याचे लक्षात आले. कारागृहाच्या आत हत्या झाली, म्हणजे ज्याच्यावर आरोप आहे, त्यानेच हे कृत्य केले असेल, असे त्यांच्या देहबोलीवरून स्पष्ट दिसत होते. मी एका साक्षीदाराची उलट तपासणी घेतली आणि प्रकरण फिरले. त्यानंतर न्यायाधीशही तटस्थ झाले. या प्रकरणात थोडेसे लक्ष घालूनच कारवाई करावी लागेल, असे त्यांच्या लक्षात आले.

५. ‘पी.एफ्.आय.’च्या लोकांकडून न्यायालयाच्या आवारात ध्वनीचित्रीकरण

त्याच दिवशी जेवणाच्या वेळी ‘पी.एफ्.आय.’चे काही लोक माझी छायाचित्रे काढत होते आणि ध्वनीचित्रफीत बनवत होते. त्यांना साहाय्य करणारा अधिवक्ता अश्रफ अग्नानी हा समोरच बसला होता. तो पुत्तूरमधील ‘फ्रीडम कम्युनिटी सभागृहा’चा विश्वस्त आहे. या सभागृहात ‘पी.एफ्.आय.’च्या लोकांना प्रशिक्षण दिले जाते. जेवणाची वेळ झाल्यावर आम्ही बाहेर पडलो, तेव्हाही ते लोक माझे छायाचित्रांसह ध्वनीचित्रीकरण करत होते. हे सर्व न्यायालयासमोर चालू होते. मी त्यांना बोलावले आणि सांगितले, ‘‘माझे वकीलपत्र या धारिकेत आहे. माझा भ्रमणभाष क्रमांक आणि पत्ताही यात आहे. ते सर्व तुम्ही नोंद करून घ्या आणि माझा भ्रमणभाष क्रमांक हाच ‘व्हॉट्सॲप’ क्रमांकही आहे. त्यावर माझा चांगला ‘डिस्प्ले पिक्चर’ (डिपी – ओळखीसाठी ठेवण्यात येणारे छायाचित्र) आहे. तुम्ही हे गुपचूपपणे माझे छायाचित्र का काढत आहात ?’’

याविषयी न्यायाधिशांना समजले, तेव्हा त्यांनी माझे संरक्षण करण्याचा आदेश दिला आहे, तरीही माझ्यावर आक्रमण झाले. मी ‘पी.एफ्.आय.’ कार्यकर्त्याच्या हत्या प्रकरणाच्या प्रत्येक सुनावणीला न्यायालयात जात होतो. यासमवेतच कथित पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या निरपराध हिंदुत्वनिष्ठांचा खटला लढण्यासाठीही मी ५ घंटे चारचाकी चालवून बेंगळुरूला जातो.

सुदर्शनचक्रधारी श्रीकृष्ण पाठीशी असल्याने भीती कशाची ?

पोलीस उपअधीक्षक म्हणाले, ‘‘आपण एवढा राग का धरता ? ’’ मी म्हणालो, ‘‘मी जन्मतःच रागीट आहे. आता नामस्मरण करत असल्याने थोडा राग न्यून झाला आहे. मी नामजप करत नसतो, तर आणखी हाणामारी होऊ शकली असती. तुमची इच्छा असेल, तर तुम्हीही साधना शिकायला या.’’

आपण स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया करत असतो, तसेच आपल्या पाठीशी हातात सुदर्शनचक्र धरलेला भगवान श्रीकृष्ण आहे. त्यामुळे जगात असा कोणताही माणूस नाही, जो या युद्धात आपल्यासमोर टिकू शकेल. प्रत्येकाने साधना केली पाहिजे. आपण मनातल्या मनात नाम घेऊ शकतो. नामस्मरणामुळे आपल्याला दैवी बळ मिळते. या दैवी बळाच्या जोरावरच आपण नकारात्मक विचारांच्या लोकांशी लढू शकतो आणि या दैवी बळावरच आपण ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करू शकतो.

– अधिवक्ता कृष्णमूर्ती पी.

६. ‘इन कॅमेरा’ (बंद दाराआड ध्वनीचित्रीकरण करत खटला लढण्याची) सुनावणी करण्याची ‘एस्.आय.टी.’ची मागणी

पुढे न्यायालयासमोर सुनावणी चालू झाली, तेव्हा एकेका साक्षीदाराला आम्ही दोन्ही बाजूंनी फटकारले. त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी ही ‘इन कॅमेरा’ व्हावी, असा अर्ज ‘एस्.आय.टी.’ने न्यायालयात सादर केला. ‘न्यायालयात खटला उघडपणे चालवला गेला, तर अडचणीचे होईल’, असे ‘एस्.आय.टी.’ला वाटून त्यांनी त्या अनुषंगाने अर्ज केला होता, असे वाटते. खरेतर असे करणे, हे ‘एस्.आय.टी.’च्या अधिकार्‍यांना सामान्य बुद्धीही (कॉमन सेन्स) नसल्याचेच द्योतक होते. त्यामुळेच त्यांनी ‘इन कॅमेरा’ सुनावणी घेण्याचा अर्ज केला होता.

७. धर्मसभेचा प्रचार करणार्‍या ५ रिक्शा पोलिसांच्या तावडीतून सोडवल्या !

कर्नाटकमधील कुशालनगरमध्ये हिंदु जनजागृती समितीने एका ‘हिंदु राष्ट्र’ सभेचे आयोजन केले होते. तेथे ५ रिक्शांच्या माध्यमातून ध्वनीक्षेपकावरून प्रचार करण्यात येत होता. त्या विरोधात ‘पी.एफ्.आय.’च्या लोकांनी तक्रार केली. त्यानंतर पोलीस उपअधीक्षकांनी त्या सर्व रिक्शा कह्यात घेतल्या. धर्मसभा सायंकाळी ६ वाजता होती. त्या सभेचे मलाही निमंत्रण मिळाले होते. मी सभेला निघत असतांनाच मला दूरभाष आला की, सभेचा प्रसार करणार्‍या रिक्शा जप्त करण्यात आल्या असून चालकांना अटक करण्याचा विचार चालू आहे. त्यानंतर मी थेट पोलीस उपअधीक्षकांच्या कार्यालयात गेलो. तेथे कोणताही ‘पी.एफ्.आय.’चा कार्यकर्ता नव्हता.

हे ही वाचा → हिंदुत्व आणि धर्म यांचे कार्य करण्याची तीव्र तळमळ असलेले मडिकेरी (कर्नाटक) येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता कृष्णमूर्ती पी. !

मी पोलीस उपअधीक्षकांना विचारले, ‘‘तक्रार करणारा कुठे आहे ?, कुणाला समस्या आहे ?, तक्रार करणार्‍याची तक्रार दाखवा. मीही थोडा कायद्याचा अभ्यास केला आहे. ‘हिंदु राष्ट्र असंवैधानिक आहे’, हे घटनेच्या कोणत्या प्रकरणात (‘सेक्शन’मध्ये) येते ?’’ ते म्हणाले, ‘‘एक काम करा, आम्ही उद्या रिक्शांना सोडून देतो.’’ मी म्हणालो, ‘‘तुम्हाला त्यांना सोडून देण्याची आवश्यकताच नाही. आम्हीच त्यांना न्यायालयातून सोडवून घेतो.’’ मी रिक्शाचालकांना विचारले, ‘‘प्रतिदिन तुम्ही किती वेळ रिक्शा फिरवता आणि त्यातून तुम्हाला किती कमाई होते ?’’ त्यांनी सांगितले, ‘‘५०० रुपये होतात !’’ मी म्हटले, ‘‘ठीक आहे. मी तुम्हाला प्रत्येक दिवसाचे ५०० रुपये देतो; परंतु काहीही करून तुम्ही यांचे (पोलीस उपअधीक्षकांचे) पाय धरू नका आणि गयावया करू नका.’’

यानंतर मी साधकांकडे २ कोरे कागद मागितले. तेव्हा पोलीस उपअधीक्षक म्हणाले, ‘‘कागद कशाला ?’’ मी म्हटले ,‘‘मी एक तक्रार लिहिणार आहे. त्यात या शहरात जेवढ्या मशिदी आहेत आणि तेथे अजानसाठी जेवढे अनधिकृत ध्वनीक्षेपक यंत्रणा लावल्या आहेत, त्यांनाही या रिक्शासह जप्त करावे; कारण त्यांनाही अनुमती नाही. रिक्शा तुमच्याकडे राहू द्या, मी त्यांना न्यायालयातून सोडवून घेतो. मला ही तक्रार द्यायची आहे.’’ त्यानंतर पोलिसांनी २ मिनिटांच्या आत सर्व रिक्शा सोडून दिल्या. अशा प्रकारे आपणही ठाम रहायला पाहिजे.

– अधिवक्ता कृष्णमूर्ती पी., कर्नाटक उच्च न्यायालय, कर्नाटक.