दोडामार्गमध्ये गायरान भूमीवर काळ्या दगडाच्या खाणीला ग्रामस्थांचा विरोध !

प्रसंगी आंदोलन करण्याची चेतावणी

प्रतिकात्मक चित्र

दोडामार्ग – तालुक्यातील गायरान भूमीवर प्रस्तावित असलेल्या काळ्या दगडाच्या खाणीला आणि दगडांपासून रेती निर्मिती प्रकल्पाला दोडामार्ग तालुका सरपंच संघटनेने तीव्र विरोध दर्शवला आहे. या प्रकल्पामुळे पर्यावरणाची मोठी हानी होण्याची भीती व्यक्त करत ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन हा प्रकल्प तातडीने रहित करावा अन्यथा प्रसंगी आंदोलन करू, अशी चेतावणी दोडामार्ग तालुका सरपंच संघटनेने दिली आहे.

दोडामार्ग तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष, माटणे येथील शिवसेना विभागप्रमुख, तसेच झरेबांबर ग्रामपंचायतीचे सरपंच अनिल शेटकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही भूमिका स्पष्ट केली आहे.

या पत्रकात शेटकर म्हणतात …

१.  गोवा राज्यातील एका व्यक्तीने गायरान भूमीवर खाण प्रकल्प उभारण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज केला आहे. त्यानुसार महसूल विभागाचे अधिकारी संबंधित भूमीची पहाणी करण्यासाठी आले असता ग्रामस्थांनी एकत्र येऊन या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शवला.

२. आम्हाला विकास हवा; पण चांगले प्रकल्प हवे आहेत. स्थानिकांना रोजगारही मिळावा, अशी आमची भूमिका आहे; मात्र पर्यावरणाचा र्‍हास करणारा आणि गावाच्या भवितव्याला धोका निर्माण करणारा कोणताही प्रकल्प आम्हाला मान्य नाही.

३. गायरान भूमी ही गावाची सामूहिक संपत्ती असून तिचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. स्थानिकांच्या इच्छेविरुद्ध हा प्रकल्प लादण्याचा प्रयत्न झाल्यास सर्व ग्रामस्थांसह लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करू.

४. स्थानिक नागरिकांच्या भावना आणि पर्यावरणीय परिणामांचा गांभीर्याने विचार करून गायरान भूमीवरील प्रस्तावित खाण प्रकल्प रहित करावा. पर्यावरणाचे संरक्षण आणि गावाच्या हिताला प्राधान्य देऊनच विकासाचे निर्णय घेण्यात यावेत.