राज्यपालांची ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालया’ला भेट !

मुंबई – राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी मुंबईतील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालयाला भेट दिली. या वेळी त्यांनी विविध कलाशैलींमधील ऐतिहासिक आणि कलात्मक वस्तूंच्या संग्रहाचे अवलोकन केले. संग्रहालयाचे महासंचालक सव्यसाची मुखर्जी यांनी राज्यपालांना संग्रहालयाचा इतिहास, वाटचाल आणि कार्य यांची माहिती दिली. संग्रहालयातील अन्य अभिरक्षकांसह (क्युरेटर्स) प्राचीन भारत आणि विश्व दालन, शिल्पकला दालन, हिमालयीन कला दालन, तसेच लघुचित्रे आणि वस्त्र संग्रहालय दाखवले. या वेळी राज्यपालांनी संग्रहालयाच्या कार्याचे कौतुक केले अन् देशातील नामशेष होत चाललेल्या पारंपरिक कलांचे जतन करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

संग्रहालयाच्या जनजागृती कार्यक्रमांद्वारे सर्वसामान्य नागरिक आणि विद्यार्थी यांच्यात देशाच्या समृद्ध वारशाविषयी जागरूकता आणि संवेदनशीलता निर्माण करण्याचे कार्य करत असल्याचे मुखर्जी यांनी सांगितले.