सरकारने देयके संमत न केल्याने प्राणी कल्याण संस्थेकडून भटक्या कुत्र्यांचा नसबंदी कार्यक्रम बंद

सरकारकडे ७० लक्ष रुपयांची देयके संमतीसाठी प्रलंबित

प्रतिकात्मक चित्र

पणजी, १८ जुलै (वार्ता.) – गोवा सरकारने १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीतील भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी केलेल्या खर्चाची ७० लक्ष रुपयांची देयके संमत न केल्याने ‘पणजी प्राणी कल्याण सोसायटी (पणजी एनिमल वेलफेअर सोसायटी – ‘पॉस’) या संघटनेने भटक्या कुत्र्यांचा नसबंदी कार्यक्रम गेल्या १० दिवसांपासून पूर्णपणे बंद केला आहे. ‘पॉस’ संघटनेच्या अध्यक्षा श्वेता सरदेसाई यांनी माध्यमांशी बोलतांना ही माहिती दिली.

त्या पुढे म्हणाल्या, ‘‘सर्वाेच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नी एका याचिकेवर निवाडा देतांना देशभरात भटक्या कुत्र्यांची नसबंदी वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे नसबंदी कार्यक्रम सध्या चालू असलेल्या गतीपेक्षा दुप्पट गतीने चालणे आवश्यक होते; मात्र निधीच्या अभावी नसबंदी कार्यक्रम चालू ठेवणे आम्हाला शक्य झालेले नाही. गोव्यात भटक्या कुत्र्यांची नसबंदी करणार्‍या अनेक संघटना आहेत. पणजी परिसरात ‘पॉस’ संघटना हे कार्य करते. ‘पॉस’ संघटना प्रतिमास सुमारे ४०० भटक्या कुंत्र्यांची नसबंदी करते आणि यासाठी सरकार प्रत्येक कुत्र्यामागे १ सहस्र ८०० रुपये देत असते. सरकारकडून नसबंदी केल्याचे ७० लक्ष रुपये येणे आहे. यासंबंधीची धारिका पणजी महानगरपालिका आणि पशूसंवर्धन खाते यांनी संमत केलेली आहे; मात्र सरकारच्या वित्त खात्याकडे यासंबंधीची धारिका गेले अनुमाने ८ आठवडे प्रलंबित आहे. सरकारने तातडीने प्रलंबित देयकांची रक्कम द्यावी.’’