हिंदुत्व आणि धर्म यांचे कार्य करण्याची तीव्र तळमळ असलेले मडिकेरी (कर्नाटक) येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता कृष्णमूर्ती पी. !

‘मडिकेरी, कर्नाटक येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता कृष्णमूर्ती पी. (वय ४७ वर्षे) हे देवीभक्त असून मागील १४ वर्षांपासून साधना करत आहेत. ते वर्ष २०२१ पासून २ वर्षे विश्व हिंदु परिषदेच्या कोडगु जिल्हा अध्यक्ष म्हणून कार्यरत होते आणि नंतर दायित्वातून मुक्त झाले. अनेक हिंदु कार्यकर्त्यांना नाहक अडकवलेल्या विविध कायदेशीर प्रकरणांमध्ये ते सक्रीयपणे सहभागी आहेत. हिंदु धर्म आणि हिंदुत्व यांच्या कार्याविषयी त्यांना पुष्कळ तळमळ आहे. ७ वर्षांपूर्वी ते सनातन संस्थेच्या संपर्कात आले. त्यांची सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर पुष्कळ श्रद्धा आहे. त्यांची आध्यात्मिक पातळी ६४ टक्के आहे.

अधिवक्ता कृष्णमूर्ती पी.

विशेष सदर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यासाठी मावळे आणि शिलेदार यांनी केलेला त्याग सर्वोच्च आहे, त्याप्रमाणे आजही अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिक धर्म-राष्ट्र यांच्या रक्षणासाठी ‘शिलेदार’ म्हणून कार्य करत आहेत. त्यांची आणि त्यांच्या हिंदु धर्मरक्षणाच्या संघर्षाची माहिती करून देणार्‍या ‘हिंदुत्वाचे शिलेदार’ या सदराद्वारे इतरांनाही प्रेरणा मिळेल. या उदाहरणांतून आपल्या मनातील चिंता दूर होऊन उत्साह निर्माण होईल ! – संपादक

 १. अधिवक्ता कृष्णमूर्ती यांना हिंदुत्वाचे कार्य करण्याची मिळालेली प्रेरणा

मी लहानपणापासून वडीलधार्‍यांकडून रामायण, महाभारताच्या कथा ऐकत होतो. मला वाचायला आणि लिहायला यायला लागल्यानंतर महापुरुषांच्या, स्वातंत्र्यसैनिकांच्या कथा अन् गोष्टी वगैरे वाचत होतो. त्याचप्रमाणे बालपणापासूनच माझा हिंदुत्वाकडे, राष्ट्र- धर्माकडे ओढा होता. बहुतेक ती भगवंताची इच्छा आणि गुरुंची कृपा असल्यामुळे मला हिंदुत्वाच्या कार्याकडे खेचून आणले आहे.

२. अधिवक्ता कृष्णमूर्ती पी. यांचे हिंदुत्वाचे निरपेक्ष कार्य

अ. न्यायालयात हिंदुत्वनिष्ठांच्या बाजूने खटला चालवून तो जिंकणे : हिंदुत्वाच्या कार्यात अधिवक्ता कृष्णमूर्ती यांचा सक्रीय सहभाग असतो. एकदा मडिकेरी येथे टिपू सुलतान जयंतीच्या वेळी दंगल झाली होती. या प्रकरणात अनेक हिंदूंना गोवण्यात आले होते. हिंदुत्वनिष्ठांच्या बाजूने हा खटला अधिवक्ता कृष्णमूर्ती यांनी न्यायालयात चालवला आणि जिंकला. अशा प्रकारे हिंदुत्वनिष्ठांना कोणतीही अडचण आली की, ते तत्परतेने त्यांना साहाय्य करतात.

आ. हिंदुत्वाच्या कार्यासाठी त्याग करण्याची वृत्ती : हिंदुत्वाचे कार्य करतांना त्यांना वेगवेगळ्या खटल्यांसाठी ‘मडिकेरी ते बेंगळुरू’ किंवा अन्य ठिकाणी चारचाकी गाडीने जावे लागते. तेव्हा ते कुणाकडूनही प्रवासासाठी लागणारा व्यय (खर्च) घेत नाहीत. ते स्वतःच हा त्याग करतात.

अनेक वेळा ते गरजू हिंदु कार्यकर्त्यांना धान्य अणि वस्तू त्यांच्या घरी जाऊन देतात. एका गोशाळेच्या प्रमुखांनी अधिवक्ता कृष्णमूर्ती यांच्याकडे साहाय्य मागितले होते. तेव्हा त्यांनी त्वरित साहाय्य केले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने दोनदा मृत्यूच्या संकटातून वाचलो !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. एका अभियोगाची सुनावणी झाल्यावर मी माझ्या सहकार्‍यासह बेंगळुरू येथे जात होतो. तेव्हा एकाएकी मागून एका ट्रकने येऊन गाडीला जोरदार धडक दिली. यात आमच्या गाडीचा डावा भाग कापला गेला. हा अपघात इतका मोठा होता की, गाडी पाहिल्यावर कुणालाही असे वाटले असते की, जो कुणी व्यक्ती या गाडीत होता, तो जिवंत वाचला असेल; परंतु सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे मी आणि माझा सहकारी सुरक्षित होतो. त्यामुळे आपण सतत भगवंताच्या सान्निध्यात रहायला पाहिजे, हे मी अनुभवले.

२. कथित पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणाच्या खटल्यातही मी संशयित आरोपींच्या बाजूने लढत आहे. वर्ष २०२३ मध्ये माझ्यावर काही अज्ञातांनी गोळीबार केला. आरोपींनी माझ्या इतक्या जवळून गोळी झाडली होती की, मी जिवंत रहाणे अशक्य होते. केवळ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच मी वाचलो.

– अधिवक्ता कृष्णमूर्ती

३. नम्र आणि अहंशून्य स्थितीत राहून न्यायालयीन कामकाज करणारे अधिवक्ता कृष्णमूर्ती !

अ. एखाद्या अशिलाने अधिवक्ता कृष्णमूर्ती यांच्याकडे खटला सोपवला की, त्याला त्याविषयी विचार करावा लागत नाही. ते स्वयंप्रेरणेने सर्व कृती करतात आणि आत्मीयतेने खटला चालवतात.

आ. अधिवक्ता कृष्णमूर्ती यांना कायदा आणि धर्मकार्य यांविषयी चांगला अनुभव आहे, तरी त्यांच्या वर्तनातून ‘अधिकारवाणी किंवा मला अधिक समजते’, असे कधी जाणवत नाही. ते सर्वांशी नम्रतेने बोलतात.

ते समवेत असणार्‍या कनिष्ठ अधिवक्त्यांचे मतही नम्रपणे जाणून घेतात. त्यांच्या अशा वागण्यामुळे अधिवक्त्यांना उत्साह जाणवून प्रेरणा मिळते आणि त्यांचा आधारही वाटतो. ते जेव्हा न्यायालयात प्रतिवाद करतात, तेव्हा तेथील वातावरण पूर्ण निःशब्द झालेले असते. न्यायाधीश त्यांचे बोलणे शांतपणे ऐकतात आणि त्यांच्याशी आदराने वागतात. न्यायालयातील इतर व्यक्तीही त्यांच्याशी आदरपूर्वक वागतात.

राष्ट्र आणि धर्म प्रेमी अधिवक्त्यांसाठी संदेश !

राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या प्रकरणांमध्ये अधिवक्त्यांनी धाडसी अन् निर्णयात्मक कृती ‘साधक’ किंवा ‘हिंदु’ अधिवक्ता म्हणून करणे आवश्यक !

अधिवक्ता कृष्णमूर्ती पी.

आपण स्वार्थीपणा सोडून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सर्व हिंदु संघटनांना एकत्र करून उद्देश साध्य करण्यासाठी झगडले पाहिजे. हे करण्यासाठी आपण न्याययंत्रणा समजून घेऊन त्याचा परिणामकारकरित्या उपयोग केला पाहिजे. राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या प्रकरणांमध्ये अधिवक्त्यांनी धाडसी अन् निर्णयात्मक कृती केली पाहिजे.

आपली देवावर इतकी श्रद्धा पाहिजे की,

जरी आपल्यावर कोणते संकट आले, तरी देव आपल्याला साहाय्य करणार आहे. आपला मालक भगवान आहे. देवाच्या भक्ताला चिंता करण्याची आवश्यकता नाही. सतत नामजप करत न्यायालयीन कामे केली पाहिजेत. देवाचा नामजप करत कार्य केल्याने भगवान आपल्याला शक्ती देतो. यामुळे भगवान सतत आपल्यासह असल्याची अनुभूती येते. कायद्याच्या अभ्यासासह साधना करत न्यायालयीन प्रकरणे लढल्यास कार्याला गती येऊन यश मिळते. देवाला प्रार्थना करूनच घराबाहेर पडायला पाहिजे. साधना केल्याने ‘भगवान सतत आपल्यासमवेत आहे’, याची अनुभूती येईल, ‘साधक अधिवक्ता’, ‘हिंदु अधिवक्ता’ होऊन आपल्याला न्यायालयीन लढाई लढायची आहे.

– अधिवक्ता कृष्णमूर्ती

४. ‘सर्व काही ईश्वरेच्छेने होते’, या भावात असणारे अधिवक्ता कृष्णमूर्ती पी. !

अधिवक्ता कृष्णमूर्ती हे प्रत्येक प्रसंगात शांत आणि सकारात्मक असतात. एकदा एका खटल्याच्या सुनावणीसाठी ते मडिकेरी येथून २७५ कि.मी.चा प्रवास करून बेंगळुरूला गेले होते; पण न्यायालयात न्यायाधीश नसल्याने सुनावणी रहित झाली. त्या वेळी त्यांना कुठलीच प्रतिक्रिया आली नाही. त्यांच्या समवेत असलेल्या अधिवक्त्यांनी विचारले, ‘‘तुम्हाला काहीच वाटले नाही का ?’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘सर्व काही ईश्वरेच्छेने होते.’’ अशा प्रकारे कोणतेही प्रसंग आले, तरी ते ती परिस्थिती स्वीकारतात. घरातही काही प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्यास ते शांत आणि सकारात्मक असतात.

Spiritual Journeys of Legal Support for Hindu Activists | Adv. Krishnamoorthy P

५. साधना करणारे आणि संतांप्रती भाव असलेले अधिवक्ता कृष्णमूर्ती !

अ. अधिवक्ता कृष्णमूर्ती हे प्रतिदिन नामजप आणि प्रार्थना करतात. ते कुठेही असले, तरी ‘त्यांचा नामजप सतत चालू असतो’, असे ते सांगतात. मी वाहनाने प्रवास करत असतांना किंवा न्यायालयातही नामजप करतो.

आ. अधिवक्ता कृष्णमूर्ती नेहमी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी बोलतात. ‘गुरुदेव’ हा शब्द नुसता ऐकल्यावरच त्यांचा भाव जागृत होतो. त्या वेळी भावजागृत स्थितीमुळे त्यांना बोलताही येत नाही. ‘माझ्याकडून केली जाणारी प्रत्येक कृती मी करत नसून गुरुदेवच करत असतात’, असे ते नेहमी सांगतात.

इ. सनातन संस्थेचे पू. रमानंद गौडा यांच्याशी त्यांची भेट झाली. तेव्हा त्यांच्याशी बोलतांना अधिवक्ता कृष्णमूर्ती यांची २० मिनिटे सतत भावजागृती होत होती. त्यामुळे त्यांना बोलता येत नव्हते.

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार अधिवक्ता आणि धर्मप्रेमी यांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

🪷हिंदुत्वाचे शिलेदार या सदरामध्ये प्रसिद्ध होणाऱ्या मान्यवरांची माहिती वाचण्यासाठी इथे क्लिक करा !🪷