अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी तरुणाला पोलीस कोठडी

प्रतिकात्मक चित्र

कणकवली – १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी अभिषेक व्यंकटेश वडार (वय २० वर्षे) याला १७ जुलैला जिल्‍हा न्यायालयाने २० जुलैपर्यंत पोलीस कोठडी बजावली आहे.

११ जुलै या दिवशी पीडित अल्पवयीन मुलीचे तिच्या आईशी किरकोळ कारणावरून भांडण झाले. त्याच दिवशी दुपारनंतर पीडित मुलगी घरातून निघून गेली. शोधाशोध करूनही ती सापडली नाही; म्हणून १४ जुलै या दिवशी पीडित मुलीच्या नातेवाइकांनी मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार कणकवली पोलीस ठाण्यात केली. त्यानंतर चौकशी करत असतांना पोलिसांना ही मुलगी कणकवली, परबवाडी परिसरात असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी १६ जुलै या दिवशी अभिषेक वडार याच्या परबवाडी येथील घरी जाऊन चौकशी केली असता ती अल्पवयीन मुलगी तेथे आढळून आली. तेव्हा वडार आणि मुलीची पूर्वीपासून ओळख असल्याचे समजले. मुलीने आईशी भांडण झाल्याचे अभिषेक याला सांगितल्यानंतर त्याने पीडित मुलीला परबवाडी येथे घरी आणले.  पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे ठाऊक असूनही १२ जुलै या दिवशी अभिषेकने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. पीडित मुलीची वैद्यकीय पडताळणी केल्यानंतर संशयित आरोपी अभिषेक वडार याला पोलिसांनी अटक करून न्यायालयात उपस्थित केले.