गुंतवणुकीस अनुकूल असलेल्या राज्यांमध्ये गोवा ४ थ्या क्रमांकावर

• गुजरात प्रथम, तर महाराष्ट्र दुसर्‍या स्थानावर   • नीती आयोगाचा अहवाल

पणजी, १८ जुलै (वार्ता.) – नीती आयोगाने घोषित केलेल्या गुंतवणूक स्नेही निर्देशांक अहवालात गोवा ४ थ्या स्थानावर आहे. २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेश यांची विविध धोरणे, पायाभूत सुविधा, प्रशासन आणि गुंतवणुकीस पोषक वातावरण या निकषांच्या आधारे करण्यात आलेल्या मूल्यमापनामध्ये गोवा राज्याला ५३.१ गुण मिळाले आहेत. या क्रमवारीत गुजरात (५६.६ गुण) प्रथम, महाराष्ट्र (५३.७ गुण) द्वितीय, तमिळनाडू (५३.३ गुण) तृतीय आणि ओडिशा (५२.४ गुण) ५ व्या क्रमांकावर आहे.

गोव्याने नियमन सुलभता या निकषात ७१ टक्के, संस्थात्मक वातावरणात ६६ टक्के, आर्थिक सुदृढतेमध्ये ६१ टक्के, तर पायाभूत सुविधा आणि संसाधने या निकषांमध्ये प्रत्येकी ५६ टक्के गुण मिळवले आहेत. याखेरीज व्यावसायिक वातावरण (४२ टक्के) आणि सरकारी धोरण (२६ टक्के) या निकषांमध्ये गोव्याची कामगिरी राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक चांगली आहे, असे अहवालात म्हटले आहे. या अहवालानुसार गोव्यात दर्जेदार पायाभूत सुविधा, मुबलक संसाधने आणि मोठ्या क्षमतेचे विमानतळ असल्याने गुंतवणूकदारांसाठी गोवा राज्य आकर्षक ठरत आहे. त्याचप्रमाणे कौशल्य विकासासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात केलेले प्रावधान कुशल मनुष्यबळ सिद्ध करण्यास पूरक ठरत आहे, असे म्हटले आहे.