गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता ?’ या पुस्तकावर तात्काळ बंदी घाला !  – हिंदुत्वनिष्ठांची आंदोलनाद्वारे मागणी

छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख न हटवणारे प्रकाशक आणि संबंधित संस्था यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे नोंद करा !

कोल्हापूर येथील आंदोलनात सहभागी हिंदुत्वनिष्ठ

कोल्हापूर – गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता ?’ हे पुस्तक छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करून महाराजांचा अवमान तर करतेच, त्याचप्रमाणे पुस्तकात अनेक घटना या इतिहासाचे विकृतीकरण करून खोटा इतिहास बिंबवण्यासाठी लिहिल्या गेल्या आहेत. या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रखर, जाज्वल्य, दैदीप्यमान आणि पराक्रमी इतिहास लोकांसमोर मांडण्याऐवजी खोटा इतिहास मांडण्यात आला आहे.

त्यामुळे गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता ?’ या पुस्तकावर तात्काळ बंदी घाला आणि संबंधित घटकांवर कठोर कायदेशीर कारवाई करा, या मागण्यांसाठी ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आंदोलन करण्यात आले.

आंदोलन झाल्यावर पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन देण्यात आले. निवेदन स्वीकारल्यावर शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक धीरजकुमार बच्चू यांनी ‘योग्य ती कार्यवाही करू’, असे सांगितले. या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे, भाजपचे श्री. महेश जाधव, ‘हिंदु एकता आंदोलना’चे शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, ‘शिवशाही फाऊंडेशन’चे संस्थापक श्री. सुनील सामंत, ‘आरोग्य भारती’च्या वैद्या अश्विनी माळकर आणि सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. रामभाऊ मेथे यांनी सूत्रसंचालन केले.

अप्पर पोलीस अधीक्षक धीरजकुमार बच्चू यांना निवेदन देताना हिंदुत्वनिष्ठ

उपस्थित मान्यवर – ‘महाराजा प्रतिष्ठान’चे संस्थापक श्री. निरंजन शिंदे, हिंदु महासभेचे उपाध्यक्ष श्री. विकास जाधव, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, मंदिर महासंघाचे श्री. अशोक गुरव आणि श्री. प्रसाद कुलकर्णी, हिंदु महासभा महिला आघाडीच्या शीलाताई माने, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. महेश चौगुले, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. रामभाऊ मेथे, हिंदुत्वनिष्ठ श्री. सुहास चव्हाण, श्री. शशी बीडकर, विश्व हिंदु परिषदेचे श्री. मनोहर चौनानी, ‘नमो नमो’चे जिल्हाध्यक्ष श्री. विक्रम जरग यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’चे प्रसिद्धीपत्रक –

शिवरायांच्या भवानी तलवारीचीसुद्धा अशीच अवहेलना केली आहे. पुस्तकात ‘भवानीदेवीने छत्रपती शिवाजी महाराज यांना तलवार दिलीच नाही’, असे लिखाण करण्यात आले आहे. हा प्रकार म्हणजे हिंदु अस्मितेचा पाया असलेल्या महापुरुषांचे ‘वैचारिक खच्चीकरण’ करण्याचा एक सुनियोजित कट आहे. यामुळे हिंदु समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी मोगलांच्या ५ पातशाह्या बुडवल्या आणि आक्रमक मोगलांना यमसदनी पाठवले. अनेक ठिकाणी मंदिरे आणि अन्नछत्रे उभारली. ते हिंदूंचे राजे झाले. असे असतांना ‘शिवाजी कोण होता ?’ या पुस्तकाद्वारे त्यांची पूर्णत: चुकीची प्रतिमा निर्माण केली गेली आहे. तरी ‘शिवाजी कोण होता ?’ या पुस्तकाची विक्री आणि वितरण यांवर तात्काळ बंदी घालण्यात यावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

या प्रसंगी करण्यात आलेल्या अन्य मागण्या

१. छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख न हटवणारे प्रकाशक आणि संबंधित संस्था यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २९९ – धार्मिक भावना दुखावणे आणि महापुरुषांचा अपमान करणे, तसेच कलम १९६ विविध गटांमध्ये तेढ निर्माण करून सामाजिक शांतता भंग करणे, या कलमांन्वये फौजदारी गुन्हे नोंद करण्यात यावेत.

२. महाराष्ट्र शासनाने इतिहासतज्ञांची एक उच्चस्तरीय समिती नेमून या पुस्तकातील प्रत्येक आक्षेपार्ह विधान आणि ऐतिहासिक संदर्भ यांचा अभ्यास करावा.

३. केवळ छापील पुस्तकेच नव्हे, तर ‘ॲमेझॉन’, ‘फ्लिपकार्ट’ यांसारख्या ‘ई-कॉमर्स साईट्स’ (विविध वस्तूंची ऑनलाईन विक्री करणारी संकेतस्थळे) आणि अन्य संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या या पुस्तकाच्या डिजिटल प्रती आणि ‘पीडीएफ् लिंक्स’ सायबर कायद्यांतर्गत ‘ब्लॉक’ कराव्यात.