कलियुगातील भगवान परशुरामाचे अंशावतार असलेले पू. भार्गवराम प्रभु (सनातनचे पहिले बालसंत, वय ९ वर्षे) यांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये !

उद्या, वैशाख शुक्ल दशमी (२६.४.२०२६) या दिवशी सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम भरत प्रभु यांचा ९ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त सुश्री मधुरा भोसले यांना मिळालेले सूक्ष्मातील ज्ञान येथे देत आहोत. 

(भाग १)

पू. भार्गवराम भरत प्रभु यांना ९ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

पू. भार्गवराम भरत प्रभु

१. पू. भार्गवराम हे कलियुगातील भगवान परशुरामाचे अंशावतार असणे

‘पू. भार्गवराम यांच्या जन्मानंतर त्यांच्यामध्ये भगवान परशुरामाचा एक दिव्यांश सामावला. त्यामुळे पू. भार्गवराम हे कलियुगातील भगवान परशुरामाचे अंशावतार आहेत. त्यांचा जन्म भारताच्या पवित्र ‘परशुरामभूमी’त झाला असून ‘त्यांना परशुरामाचे ‘भार्गवराम’, हे नाव प्राप्त होणे’, हे ईश्वरी नियोजन होते. पू. भार्गवराम यांच्यामध्ये भगवान परशुरामाचे ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज दोन्ही आहेत. त्यामुळे जेव्हा सूक्ष्म युद्ध चालू असते, तेव्हा ते क्षात्रतेजाच्या बळावर, म्हणजे सूक्ष्मातील शस्त्रे आणि अस्त्रे यांनी अनिष्ट शक्तींशी लढतात, तसेच ते ब्राह्मतेजाच्या बळावर साधक आणि समाजातील व्यक्ती यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्या साधनेला गती देतात.

२. पू. भार्गवराम प्रभु यांचा विविध युगांतील साधनाप्रवास !

३. पू. भार्गवराम प्रभु यांची विविध गुणवैशिष्ट्ये !

(चित्रावर क्लिक करा)

३ अ. पू. भार्गवराम यांचे मन मानस सरोवराप्रमाणे अत्यंत शुद्ध आणि निर्मळ आहे.

३ आ. चित्तवृत्ती स्थिर असणे : पू. भार्गवराम यांच्या अंतरात श्रीविष्णूच्या परशुरामरूपी अंशाचा वास असल्यामुळे त्यांचे चित्त, म्हणजेच अंतर्मन अत्यंत शांत आणि स्थिर आहे.

३ इ. बृहस्पतींप्रमाणे प्रगल्भ बुद्धी : पू. भार्गवराम यांच्या वयाच्या मानाने त्यांची बुद्धी अत्यंत तीक्ष्ण आणि देवगुरु बृहस्पतींच्या बुद्धीप्रमाणे अत्यंत प्रगल्भ अन् मेधावी आहे.

उपनयन संस्कार सोहळ्यातील पू. भार्गवराम प्रभु यांची भावमुद्रा

३ ई. प्रीती आणि समष्टी भाव : पू. भार्गवराम यांच्यातील प्रीती आणि समष्टी भाव यांच्यामुळे ते केवळ मनुष्याशीच नव्हे, तर निसर्गातील पंचतत्त्वांशी चटकन जोडले जाऊन एकरूप होतात. त्यामुळे त्यांच्याविषयी केवळ मनुष्यालाच नव्हे, तर पशू-पक्ष्यांनाही पुष्कळ आत्मीयता आणि प्रीती जाणवते.

३ उ. साक्षीभाव : पू. भार्गवराम जरी शांत असले किंवा स्थुलातून एखाद्या लीलेत व्यस्त असले, तरी ते साक्षीभावाच्या दृष्टीने स्थूल आणि सूक्ष्म, अशा दोन्ही स्तरांवर घडणार्‍या अनेक घटना पहात असतात. यावरून त्यांच्यातील ‘साक्षीभाव’, या दुर्मिळ गुणाची अनुभूती येते.

३ ऊ. त्रिकालद्रष्टा : पू. भार्गवराम यांना केवळ वर्तमानकाळातीलच नव्हे, तर भूतकाळ आणि भविष्यकाळ यांच्याशी संबंधित घटनांचेही ज्ञान आहे. ते ‘त्रिकालद्रष्टा’ म्हणून पुढे नावलौकिक प्राप्त करतील.

३ ए. क्षमाशील आणि मुक्तीदाता : पू. भार्गवराम हे त्यांच्या संपर्कात येणार्‍या अनेक जिवांशी सूक्ष्मातून संभाषण करत असतात. काही जणांनी पू. भार्गवराम यांना मागील जन्मांत त्रास दिलेला आहे. पृथ्वीच्या वायूमंडलात भटकणार्‍या आणि मुक्तीसाठी तडफडणार्‍या भूत, प्रेत, पिशाच इत्यादींसह पशू-पक्ष्यांच्या रूपातील अनेक पापी जिवांना पू. भार्गवराम क्षमादान देतात अन् त्यांना योग्य प्रायश्चित्त घेण्यास सांगतात, तसेच ज्यांच्या मुक्तीची वेळ जवळ आलेली आहे, त्यांना मुक्तीही देतात.

सुश्री (कु.) मधुरा भोसले

३ ऐ. परम उद्धारक : पू. भार्गवराम अनेक जिवांना स्थूल आणि सूक्ष्म, अशा दोन्ही स्तरांवर मार्गदर्शन करून अन् दिव्य सत्संग देऊन साधनेचा मार्ग दाखवतात अन् त्यांचा उद्धार करतात.

३ ओ. मनात असत्य आणि अधर्म यांविषयी चीड असणे : पू. भार्गवराम यांच्या मनात असत्य आणि अधर्म यांच्याविषयी पुष्कळ चीड आहे. त्यामुळे ते भविष्यात पृथ्वीवर रामराज्यरूपी धर्मराज्याची स्थापना करण्यासाठी असत्य आणि अधर्म यांच्या विरोधात कणखरपणे उभे राहून यशस्वी लढा देणार आहेत.

३ औ. लढाऊ वृत्ती आणि युद्धकौशल्य : भगवान परशुरामाचा अंश असल्यामुळे पू. भार्गवराम यांच्यात लढाऊ वृत्ती आहे, तसेच त्यांना साक्षात् परशुरामच सूक्ष्मातून लढण्यासाठी मार्गदर्शन करत असल्याने त्यांच्यामध्ये अधर्माशी लढण्याचे अलौकिक युद्धकौशल्य आहे. त्यामुळे त्यांना श्रीमन्नारायणाच्या हातातील सुदर्शनचक्र, शारंग धनुष्यबाण, कौमुदी गदा आणि परशुरामाच्या हातातील परशु ही शस्त्रे प्रिय आहेत. ‘लढाऊ वृत्ती आणि युद्धकौशल्य’ या अवतारी गुणांच्या आधारे ते रामराज्य किंवा धर्मराज्य यांच्या मार्गातील समस्त विघ्नांचा निःपात करून धर्मसंस्थापनेचा मार्ग निष्कंटक करणार आहेत.

४. पू. भार्गवराम यांच्या संदर्भात साधकांसह समाजालाही अनुभूती येत असणे आणि पुढेही येणार असणे

पू. भार्गवराम यांच्यामध्ये त्यांच्या मागील जन्मांतील सर्व गुणवैशिष्ट्ये विद्यमान आहेत. काळाच्या आवश्यकतेनुसार त्यांच्यातील दिव्यता आणि विविध गुणवैशिष्ट्ये वेळोवेळी प्रगट होत आहेत अन् पुढेही होणार आहेत. त्यामुळे केवळ साधकच नव्हे, तर समाजातील विविध सात्त्विक लोकांनाही पू. भार्गवराम यांच्या संदर्भात अनेक प्रकारच्या दैवी अनुभूती येत आहेत आणि पुढेही येणार आहेत.’

(क्रमशः)

– सुश्री मधुरा भोसले (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.४.२०२६)

भाग २ वाचण्याकरिता येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/1034126.html

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक
  • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.