साधनेतील ‘स्वीकारणे’ या गुणाचे अनन्यसाधारण महत्त्व !

‘विशेष भक्तीसत्संग शृंखलेच्या अंतर्गत भक्तीसत्संगात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ या ‘स्वीकारणे’ या विषयावर मार्गदर्शन करत आहेत. या विषयाच्या संदर्भात सूक्ष्मातून मला मिळालेले ज्ञान येथे देत आहे.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

१. परिस्थिती स्वीकारल्याने मनोलय होण्यास साहाय्य होणे

१ अ. विविध कृती आणि त्यांमुळे होणारे मनोलयाचे प्रमाण

१ आ. परिस्थिती स्वीकारण्याच्या माध्यमातून जीव देवाच्या चरणी शरणागत होत असल्याने त्या वेळी इतर कृतींच्या तुलनेत त्याचा लवकर मनोलय होतो.

२. ‘स्वीकारणे’ या विषयावरील भक्तीसत्संगात वाईट शक्तींनी अधिक त्रास देण्याचा प्रयत्न करणे

२ अ. भक्तीसत्संगात अडचणी निर्माण करण्यासाठी वाईट शक्ती वापरत असलेल्या शक्तीचे प्रमाण

२ आ. वाईट शक्तींनी त्रास देण्याचे प्रमाण : भक्तीसत्संगातून साधकांना काळानुसार साधनेची योग्य दिशा दिली जाते. त्यामुळे प्रत्येक भक्तीसत्संगात अडचणी निर्माण करण्यासाठी वाईट शक्ती त्यांच्या शक्तीचा मोठा वाटा वापरतात. असे असले, तरीही जगत्पालक भगवान श्रीविष्णु भक्तीसत्संगाचे रक्षण करत असल्याने केवळ १/१० एवढ्या प्रमाणातच वाईट शक्तींना अडचणी निर्माण करता येतात.

२ इ. ‘स्वीकारणे’ या विषयावरील भक्तीसत्संगातून साधक थेट मनोलय करायला शिकत असल्याने वाईट शक्ती त्यांची अधिक शक्ती, विशेषतः मायावी शक्ती वापरून सत्संगात अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

श्री. निषाद देशमुख

३. ‘स्वीकारणे’ म्हणजे काळानुसार साधना करणे

३ अ. बोधप्रद कथा : प्राचीन काळात एका गावात एक आश्रम होता. त्यात एक मोठे सिद्ध पुरुष, म्हणजे संत रहात होते. त्या संतांना एका व्यक्तीने त्याच्या काही अडचणींविषयी सांगितले. तेव्हा त्या संतांनी त्या व्यक्तीला तिच्या अडचणी सुटेपर्यंत एका गुप्त मंत्राचा पाठ करायला सांगितला. त्यानुसार त्या व्यक्तीने केल्यावर तिच्या बर्‍याच अडचणी सुटल्या आणि तिची श्रद्धा वाढली. त्या व्यक्तीला अडचणी येत असल्याने तिने गुप्त मंत्राचे पाठ करणे चालू ठेवले. नंतर १० वर्षांनी त्या संपूर्ण गावात दुष्काळ पडला. त्या वेळी त्या सिद्ध पुरुषांनी संपूर्ण गावातील लोकांना एका मंत्राचा जप करायला सांगितला; पण तरीही दुष्काळ दूर होत नव्हता. या संदर्भात त्या सिद्ध पुरुषांनी त्यांच्या गुरूंना विचारल्यावर त्यांचे गुरु म्हणाले, ‘‘गावातील कुणीतरी त्या मंत्राचा जप करत नाही. त्यामुळे संपूर्ण गावाला त्रास होत आहे.’’

यानंतर त्या सिद्ध पुरुषांनी त्यांच्या शिष्यांना गावात पाठवून चौकशी केल्यावर १० वर्षांपूर्वी त्यांच्याकडे आलेली ती व्यक्ती मंत्राचा पाठ करत नसल्याचे त्यांना आढळले. या संदर्भात सिद्ध पुरुषांनी त्या व्यक्तीला विचारल्यावर त्या व्यक्तीने सांगितले, ‘‘१० वर्षांपूर्वी आपण मला सर्व अडचणी सुटण्यासाठी एक मंत्र दिला होता. तो मंत्र सामर्थ्यशाली होता. मग आताची अडचण सुटण्यासाठी मी तो मंत्र म्हणत असेन, तर त्यात चुकीचे काय ?’’ तेव्हा त्या व्यक्तीला समजावत ते सिद्ध पुरुष म्हणाले, ‘‘१० वर्षांपूर्वी तुम्हाला पित्ताचा त्रास झाला; म्हणून वैद्यांनी एखादे औषध सांगितले. तेच औषध तुम्ही १० वर्षांनंतर तुम्हाला अस्थिभंग झाल्यावर घेतले, तर त्याचा लाभ होईल का ? १० वर्षांपूर्वी तुम्हाला तुमची अडचण सुटण्यासाठी मी जप सांगितला होता आणि आता गावाची अडचण सुटण्यासाठी मीच उपाय सांगत आहे. तुमचा माझ्यावर विश्वास का नाही ?’’ तेव्हा ती व्यक्ती निरुत्तर झाली. त्या व्यक्तीने त्या सिद्ध पुरुषांची क्षमा मागितली आणि गावाची अडचण सुटण्यासाठी योग्य मंत्राचा जप केला. त्यामुळे संपूर्ण गाव दुष्काळमुक्त झाले.

३ आ. साधकांनी काळानुसार पालटलेले साधनेचे तत्त्व न स्वीकारल्यास त्यांच्यामुळे समष्टीला त्रास होत असणे : वरील कथेत सांगितल्यानुसार साधना करणारे अनेक जण संत किंवा गुरु यांनी १० ते १५ वर्षांपूर्वी त्या काळानुसार सांगितलेल्या तत्त्वावर अडून बसतात. त्यामुळे सर्वत्रच्या समष्टीला किंवा समष्टी कार्याला अडचण निर्माण होते. प्रत्यक्षात शिक्षण, नोकरी, तसेच जीवनातील इतर क्षेत्रांत व्यक्ती नवीन पालट स्वीकारत जाते आणि त्यामुळे तिची प्रगती होते. त्याचप्रमाणे साधनेतही प्रत्येक टप्प्याला ‘स्वीकारणे’ हे अत्यंत महत्त्वाचे आहे.

३ इ. साधकांनी काळानुसार पालट न स्वीकारता स्वतःच्या विचारसरणीवर अडून राहिल्यामुळे त्यांना गुरूंची अवज्ञा करण्याचे आणि समष्टी कार्यात अडथळे निर्माण करण्याचे पाप लागते.

३ ई. संत काळानुसार सांगत असलेले साधनेचे तत्त्व आणि त्यामागील कार्यकारणभाव जाणून घेऊन ते स्वीकारून अन् त्यानुसार प्रयत्न केल्याने साधकांची आध्यात्मिक उन्नती होईल.’

– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्ता साधक, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक : २८.५.२०२६ आणि वेळ : दुपारी ४.०१ (१ मिनिट))

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.