US Iran Talks : चर्चा निष्फळ – पुन्हा युद्धाच्या स्थितीची शक्यता !

अमेरिका-इराण संघर्ष

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स व इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई

नवी देहली – पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे अमेरिका आणि इराण यांच्यात २१ घंटे चाललेल्या चर्चेनंतर ती निष्फळ ठरली. या चर्चेतून अमेरिका आणि इराण यांच्यात कोणताही करार होऊ शकला नाही. यामुळे दोन्ही देशांचे प्रतिनिधी आपापल्या देशांत निघून गेले. या दोघांकडून आता यावरून वेगवेगळे दावे करत एकमेकांवर आरोप केले जात आहेत.

अमेरिकेने अवाजवी मागण्या केल्या ! – इराणचा दावा

घाना देशामधील इराणच्या दूतावासाने ‘एक्स’वर माहिती दिली की, इराणने अमेरिकेच्या मागण्यांना ‘मोठा नकार’ दिला आहे. अमेरिका केवळ चर्चेतून बाहेर पडण्यासाठी निमित्त शोधत होती आणि ज्या सवलती तिला युद्धाद्वारे मिळवता आल्या नाहीत त्या ती मागण्यांतून मिळवू पहात होती. अमेरिकी शिष्टमंडळ रिकाम्या हाती परतले असून हॉर्मुझची सामुद्रधुनी अजूनही बंदच आहे. अमेरिकेच्या अवाजवी मागण्या मान्य करण्यास इराणने नकार दिला असून इराण स्वतःच्या हितसंबंधांसाठी राजनैतिक प्रयत्न चालूच ठेवेल.

इराणने अमेरिकेच्या अटी मान्य न केल्यामुळे करार होऊ शकला नाही ! – अमेरिका

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी चर्चेनंतर पत्रकारांशी बोलतांना सांगितले की, इराणने अमेरिकेच्या अटी मान्य न केल्यामुळे कोणताही करार होऊ शकला नाही. आम्ही कोणत्याही करारापर्यंत पोचलेलो नाही. इराणने आमच्या अटी स्वीकारण्यास नकार दिला आहे. आमच्या मर्यादा काय आहेत, कोणत्या गोष्टींवर आम्ही त्यांच्याशी जुळवून घेण्यास सिद्ध आहोत आणि कोणत्या गोष्टींवर नाही, हे आम्ही अगदी स्पष्ट केले आहे. आम्ही हे शक्य तितके स्पष्ट केले आहे आणि कदाचित् त्यांनी आमच्या अटी न स्वीकारण्याचा निर्णय घेतला असेल. प्रदीर्घ चर्चेनंतर अमेरिकेने अंतिम आणि सर्वोत्तम प्रस्ताव दिला होता आणि संपूर्ण वाटाघाटीत अमेरिकेच्या शिष्टमंडळाने बरीच लवचिकता दाखवली होती. आम्हाला एक सकारात्मक वचनबद्धता हवी होती की, इराण अण्वस्त्र मिळवण्याचा प्रयत्न करणार नाही आणि अण्वस्त्र लवकर मिळवण्यासाठी आवश्यक असलेली साधनेही तो मिळवणार नाही. हेच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे मुख्य ध्येय आहे आणि या वाटाघाटींच्या माध्यमातून आम्ही तेच साध्य करण्याचा प्रयत्न केला होता.

कराराची कुणालाच अपेक्षा नव्हती ! –  इराण

इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई म्हणाले की, आधीपासूनच हे गृहीत धरायला हवे होते की, एकाच बैठकीत करार होणार नाही. याची कुणालाच अपेक्षा नव्हती. पाकिस्तान आणि या प्रदेशातील इतर मित्रराष्ट्रे यांच्यासमवेतचे आमचे संपर्क आणि संवाद चालूच रहातील, असा इराणला विश्वास आहे.

इराणविरुद्धची कारवाई अद्याप संपलेली नाही ! – नेतान्याहू

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी सांगितले की, इराणविरुद्धची सैनिकी कारवाई अजून संपलेली नाही. इराण अणूबाँब बनवण्याच्या जवळ असल्यामुळे आक्रमण करण्यात आले. या आक्रमणांमुळे इराणच्या अणू कार्यक्रमाची मोठी हानी झाली, असा दावा त्यांनी केला.

ट्रम्प इराणवर नौदल नाकेबंदी लादू शकतात

चर्चा कोणत्याही ठोस निष्कर्षाविना संपल्यानंतर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सामाजिक माध्यमावर एक लेख प्रसारित केला आहे; ज्यामध्ये इराणविरुद्ध कठोर पावले उचलण्याच्या शक्यतेवर चर्चा करण्यात आली आहे.

या लेखानुसार जर इराणने अमेरिकेच्या अटी स्वीकारल्या नाहीत, तर अमेरिका त्या देशावर नौदल नाकेबंदी लादू शकते. अशा प्रकारच्या नाकेबंदीमुळे इराणच्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड दबाव येईल आणि चीन आणि भारत यांसारख्या, इराणच्या तेलावर अवलंबून असलेल्या राष्ट्रांवरही त्याचा परिणाम होईल. ट्रम्प यांनी यापूर्वी व्हेनेझुएलाविरुद्धही अशीच रणनीती वापरली होती, ज्यामुळे त्या देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली होती.

‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या वृत्तानुसार या अपयशानंतर ट्रम्प प्रशासनासमोर दोन कठीण पर्याय आहेत. पहिला, इराणसमवेत दीर्घ आणि कठीण वाटाघाटी चालू ठेवणे अन् दुसरा, पुन्हा युद्धाकडे वळणे होय.

चर्चा अयशस्वी झाल्याने इराणी नागरिक चिंतेत

न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार अमेरिका-इराण चर्चा अयशस्वी झाल्यानंतर अनेक इराणी नागरिक सामाजिक माध्यमांवरून चिंता व्यक्त करत आहेत. अनेक लोक या चर्चेवर बारकाईने लक्ष ठेवून होते; कारण त्यांना आशा होती की, यावर राजनैतिक तोडगा निघेल आणि निर्बंध हटवून त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल. तेहरानचे रहिवासी अमीर हुसेन यांनी एका संदेशात लिहिले, ‘देवच आमचे रक्षण करो. असे दिसते की, आपण पुन्हा युद्धाकडे परत जात आहोत.’

अमेरिकेने चालू केले सुरुंग हटवण्याचे अभियान

अमेरिकेच्या ‘सेंटकॉम’ने सांगितले आहे की, अमेरिकेच्या युद्धनौका सागरी मार्ग सुरक्षित करण्याच्या सिद्धतेत आहेत. इराणने या महत्त्वाच्या सागरी मार्गात सुरुंग पेरले असल्याचा आरोप आहे.

इराणला शस्त्रपुरवठा केल्यास चीनला मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल !  ट्रम्प यांची थेट चेतावणी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प

जर चीनने इराणला शस्त्रास्त्रांचा पुरवठा केला, तर त्याला मोठ्या समस्यांचा सामना करावा लागेल, अशी चेतावणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. इराणला येत्या काही आठवड्यांत चीनकडून नवीन हवाई संरक्षण प्रणाली मिळू शकते, असे वृत्त प्रसारित झाल्यानंतर ट्रम्प यांनी ही चेतावणी दिली.

दुसरीकडे चीनने हे वृत्त फेटाळून लावले. वॉशिंग्टनमधील चिनी दूतावासाने एका निवेदनात म्हटले आहे की, आम्ही संघर्षातील कोणत्याही पक्षाला कधीही शस्त्रे पुरवलेली नाहीत. अमेरिकेने निराधार आरोप आणि सनसनाटी पसरवणे थांबवावे, असे आवाहन केले आहे.

शक्तीशाली असल्याचा भ्रम युद्धाला चालना देत आहे ! – पोप लिओ चौदावे

व्हॅटिकन सिटी येथे पोप लिओ चौदावे म्हणाले की, सर्वांत शक्तीशाली असल्याचा भ्रम इराणमधील अमेरिका-इस्रायल युद्धाला चालना देत आहे. राजकीय नेत्यांनी ते थांबवून शांततेसाठी संवाद साधावा, अशी मागणी त्यांनी केली.

त्यांनी पुढे सांगितले की,

स्वतःची आणि पैशांची पूजा पुष्कळ झाली, शक्तीचे प्रदर्शन पुष्कळ झाले, युद्ध पुष्कळ झाले. कशाही प्रकारे हे युद्ध थांबले पाहिजे, हा भ्रम विनाशाकडे नेतो.